कौटुंबिक वादाची डिजिटल आवृत्ती

ॲड. अभय आपटे
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

सध्या प्रत्यक्ष संवादापेक्षा डिजिटल संवाद अधिक वाढला आहे. आपापल्या स्मार्ट फोनमध्ये डोके घालून प्रत्येक जण आपल्या विश्वात रममाण होतो.

सध्या प्रत्यक्ष संवादापेक्षा डिजिटल संवाद अधिक वाढला आहे. आपापल्या स्मार्ट फोनमध्ये डोके घालून प्रत्येक जण आपल्या विश्वात रममाण होतो. शेजारी बसलेल्या माणसाशी प्रत्यक्ष संवाद करण्यापेक्षा काही हजार किलोमीटर दूर असलेल्या मित्र-मैत्रिणींशी संवाद सोपा वाटतो. त्यामुळे अनेकदा उलटलेली पाने परत परत समोर येतात. मैत्रीचा हात पुढे आला की काही जणांचे वास्तवतेचे भान सुटते. मेसेजेस, व्हॉट्‌सॲप, इन्स्टाग्राम, ई-मेल अशा अनेक साधनांनी लोक एकमेकांच्या अतिरेकी संपर्कात राहतात. या सर्व माध्यमांमध्ये असलेले ग्रुप खूप लोकांना एकत्र आणतात. दुसरीकडे, डेटिंग साइटसारखी आपल्याला फार लांब वाटणारी गोष्टसुद्धा आज दुर्दैवाने आपल्या समाजात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

लग्नानंतर अशा संपर्काचे स्वरूप कसे असावे, हा खरेतर अतिशय गांभीर्याने अवलोकन करण्याचा विषय आहे. अनेकदा अशा संपर्कातून मोठे गैरसमज निर्माण होतात, तर काही वेळा भावनिक गुंतागुंत निर्माण होते. आज सुशिक्षित तरुण मुले आणि मुली आयटीसारख्या क्षेत्रात काम करतात. दिवसाचा बराच वेळ आपल्या सहकाऱ्यांबरोबर मोकळ्या वातावरणात घालवतात. बऱ्याच जणांना अद्ययावत ऑफिस आणि इतर सोयी उपलब्ध असतात. मग आपली सुख-दुःखे, विवंचना या प्रत्यक्ष जोडीदाराला न सांगता अशा माध्यमांमार्फत प्रसारित केल्या जातात. अनेकदा घरापेक्षा हे लोक ऑफिसमध्ये अधिक असतात. अनेक प्रोजेक्‍टमध्ये एकत्र काम करतात. एकमेकांसोबत काम करताना एकमेकांना समजावून घेतात, त्यांच्या नात्यात मोकळेपणा असतो आणि ती एक मानसिक गरजही असते. ही गरज जोडीदारानेही समजून घेतली आणि याबाबत दोघांनीही एकमेकांना स्पेस दिली, तर ठीक आहे. परंतु, जर यामध्ये दोघांच्यात वैचारिक मतभिन्नता असेल, तर संसारात ठिणगी पडल्याशिवाय राहत नाही. एकदा का नात्यातला विश्वास संपला, की तो परत मिळवणे अतिशय कठीण असते. अशावेळी नाती कृत्रिम आणि औपचारिक बनतात. मग लढाईपूर्वीच्या तयारीला सुरुवात होते. त्याच माध्यमांचा उलटा वापर सुरू होतो. एकमेकांचे मेसेजेस पाहणे, त्याचे स्क्रीन शॉट घेणे, मुद्दाम संवाद निर्माण करून त्याचे रेकॉर्डिंग करणे, अशा अनेक गोष्टी सुरू होतात. पूर्वी शारीरिक मारहाण, दारूचे व्यसन, पैशाची मागणी अशा कारणांनी विवाहसंबंध बिघडत होते. आजही ही कारणे पूर्णपणे दूर झाली आहेत, अशातला भाग नाही. मात्र, अलीकडे माध्यमातील वापराने निर्माण झालेली नको इतकी जवळीक, त्यातून निर्माण होणारा संशय, हे पती-पत्नीच्या वादाचे नव्याने पुढे येऊ लागलेले कारण आहे.

‘तू हा प्रोफाइल पिक्‍चर का ठेवला?’ आणि ‘तू हा स्टेट्‌स का ठेवला?’ याच्यावरूनही वाद होतात. सोशल मीडियाचा वापर करून एकमेकांविरुद्ध पुरावे जमा केले जातात. एकमेकांचा फोन हॅक करून आपला जोडीदार नक्की कुणाशी बोलतो आहे? याचा शोध घेतला जातो. रागाच्या भरात सहज काही बोलून गेला तरी त्याचे रेकॉर्डिंग जोडीदाराकडे असते आणि मग एकमेकांच्या विरुद्ध हे पुरावे न्यायालयांमध्ये वापरले जातात. न्यायालयात अशा पुराव्यांचे काय होते, हा चर्चेचा विषय आहे. उच्च न्यायालयाने असा पुरावा अतिशय काळजीपूर्वक स्वीकारावा, असे म्हटले आहे. याची एक प्रक्रिया पूर्ण करावी लागते. यात आवाजाची पडताळणी, टेपची सत्यता, मूळ रेकॉर्डिंगमध्ये फेरफार नसणे या बाबी सिद्ध व्हाव्या लागतात. असा पुरावा हा मूळ विषयाला केवळ पूरक ठरू शकतो. रेकॉर्ड केलेला संवाद हा घटनेने दिलेल्या मूलभूत हक्कावर गदा तर आणत नाही ना, याचाही विचार केला जातो. या बाबींची कल्पना सामान्य माणसाला अजिबात नसते.

अर्थात, पती-पत्नीचे नाते कायमच टिकवण्यासाठी मनावर ताबा ठेवून कसोटी सामना  खेळण्याची तयारी पाहिजे; ती नसेल तर मग मात्र सामना वीस षटकांत संपण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abhay apte article on digital