आर्क्‍टिकवरील हिम वितळल्याने चीनमध्ये वायु प्रदुषण

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

2012 वर्षाच्या अखेरीस आर्क्‍टिक भागामधील हिम वितळण्याबरोबरच सायबेरियातील प्रचंड प्रमाणातील हिमपातामुळे वाऱ्यांचे वहन बाधित झाल्याने पूर्व चीनला वायु प्रदुषणाचा फटका बसल्याचा निष्कर्ष अभ्यासकांकडून काढण्यात आला आहे

बीजिंग - पूर्व चीनमध्ये 2013 मध्ये आढळून आलेल्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरील वायु प्रदुषणाचा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामधील आर्क्‍टिक भागामधील हिम वितळण्याशी संबंध असल्याचा निष्कर्ष एका अभ्यास मोहिमेमधून काढण्यात आला आहे.

चीनमधील वायु प्रदुषणाच्या काळाआधीच्या वसंत ऋतुमध्ये आर्क्‍टिकमध्ये झालेल्या हिमपाताबरोबरच मोठ्या प्रमाणात बर्फ वितळल्यामुळे वाऱ्यांच्या वहनामध्ये बदल दिसून आल्याचे या अभ्यासांती स्पष्ट झाले. हवामान बदलामुळे आर्क्‍टिक भागामधील हिम मोठ्या प्रमाणात वितळत आहे. यामुळे चीनमधील मोठ्या प्रमाणात आढळलेल्या वायु प्रदुषणासारख्या घटना नजीकच्या भविष्यातही आढळून येण्याची भीती अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे, चीनची राजधानी असलेल्या बीजिंग येथे 2022 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांनाही फटका बसण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

चीनमधील या वायु प्रदुषणाच्या विळख्यात देशातील 74 मोठी शहरे अडकली होती. या प्रदुषणामुळे हवेची गुणवत्ता नीचतम पातळीस जाऊन आरोग्यास अत्यंत घातक वातावरण निर्माण झाले होते. सुमारे महिनाभराच्या काळासाठी उद्‌भविलेल्या या संकटास कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचा अभ्यास शास्त्रज्ञांनी सुरु केला होता. या पार्श्‍वभूमीवर, 2012 वर्षाच्या अखेरीस आर्क्‍टिक भागामधील हिम वितळण्याबरोबरच सायबेरियातील प्रचंड प्रमाणातील हिमपातामुळे वाऱ्यांचे वहन बाधित झाल्याने पूर्व चीनला वायु प्रदुषणाचा फटका बसल्याचा निष्कर्ष अभ्यासकांकडून काढण्यात आला आहे.

या प्रदुषणानंतर चीनकडून हरितगृह वायु उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी वेगाने पाऊले उचलण्यात आली होती. या अहवालामध्ये या उपाययोजनांची दखल घेत अभ्यासकांनी सरकारचे कौतुकही केले आहे. या उपाययोजना करण्यात आल्या नसत्या; तर या प्रदुषणापेक्षाही गंभीर संकटांस चीनला सामोरे जावे लागले असते, असा इशाराही अहवालाच्या माध्यमामधून देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China's unprecedented air pollution linked to Arctic sea ice loss