"ऍप'निंग : शेतकऱ्यांचा मित्र - "मार्केट यार्ड' 

अशोक गव्हाणे 
शनिवार, 30 मे 2020

मोबाईल फोन ही तरुणाईची गरज बनलेली असताना, मोबाईल फोनच्या बाबतीत शेतकरीही मागे नाहीत.अशा वेळी त्यांच्यासाठी असलेले "मार्केट यार्ड' 
ऍप महत्त्वाचे ठरत आहे.ऍपच्या माध्यमातून खरेदी- विक्रीही करता येते.

सध्या मोबाईल फोन ही तरुणाईची गरज बनलेली असताना, मोबाईल फोनच्या बाबतीत शेतकरीही मागे नाहीत. अशा वेळी त्यांच्यासाठी असलेले "मार्केट यार्ड' हे ऍप महत्त्वाचे ठरत आहे. सध्या शेतकऱ्यांसमोर असंख्य अडचणी आहेत. त्यातून मार्ग काढून शेतकरी तंत्रज्ञानाचा अवलंब करीत उत्पादन वाढविण्याकडे लक्ष देत आहेत. अशा वेळी "मार्केट यार्ड' ऍपच्या मदतीने ते आपल्या अडचणींवर मात करू शकतात. शेती उत्पादन वाढविण्यासाठी हे ऍप शेतकऱ्यांना उपयुक्त आहे. अनेकांनी शेतीत केलेले काम आणि ते त्यात कसे यशस्वी झाले, याबाबतची माहिती या ऍपवर पोस्ट केलेली असते. ही माहिती वाचून अन्य शेतकरी आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करू शकतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या ऍपच्या माध्यमातून जवळच्या बाजारपेठांतील शेतमालाचे भाव आणि इतर गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना मिळते. ऍपच्या माध्यमातून खरेदी- विक्रीही करता येते. तसेच एखादी गोष्ट भाड्याने देता किंवा घेता येते. ऍपच्या माध्यमातून व्यवसाय व्यवस्थापनही करता येते. व्यवसायाचा प्रकार निवडून शेतकरी त्याबाबत मदत मिळवू शकतात. बिया, खते, ट्रॅक्‍टर, कृषी उपकरणे, रोपवाटिका, दूध डेअरी अशा अनेक व्यवसायांविषयी या ऍपच्या माध्यमातून शेतकरी मार्गदर्शन मिळवू शकतात. या ऍपमध्ये काही मार्गदर्शक व्हिडिओही आहेत. पिकांशी संबंधित माहिती, तसेच, ऍपवर व्हिडिओ कसे अपलोड करायचे इत्यादी गोष्टींची माहिती यात आहे. 

या ऍपवर खरेदी आणि विक्री अशी स्वतंत्र डायरी उपलब्ध असून, याद्वारे व्यवहार करता येतात. ऍपच्या साह्याने पीक निवडून संबंधित माहिती मिळवता येते. ऍपच्या माध्यमातून विक्रेते आणि खरेदीदार शोधता येतात. आपण या ऍपचा वापर करतो, तेव्हा हे संकेतस्थळ वैयक्तिक माहिती संग्रह, वापराविषयी माहिती देते. ऍपचा वापर करण्यासाठी आपली वैयक्तिकरीत्या ओळखण्यायोग्य माहिती द्यावी लागते. ज्याचा वापर आपल्याशी संपर्क साधण्यासाठी किंवा आपली ओळख पटवण्यासाठी केला जातो. वैयक्तिकरीत्या ओळखण्यायोग्य माहितीमध्ये नाव, मोबाइल नंबर, पत्ता, जन्मतारीख, व्यवसायाचे नाव, व्यवसायाचे स्थान यांचा समावेश असतो. या ऍपमध्ये जाहिरातींचाही समावेश आहे. हे ऍप भागीदारांना सेवांचा वापर करण्याच्या पद्धतीविषयी माहिती पुरविते, जेणेकरून ते आपल्याशी संबंधित उत्पादने आणि सेवांची जाहिरात करू शकतील. या ऍपशी सुमारे अडीच लाख शेतकरी जोडले गेले असल्याने या ऍपवर जाहिरात केल्यास ती फायदेशीर ठरू शकते. 

ऍप वापराच्या क्रमवार पायऱ्या 
1) हे ऍप "गुगल प्ले स्टोअर'वर उपलब्ध असून, पहिल्यांदा ते डाऊनलोड करावे. 
2) त्यानंतर ऍपवर आपले प्रोफाईल बनवावे. त्यात आवश्‍यक ती माहिती भरावी. 
3) माहिती भरल्यावर ऍप आपण मागविलेली माहिती देते. नंतर आपण ऍपचा वापर करू शकतो. 
4) धोरणाबद्दल आपल्या काही शंका असल्यास शेतकरी contact@marketyard.org वर संपर्क साधू शकतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: appning article Market Yard app is becoming important for farmers