जैविक जलशुद्धीकरणाचे शिवाजी विद्यापीठात यशस्वी संशोधन

ओंकार धर्माधिकारी
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

एक नजर

  • जिवाणू आणि काही वनस्पतींचा वापर करून जैविक पद्धतीने रसायनयुक्त पाणी शुद्ध करण्याचे शिवाजी विद्यापीठाचे संशोधन.
  • वस्त्रोद्योगातील रंगीत किंवा रासायनिक पाणी शुद्ध करून त्याचा वापर शेती किंवा अन्य औद्योगिक कारणासाठी करणे शक्य. 
  • संशोधनाची राष्ट्रीय पातळीवर दखल
  • काही औद्योगिक वसाहतींमध्ये याची अंमलबजावणीही

कोल्हापूर - रसायनयुक्त पाणी जिवाणू आणि काही वनस्पतींचा वापर करून जैविक पद्धतीने शुद्ध करण्याचे संशोधन शिवाजी विद्यापीठाच्या बायोटेक्‍नॉलॉजी विभागाने केले आहे. यामुळे वस्त्रोद्योगातील रंगीत किंवा रासायनिक पाणी शुद्ध करून त्याचा वापर शेती किंवा अन्य औद्योगिक कारणासाठी केला जाऊ शकतो.

या संशोधनाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून, काही औद्योगिक वसाहतींमध्ये याची अंमलबजावणीही केली आहे. बायोटेक्‍नॉलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती जाधव, प्रा. डॉ. एस. पी. गोविंदवार, प्रा. डॉ. व्ही. ए. बापट यांनी हे संशोधन केले आहे.

रसायनयुक्त पाण्याने केवळ नदीच प्रदूषित होते असे नाही, तर भूगर्भातील जलसाठा आणि मृदा यावरही याचा विपरीत परिणाम होतो. औद्योगिक वसाहती आणि वस्त्रोद्योग गिरण्यांमधून अशाप्रकारचे रसायनयुक्त पाणी नदीमध्ये सोडले जाते. हे पाणी शुद्ध करण्याची प्रचलित प्रक्रियेमध्ये काही प्रतिरोधी रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळे पाण्यातील प्रदूषकांचा साका (स्लेज) तळाला साठतो आणि वरील पाणी अन्यत्र सोडण्यात येते, मात्र या पुन्हा राहिलेल्या साक्‍याचे काय करायचे, असा प्रश्‍न असतो. त्यामुळे जलशुद्धीकरणाची ही पद्धत शाश्‍वत नाही.

शिवाजी विद्यापीठाच्या बायोटेक्‍नॉलॉजी विभागातील प्राध्यापकांनी या समस्येवरचा शाश्‍वत उपाय शोधला. त्यांनी आपल्या प्रयोगशाळेमध्ये अथोपिया ॲक्वाटिया, सॅल्वनीया, मोनेस्टा, टाईफा, ग्लुमिया माल्कोनी यासह काही अन्य वनस्पतींचा उपयोग रसायनयुक्त पाणी शुद्धीकरणासाठी होऊ शकतो याचा प्रयोग करून पाहिला. झेंडू, पाणकणीस, गलाटा, कर्दळी याही वनस्पतींचा उपयोग करून त्यांनी पाहिला. काही जीवाणूंचा वापरही त्यांनी या प्रक्रियेत केला.

पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पतींचाही उपयोग यासाठी केला गेला. या वनस्पतींची मुळे, पाने पाण्यातील प्रदूषकांचे प्रमाण नगण्य करतात. त्यामुळेच रयासनयुक्त पाणीदेखील शुद्ध होते. त्यामुळे पाणी शेतीसाठी वापरले जाऊ शकते किंवा ते नदीत सोडल्यास त्याचा दुष्परिणाम जाणवत नाही. यासाठी काही जलचरांवरही या पाण्याचा प्रयोग केला गेला. काही औद्योगिक वसाहतींमध्ये याचा यशस्वी प्रयोग केला असून, या संशोधनाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या बायोटेक्‍नॉलॉजी विभागाच्या संकेतस्थळावर या संशोधनातून साकारलेल्या प्रकल्पाचे छायाचित्रही लावले आहे.

पर्यावरणाच्या एका गंभीर समस्येवरचे शाश्‍वत उत्तर संशोधनातून शोधले आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे जैविक असल्याने याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. या प्रक्रियेतून शुद्धीकरण केलेले पाणी शेतीसाठी किंवा अन्य औद्योगिक वापरासाठी वापरले जाऊ शकते. हे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवरचे असून, याची अंमलबजावणी व्यापक पातळीवर व्हावी.
- प्रा. डॉ. ज्योती जाधव, 

बायोटेक्‍नॉलॉजी विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Biological water purification research successful in Shivaji University