कृष्णेत ७३ प्रकारचे मासे; काही प्रजाती धोक्यात

कृष्णेत ७३ प्रकारचे मासे; काही प्रजाती धोक्यात
Updated on

सांगली - कृष्णा नदीत तब्बल ७३ प्रजातींचे माशांचे अस्तित्व आढळले आहे. यातील अनेक प्रजाती धोक्‍यात आणि नष्टांशाच्या सीमेवर पोचल्याचेही निरीक्षण आहे. अमर्याद वाळूउपसा, पाण्याचे प्रदूषण, कोरडे पडणारे पात्र यामुळे जलचरांच्या काही प्रजाती संपण्याच्या मार्गावर आहेत. 

पलूस येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. सुरेश कुंभार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कऱ्हाडमध्ये प्रीतीसंगमापासून म्हैसाळच्या धरणापर्यंत सुमारे शंभर शंभर किलोमीटर अंतरातील माशांचा अभ्यास केला. प्रवाहाची संथ गती, काही ठिकाणी तुलनेने स्थिर पाणीसाठे, अरुंद पात्र आणि कऱ्हाड परिसरातील पाण्याची शुद्धता यामुळे माशांच्या हरतऱ्हेच्या प्रजाती कृष्णेत विकसित होण्यास नैसर्गिक मदत झाल्याचे आढळले.

अनैतिक पद्धतीने मासेमारी (स्फोटाद्वारे किंवा पाण्यात वीजप्रवाह सोडून आदीप्रकारे), अति मासेमारी, अत्यंत छोट्या छिद्रांच्या जाळ्यांचा वापर या कारणांनी काही प्रजाती धोक्‍यात आहेत. तिलापीया, प्युन्टीस, गौरमी या विदेशी जातींसह काही चायनीज माशांनीही कृष्णेत घुसखोरी केली आहे; त्यांचा उपद्रव कृष्णेतील मूलनिवासी माशांना झाला आहे. हल्ली ठिकठिकाणी मत्स्यशेती सुरू झाली आहे.

तेथील मासे पावसाळ्यात प्रवाहासोबत कृष्णेत येतात; नदीतील माशांवर ‘अतिक्रमण’ करतात. औद्योगिक रसायनांचे उत्सर्जन, शेतीतील रसायनांचा वापर, प्लास्टिक कचरा यामुळेही माशांचा श्‍वास घुसमटला आहे. वाळवा तालुक्‍यात तसेच सांगलीजवळ अनेकदा नदीपात्रात मृत माशांचा खच आढळतो.

‘नकटा’ मासा तर अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. मिरगा, रोहू आणि कटला या माशांच्या  अस्तित्वालाही नख लागू पाहत आहे. कोयनेतही नकटा व वाघमासा धोक्‍यात आहते. भीमा, इंद्रायणीत आढळणारा मांजरमासा कृष्णेत तब्बल सत्तर वर्षांनी सापडला; सध्याच्या  प्रतिकूल वातावरणात पुन्हा त्याचा जीवनमरणाचा संघर्ष सुरू आहे.

‘कृष्णेतील धोक्‍यात आलेल्या प्रजातींसाठी नदीचा काही भाग जलीय अभयारण्य म्हणून घोषित करण्याची आवश्‍यकता आहे. मासेमारीत वापरले जाणारे अवैध प्रकार रोखल्यास पुढील अनेक वर्षे कृष्णा आपल्याला मुबलक मासे देत राहील’
प्रा. डॉ. सुरेश कुंभार

विभागप्रमुख, प्राणिशास्त्र विभाग, पलूस महाविद्यालय

दृष्टिक्षेपात...

  •   सातारा, सांगली, कोल्हापुरातून ३४२ किलोमीटर कृष्णेचा प्रवास
  •   मुबलक प्रजाती- रोहू, कटला, मिरगल, महसीर, काजुली, राणीमासा,         मांजरमासा, वाम, वाघमासा,  भारतीय सारंगा 
  •   धोक्‍यातील प्रजाती- वाघमासा, नकटा, मिरगा, रोहू   
  •   मत्स्यशेतीतील चायनीजसह विदेशी मासे प्रवाहासोबत नदीत आल्याने         मूलनिवासी संकटात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com