‘ॲप’निंग : व्हिडिओ आकर्षक होण्यासाठी...

अशोक गव्हाणे
Saturday, 23 May 2020

ॲप वापराच्या क्रमवार पायऱ्या

  • गॅलरी, अल्बम, ‘फेसबुक’ किंवा ‘इन्स्टाग्राम’वरील फोटो आणि व्हिडिओ पहिल्यांदा निवडावा.
  • एक थीम निवडावी. त्यानुसार आपले आवडते संगीत आणि शीर्षक त्याच्याशी जोडावे. 
  • योग्य ती प्रक्रिया झाल्यास तयार झालेला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करता येतो.
  • किंवा हा व्हिडिओ आपण ‘इन्स्टाग्राम’, ‘फेसबुक’, ‘व्हॉट्‌सॲप’, ‘यूट्यूब’ किंवा ईमेलवर शेअरही करू शकतो.

सध्या सोशल मीडियामुळे मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सोशल मीडियाच्या जगात आपण सतत एकमेकांना व्हिडिओ पाठवत असतो, तसेच नवनीवन व्हिडिओही बनवत असतो. साध्या व्हिडिओलाही एखाद्या नव्या ॲपच्या साह्याने खूप चांगले बनवता येते. हल्ली अनेकजण नवनवीन प्रकारे आपले व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करत असतात. जुन्या फोटोंचा अल्बम बनवणे, तसेच त्याला इफेक्‍ट देऊन वेगवेगळ्या प्रकारे आकर्षक बनवण्याचा प्रयत्न अनेकजण करत असतात. व्हिडिओ एडिटिंगच्या नवनवीन ॲपच्या मदतीने आपण असे छान व्हिडिओ एडिट करू शकतो. ‘फिल्मोरा-गो’ हे अशाच प्रकारचे ॲप आहे. ‘फिल्मोरा-गो’ हे व्हिडिओ एडिट करण्यासाठी वापरण्यात येणारे सर्वसमावेशक ॲप आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मोबाईलमधून व्हिडिओ क्‍लिप घेऊन आपण छान प्रकारे तो एडिट करू शकतो. या ॲपद्वारे आपण व्हिडिओला फोटो लोगोही जोडू शकतो. हे ॲप एन्ड्रॉईड फोनवर वापरता येते. ‘फिल्मोरा-गो’ हे ॲप ‘प्ले स्टोर’वर उपलब्ध आहे. ‘प्ले स्टोर’वरून हे ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर करता येतो. 
आपल्या व्हिडिओ क्‍लिप कितीही वेळाच्या, मोठ्या असल्या तरी या ॲपमुळे त्या एडिट करताना कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. आकाराने मोठ्या असणाऱ्या क्‍लिपही आपण अगदी सहज या ॲपच्या मदतीने एडिट करू शकतो. ‘फिल्मोरा-गो’ ॲपचा वापर करून आपण व्हिडिओला वेगवेगळ्या प्रकारचे संगीत देऊ शकतो. वेगवेगळे मजेदार व्हिडिओ बनविण्यात हे ॲप मदत करू शकते. आपण बनवलेले व्हिडिओ या ॲपच्या मदतीने आपण थेट ‘यूट्यूब’, ‘इंस्टाग्राम’, ‘फेसबुक’, ‘व्हॉट्‌सॲप’द्वारे शेअर करू शकतो.

‘फिल्मोरा-गो’ या ॲपचा वापर करून आपण फोटो आणि व्हिडिओ एकत्र करू शकतो. एकप्रकारे आपल्या मोबाईलमध्ये या ॲपच्या साह्याने व्हिडिओ लायब्ररीही आपण तयार करू शकतो. ‘फेसबुक’ किंवा ‘इंस्टाग्राम’सारख्या सोशल नेटवर्किंग साईटवरूनही आपण या ॲपमध्ये थेट व्हिडिओ आणि फोटो घेऊ शकतो.

या ॲपमध्ये विविध प्रकारचे टेम्प्लेट असून व्हिडिओसाठी वेगवेगळ्या इफेक्‍टचाही वापर करता येतो. ‘फिल्मोरा-गो’च्या स्टाईलिश थीममधून अशा प्रकारच्या अनेक गोष्टींची निवड आपण करू शकतो. तसेच, आपण आपल्या मोबाईलवरील संगीतही व्हिडिओ एडिटिंगसाठी वापरू शकतो. ‘फिल्मोरा-गो’ ॲपच्या लायब्ररीमधून आपल्याला म्युझिकही ॲड करता येते. या ॲपच्या मदतीने रिव्हर्स व्हिडिओही तयार करता येतात. स्लो-मोशनचे व्हिडिओ तयार करण्याबरोबर, व्हिडिओ झूम आऊट आणि झूम इनचा पर्याय असल्याने व्हिडिओमधील एखाद्या चित्राला ठळक पद्धतीने दाखवता येते.

तसेच चित्रपटाप्रमाणे इफेक्‍टही देता येतात. ॲनिमेटेड संदेशही या ॲपच्या मदतीने तयार करता येतात. त्यांच्या अक्षरांचा रंग आणि आकारही आपण बदलू शकतो. तसेच, त्याला शीर्षकही देऊ शकतो. त्याप्रमाणे व्हिडिओचा डुप्लिकेट व्हिडिओ बनविता येतो. व्हिडिओचा आवाज बंद करता येतो. त्याला कुठेही आणि कशाही प्रकारे फिरवू शकतो किंवा हलवू शकतो. हे ॲप आंतराष्ट्रीय स्तरावरील अनेक भाषांनाही सपोर्ट करते. इंग्रजी, जर्मन, इटालियन, तुर्की, जपानी, कोरियन, अरबी, रशियन, पोर्तुगीज, स्पॅनिश, फ्रेंच आणि चिनी इत्यादी भाषांना हे ॲप सपोर्ट करते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article ashok gavhane on video making