कॉफी आणि बरंच काही...

वृत्तसंस्था
Friday, 21 April 2017

चांगल्या प्रतीच्या अरेबिक कॉफीच्या बियांपासून आणि पाण्याचा योग्य वापर करुन नॅगी भावांनी या कॉफीची निर्मिती केली आहे.

ब्रातिस्लाव्हा (स्लोव्हाकिया) - स्ट्राँग कॉफी आवडणारे बरेच जण असतात. कोणतंही काम करताना छानशी कॉफी मिळाली की तरतरी आल्यासारखे वाटते. परंतु, कॉफीच्या सततच्या सेवनाने दातांचा रंग बदलतो. यातून मार्ग काढण्यासाठी डेव्हिड आणि अॅडम नॅगी या भावांनी पारदर्शक कॉफी तयार केली आहे. 'सीएलआर कॉफी' असे त्यांनी या कॉफीला नाव दिले आहे.

चांगल्या प्रतीच्या अरेबिक कॉफीच्या बियांपासून आणि पाण्याचा योग्य वापर करुन नॅगी भावांनी या कॉफीची निर्मिती केली आहे. शिवाय या कॉफीचे वेशिष्ट्य म्हणजे यात कोणत्याही प्रकारचे कृत्रिम संरक्षक (preservatives), स्वाद (artificial flavors) किंवा कृत्रिम गोडवा आणणारे पदार्थ वापरलेले नाहीत. 

याप्रकारची कॉफी बनविण्यासाठी जवळपास तीन महिन्याचा कालवधी लागल्याची माहिती नॅगी भावांनी दिली आहे. सध्या ही कॉफी बनिविण्यासाठी बराच खर्च येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या पारदर्शक कॉफीची निर्मिती कशी करता येईल, तसेच या कॉफीचे दर सामान्याच्या आवक्यात कसे आणता येतील यावर विचार करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सध्या ऑनलाईन या कॉफीची ऑर्डर देणे शक्य आहे. परंतु, जगभरातून विविध कॉफी टेस्टरकडून येणारी मागणी कंपनीला वेळेत पूर्ण करणे शक्य होत नाही. त्यासाठी ऑर्डर दिल्यानंतर ही कॉफी ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी चार आठवड्यांचा कालावधी लागत असल्याची प्रतिक्रीया नॅगी भावांनी दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Colorless Coffee That Doesn’t Stain Your Teeth