सिट्रोएन सी५ एअरक्रॉस रिव्ह्यू :  'सिट्रोएन' ची धमाकेदार गाडी पण...

कुबेर
Thursday, 4 March 2021

सिट्रोएन ने भारतात एन्ट्री केली आहे आणि नुकतीच  त्यांनी त्यांची पहिली गाडी सादर केली आहे.

सिट्रोएन हे नाव भारतातील लोकांसाठी तसे नवीन आहे पण जगभरात हे नाव अतिशय प्रसिद्ध असून दमदार आणि वेगळ्या दिसणाऱ्या गाड्या बनवणारी कंपनी म्हणून सिट्रोएन प्रसिद्ध आहे. पण मग आपण आज सिट्रोएन बद्दल का बोलत आहोत? याचे कारण म्हणजे सिट्रोएन ने भारतात एन्ट्री केली आहे आणि नुकतीच  त्यांनी त्यांची पहिली गाडी सादर केली आहे. ही एक प्रीमियम एसयूव्ही असून ' सिट्रोएन सी५ एअरक्रॉस ' असे या गाडीचे नाव आहे.

एसयूव्ही प्रकारातील गाड्यांना सध्या जबरदस्त मागणी असून सर्वच वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी याकडे मोर्चा वळवला आहे. खरेतर सिट्रोएन मागील वर्षीच भारतात एन्ट्री करणार होते पण कोरोनामुळे त्यांच्या एन्ट्रीला ब्रेक लागला होता पण आता मात्र सिट्रोएन दणदणीत एन्ट्री करणार असल्याचे दिसते आहे. चालत तर मग आज पाहुयात ' सिट्रोएन सी५ एअरक्रॉस ' आहे तरी कशी आणि खरंच ती भारतात काही प्रभाव पाडू शकेल का?  

लूक : अतिशय वेगळी पण सर्वांना आवडेल असे नाही  

मूळची फ्रेंच कंपनी असल्याने त्यांच्या डिझाईन मध्ये फ्रेंच डिझायनिंगची मोठी झलक दिसते. भारतीय बाजारात असणाऱ्या गाड्यांपेक्षा अतिशय वेगळी दिसणारी ही गाडी आहे आणि रस्त्यावर जाताना लोकांचे लक्ष या गाडीकडे नक्कीच जाईल. पण हे डिझाईन अतिशय वेगळे असल्याने ते प्रत्येकाला आवडेलच असे नाही पण माझ्या मते ' सिट्रोएन सी५ एअरक्रॉस ' अतिशय सुंदर दिसते आणि नक्कीच गर्दीतून तुम्ही उठून दिसाल नक्कीच. स्प्लिट हेडलाईट यात असून वरच्या बाजूला LED डे टाईम रनिंग लाईट देण्यात आले असून त्याच्या खाली हेडलाईट देण्यात आला आहे.

बम्परच्या खालील दोन्ही बाजूस फॉग लॅम्प देण्यात आले आहेत. LED प्रोजेक्टर हेडलाईट सी५ एअरक्रॉस मध्ये देण्यात आले आहेत. मागील बाजूस सर्वात उठून दिसणारी गोष्ट म्हणजे टेललाइट्स. त्यांच्या विशेष आयताकृती डिझाइनमुळे त्या अतिशय सुंदर दिसतात यात काही शंका नाही. याचबरोबर सी५ एअरक्रॉस मध्ये १८ इंची व्हील देण्यात आले असून अलॉय व्हील्स देखील आकर्षक आहेत. 
 
इंटिरियर : मॉडर्न आहे वेगळेही 

आतमध्ये बसल्यावर नक्कीच एका प्रीमियम गाडीत बसल्याचा अनुभव येईल. अनेक गोष्टी आयताकृती आहेत जसे की एसी व्हेंट्स. स्टिअरिंग देखील चौकोन आणि गोल याचे मिश्रण आहे असे म्हणता येईल कारण खालून आणि वरून ते फ्लॅट आहे. राखाडी रंगाचे इंटेरियर अतिशय छान दिसते आणि मेंटेन करण्यास देखील सोपे आहे. स्पीडोमीटर मात्र वाचण्यास थोडा किचकट आहे कारण तो संपूर्ण डिजिटल असून त्यात ग्राफ वगरे देण्यात आले असून तो समजण्यास जरा वेळ लागेल. ८ इंची टचस्क्रीन देण्यात आले असून ते वापरण्यास अतिशय सोपे आहे.

' फील ' आणि ' शाईन ' या दोन प्रकारांमध्ये सी५ एअरक्रॉस उपलब्ध असून फील हा बेस व्हेरियंट आहे. ' फील ' मध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, LED हेडलाईट्स आणि ऑटोमॅटिक डिक्की हे फीचर्स नाहीयेत जे तुम्हाला शाईन मध्ये मिळतील. बेस व्हॅरियंट मध्ये देखील जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत.    

सुरक्षिततेचे काय.?

सुरक्षेच्या दृष्टीने ६ एअरबॅग, एबीएस, ईएसपी, टेरेन कंट्रोल मोड्स, हिल डिसेंट, ब्लाइंड स्पॉट वॉर्निंग, ऑटो पार्क असिस्ट, ३६० डिग्री व्ह्यू स्टॅंडर्ड म्हणून देण्यात आले आहेत. 

कंफर्ट : नक्कीच जबरदस्त 

सिट्रोएन नेहमीच प्रवाशांना खूप जास्त आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि ती त्यांची सर्वात मोठी ताकद असल्याचे कंपनी सांगते. प्रवाशांच्या आरामासाठी गाडीमध्ये भरपूर जागा असल्याचे दिसते. सिट्रोएन सी५ एअरक्रॉस रुंद, उंच आणि लांब असल्याने प्रवाशांना कोंदट वाटत नाही.

वैशिष्ठ्य म्हणजे मागे तीन स्वतंत्र सीट आहेत आहेत आणि त्या तुम्हाला हव्या त्याप्रमाणे अड्जस्ट करता येतात. अशी सुविधा अजून पर्यंत दुसऱ्या कोणत्याच गाडीत देण्यात आलेली नाही. पुढची दोन्ही सीट्स देखील अतिशय आरामदायी असून तुम्ही तासंतास गाडी चालवली तरीही अजिबात थकवा जाणवणार नाही. प्रवास्यांच्या आरामदायी प्रवासाच्या दृष्टीने सर्व बाबींवर बारीक लक्ष देऊन गाडी विकसित करण्यात आल्याचे दिसते. 
 
मोठी डिक्की : भरपूर सामान नेता येईल

५८० लिटरची मोठी डिक्की असून तुम्हाला ट्रिपला जाताना भरपूर सामान नेता येईल. गाडीमध्ये सुद्धा भरपूर छोट्या छोट्या जागा आहेत जिथे तुम्ही तुमचे छोटे सामान ठेऊ शकता. दरवाज्यात देखील पॉकेट्स देण्यात आले आहेत आणि मोठा ग्लोव्हबॉक्स देखील प्रवास्यांच्या सुविधेसाठी देण्यात आला आहे. 

परफॉर्मन्स : स्पोर्टी नाही पण नक्कीच पॉवरफुल 

सिट्रोएन सी५ एअरक्रॉस मध्ये २००० सीसी चे इंजिन असून १७७ बीएचपी ची ताकद या इंजिनमध्ये आहे तसेच ४०० न्यूटन मीटर इतका टॉर्क उपलब्ध आहे. सिट्रोएन सी५ एअरक्रॉस फक्त डिझेल इंजिन पर्यायामध्ये उपलब्ध आहे. इंजिन स्पोर्टी नक्कीच नाहीये पण जेव्हा हवी तेव्हा पॉवर नक्कीच मिळते आणि इंजिन अतिशय स्मूथ आहे. आरामात चालवल्यास हे इंजिन अतिशय उत्तम ड्रायविंगचा अनुभव नक्कीच देते.

स्टिअरिंग देखील अतिशय छान असून गाडी वाळवण्यास जास्त ताकद लावावी लागत नाही. चालवण्याचा अनुभव द्विगुणित होतो तो म्हणजे ८ स्पीड ऑटोमॅटिक गेअरबॉक्स. हा गेअरबॉक्स अतिशय स्मूथ असून गिअर व्यवस्थित वेळेत पडतात आणि ते जाणवत देखी नाहीत. उत्तम इन्स्युलेशन करण्यात आल्याचा अनुभव येतो कारण बाहेरचा अथवा इंजिनचा फार आवाज प्रवाशांपर्यंत येत नाही. परफॉर्मन्स स्पोर्टी नसला तरी आरामदायी आणि निवांत प्रवास आवडणाऱ्यांना हे इंजिन नक्की आवडेल.

सिट्रोएन ही जगभरात अतिशय जबरदस्त सस्पेन्शनसाठी प्रसिद्ध असून प्रेग्रेसिव्ह हायड्रॉलिक कुशन असे म्हणतात. या गाडीचे सस्पेन्शन अतिशय उत्तम असून तुम्हाला खड्डे आणि खराब रस्त्यात देखील आरामदायी प्रवास करता येतो. खूप शार्प खड्डा असेल तरच तो जाणवतो त्याव्यतिरिक्त एक अतिशय उत्तम राईड क्वालिटी आहे असे म्हणावे लागेल. ४ x ४ प्रणाली या गाडीत देण्यात आली नसली तरीही टेरेन रिस्पॉन्स मोड देण्यात आले आहेत. 

सिट्रोएन सी५ एअरक्रॉस घ्यावी का.?

सिट्रोएन सी५ एअरक्रॉस ही प्रीमियम श्रेणीतील गाडी असल्याने त्याची किंमत देखील प्रीमियम असणार आहे. या महिन्यात लाँच होणाऱ्या सिट्रोएन सी५ एअरक्रॉसची किंमत ३० लाखांच्या घरात असणार आहे. नक्कीच किंमत ऐकल्यावर ही गाडी अतिशय महागडी आहे असे वाटते आणि ते वाटणे साहजिक आहे.

सुरुवातीला भारतात फक्त १० डीलर असणार आहेत आणि त्यामुळे सर्वांना ही गाडी घेणं जरा अवघड आहे. किंमत पाहता फार लोक ही गाडी घेतील असे दिसत नाही कारण याहून थोड्या कमी किमतीत ' जीप कंपास ' सारखी दणकट, भरपूर फीचर्स असणारी आणि ४ x  ४ प्रणाली असणाऱ्या गाडीचा पर्याय उपलब्ध आहे. सिट्रोएन सी५ एअरक्रॉस ही एक उत्तम गाडी असली तरी ती सर्वांच्या आवाक्यात नसणार आहे तसेच सर्वांना परवडेल अशीही नाही त्यामुळे तुमच्याकडे भरपूर पैसे असतील आणि हौस म्हणून घ्यायची असल्यास नक्की विचार करा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citroen is known as a company that makes different looking cars