आयपॅड, फेसबुकवर अनुभवला सोहळा

आयपॅड, फेसबुकवर अनुभवला सोहळा

पुणे - आयपॅडवर सोहळ्याची क्षणचित्रे टिपणाऱ्या... फेसबुक लाइव्हमधून सोहळ्याचा आनंद मित्र-मैत्रिणींपर्यंत पोचविणाऱ्या... अन्‌ ग्रुपबरोबर आळंदी ते पुणे असा पायी प्रवास करणाऱ्या महिला-तरुणींमुळे पालखी सोहळ्याला एक वेगळेच रूप प्राप्त झाले होते. कोणी छायाचित्रकार बनून, तर कोणी वारकरी बनून या भक्ती सोहळ्यात सहभागी झाले होते.  

टाळ-मृदंगाच्या तालावर फुगडी खेळणाऱ्या महिला असो वा आपल्या सोहळ्याचा आनंद सेल्फीत बंदिस्त करणाऱ्या तरुणी प्रत्येकीचा उत्साह व आनंद पाहण्यासारखा होता.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) तरुणी, गृहिणी, कष्टकरी महिला, महिला पोलिस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्त्या, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्या, विद्यार्थिनी असा प्रत्येक क्षेत्रातील महिला-तरुणींचा पालखीत उत्स्फूर्त सहभाग दिसला. अनेकांनी सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन पालखी सोहळ्यात आपली उपस्थिती दर्शवली. त्यांचा उत्साह व आनंदही वाखाणण्याजोगा होता. पायी चालताना त्यांच्यातही नवा जोश दिसून आला. कामाच्या व्यग्रतेमुळे न मिळणारे समाधान या पालखीत एका दिवसात मिळाल्याची भावना महिलांनी व्यक्त केली. काहींनी पारंपरिक वेशभूषेत पालखी सोहळ्याचा आनंद घेतला.   याबाबत गृहिणी सुगंधा खानविलकर, कांचन तळवलकर आणि सुमित्रा टोळे म्हणाल्या, ‘‘आम्ही दरवर्षी पालखी सोहळ्यात सहभागी होतो. आळंदी ते पुणे असा पालखीसोबत प्रवासही करतो. हा आनंद शब्दांत व्यक्त करता येणारा नाही. वारकऱ्यांचा आनंद आणि जोश खूप काही शिकवून जातो. हा एक दिवस संपूर्ण वर्षभराच्या कामासाठी नवचैतन्य देऊन जातो.’’

आयटी दिंडीबरोबर काही महिलाही सहभागी झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘या माध्यमातून वेगळं काही करण्याची संधी मिळते. यातून एक वेगळा उत्साह अनुभवता येतो. त्यामुळे दरवर्षी दिंडीत सहभागी होतो.’’ 

मूळच्या पश्‍चिम बंगालच्या असलेल्या आणि पालखीच्या दर्शनासाठी आलेल्या संघमित्रा म्हणाल्या, ‘‘मी दरवर्षी वारीत सहभागी होते. पालखीमुळे जीवनाचे सार कळते. भक्तिरसात तल्लीन होऊन जाताना माणूस स्वत:ला विसरून जातो.’’  

वृषाली पाटील म्हणाली, ‘‘पालखी सोहळ्यात येऊन दैनंदिन जीवनातून सुटका मिळाली. वारकऱ्यांचा उत्साह आणि जल्लोष खूप काही शिकवून गेला. पालखी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकवते.’’

वारकरी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
तरुणाबरोबरच महिलांनीही वारीत मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. सविता कदम म्हणाल्या, ‘‘ही माझी पहिली वारी आहे. वारीत सहभागी होऊन माउलींचे दर्शन झाल्यासारखे वाटले. वारीत भक्तीचा सोहळा पाहून खूपच आनंद झाला. अशी निस्सीम भक्ती कधीतरीच पाहायला मिळते. हा देदीप्यमान सोहळा मनाला एक शांती व आनंद देऊन जातो.’’

महिलांकडून सेल्फी
पालखीचे पुण्यात आगमन झाल्यानंतर महिला-तरुणींनी संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोबतचे काही क्षण सेल्फीत बंदिस्त केले. तरुणी, ज्येष्ठ महिला यांनी आपल्या कुटुंबाबरोबर आणि ग्रुपबरोबर सेल्फी घेतला. तसेच काहींनी छायाचित्रही कॅमेऱ्यात टिपले. वारकरी महिलांकडील तुळशी वृंदावन डोक्‍यावर घेऊन काहींनी छायाचित्रेही क्‍लिक केली. दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी आलेल्या महिला आणि ज्येष्ठ महिलांची संख्या मोठी होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com