
5G स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स जिओला सर्वाधिक हक्क; मोजले ८८ हजारकोटी रुपये
मुंबई : सध्या देशातील फाईव्ह जी स्पेक्ट्रमसाठी सुरु असलेल्या लिलावात बलाढ्य रिलायन्स जिओ ने ८८ हजारकोटी रुपयांपेक्षाही जास्त रक्कम मोजून २२ सर्कलमध्ये जास्तीत जास्त हक्क मिळवले आहेत. केंद्राच्या दूरसंचार खात्यातर्फे हे लिलाव सुरु आहेत. त्यात देशातील सर्व २२ सर्कलमध्ये ७०० मेगाहर्ट्झ बँड क्षमतेचे हक्क मिळविणारी जिओ ही एकमेव कंपनी ठरली आहे. त्यांना ७००, ८००, १८०० व ३३०० मेगाहर्ट्झ तसेच २६ गिगाहर्ट्झ बँड क्षमतेचे हक्क ८८,०७८ कोटी रुपयांना मिळाले आहेत. हे हक्क त्यांना २० वर्षांसाठी मिळाले असून वरील रक्कमही त्यांनी २० समान हप्त्यांमध्ये व्याजासह केंद्र सरकारला द्यायची आहे. त्यापोटी जिओतर्फे ७.२ टक्के व्याजासह दरवर्षी ७,८७७ कोटी रुपये केंद्र सरकारला दिले जातील.
२० वर्षांनंतर त्यांनी केंद्राला व्याजासह एकूण एक लाख ५७ हजार ५४० दिले असतील. जिओ ला सर्व क्षमतेच्या बँडमध्ये मिळून २४,७४० मेगार्ट्झ क्षमतेचे हक्क मिळाले आहेत. भारती एअरटेलला १९,८६७ मेगाहर्ट्झ क्षमतेचे हक्क ४३ हजार ८४ कोटी रुपयांना मिळाले. व्होडाफोनला १८,७९९ कोटी रुपयांचे हक्क मिळाले. सहा वर्षापूर्वी बाजारात आलेल्या जिओ कडे फोर जी चे ४० कोटी ग्राहक आहेत. आता फाईव्ह जी मुळे प्रत्येक भारतीयाला जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे मिळतील, अशी अपेक्षा रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश मुकेश अंबानी यांनी व्यक्त केली.
Web Title: 5g Spectrum Auction Ends Reliance Jio Top Bidder Central Govt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..