हवा प्रदूषणामुळे दररोज दोन मृत्यू

वृत्तसंस्था
Monday, 20 February 2017

हवेतील प्रदूषित कणांमुळे जगभरात दरवर्षी 27 ते 34 लाख महिला मुदतीपूर्वीच प्रसूत होत असून यातील 16 लाख घटना दक्षिण आशियामध्येच होत आहेत.

नवी दिल्ली : भारतातील हवा दिवसेंदिवस अधिक प्रदूषित होत असल्याचे निदर्शनास आले असून हवा प्रदूषणामुळे देशात दररोज सरासरी दोन जणांचा मृत्यू होत असल्याचे एका अभ्यासातून दिसून आले आहे. लॅन्सेट या वैद्यकीय जर्नलमध्ये याबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

या अहवालानुसार, जगभरातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील काही शहरांचाही समावेश आहे. हवेतील प्रदूषित कणांमुळे जगभरात दरवर्षी 27 ते 34 लाख महिला मुदतीपूर्वीच प्रसूत होत असून यातील 16 लाख घटना दक्षिण आशियामध्येच होत आहेत. हवेचे प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ या दोन वेगळ्या समस्या नसून त्या एकमेकांशी निगडित आहेत. या समस्या सोडविण्यासाठी दोन्हींवर एकत्रपणे काम करण्याची गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे. या प्रदूषणाचा मानवजातीच्या एकूण आरोग्यावरच परिणाम होण्याची भीती असून याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असा इशाराही अहवालात देण्यात आला आहे.

उत्तर भारतामध्ये प्रदूषित धुक्‍याचे प्रमाण वाढत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. यामुळे देशभरात दररोज सरासरी दोन जणांचा मृत्यू होत असून यामुळे भारताचे दरवर्षी 38 अब्ज डॉलरचे आर्थिक नुकसान होत असल्याचा अंदाजही जागतिक बॅंकेने काढला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: air pollution takes 2 lives everyday