चित्रण धूमकेतूवरील भूस्खलनाचे! 

महेश बर्दापूरकर 
सोमवार, 27 मार्च 2017

कॅमेऱ्याच्या वापरातून नवनवीन शोध लागत असून, धूमकेतूवर घडलेले भूस्खलन टिपण्यात संशोधकांना प्रथमच यश आले आहे! युरोपियन स्पेस एजन्सीच्या "रोसेटा' अंतराळयानाने "67 पी' (च्युरुयूमोव्ह-गेरासिमेन्को) धूमकेतूवर "फिली' नावाचा यंत्रमानव 2015मध्ये उतरवला होता. हा यंत्रमानव धूमकेतूवरील सावली असलेल्या भागात उतरल्याने सौरऊर्जेअभावी तो दोन दिवसच कार्यरत राहिला. मात्र, "जिवंत' असेपर्यंत त्याच्या कॅमेऱ्याने अनेक महत्त्वाची छायाचित्रे टिपली व त्यातील एक घटना धूमकेतूवरील भूस्खलनाची असल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. 

"नेचर' या नियतकालिकाच्या 21 मार्च रोजीच्या अंकात 2015मध्ये घडलेल्या भूस्खलनाच्या घटनेच्या चित्रणाचा प्रथमच खुलासा करण्यात आला आहे. माउरिझिओ पाजोला या "नासा'मधील संशोधकाने या घटनेचे पृथःकरण केले आहे. "67 पी' या डम्बेलच्या आकाराच्या धूमकेतूवर उतरलेल्या यंत्रमानवाने टिपलेल्या छायाचित्रांचा अभ्यास पाजोला करीत होते. हा अभ्यास करताना त्यांना धूमकेतूच्या अंधाऱ्या पृष्ठभागावर गडद पांढरा भाग चमकताना दिसला. हा फोटो डिसेंबर 2015मधील होता. त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाल्याने पाजोला यांनी कॅमेऱ्याद्वारे टिपलेली आधीची छायाचित्रे अभ्यासण्यास सुरवात केली. त्यांना 4 जुलै 2015ला टिपलेल्या छायाचित्रामध्ये धूमकेतूच्या उत्तर भागामध्ये दोनशे फूट उंचीचा एक डोंगर दिसला. त्यानंतर 6 दिवसांनी टिपलेल्या छायाचित्रात या भागातून धूळ आणि वाफ बाहेर पडत असल्याचेही पाहायला मिळाले. 15 जुलैला टिपलेल्या छायाचित्रात हा डोंगर गायब झालेला असून, त्या जागी पांढरा व चमकणारा भाग दिसत आहे. ही भूस्खलनाची घटना असल्याचे सिद्ध होत असल्याचे "नेचर'मध्ये प्रदर्शित संशोधन निबंधामध्ये स्पष्ट करण्यात आले असून, अशी घटना प्रथमच कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात आल्याचेही स्पष्ट केले आहे. धूमकेतूचे या भागातील आवरण कोसळल्याने आतमध्ये बर्फाचा थर असल्याचेही निष्पन्न झाले आहे. 
धूमकेतूवरील चढाईच्या मोहिमेतील भूस्खलनाचे चित्रण ही सर्वांत नाट्यमय घटना असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. धूमकेतूवर खडक आणि बर्फाने बनलेला डोंगरही सापडला आहे. ""या छायाचित्रांमुळे धूमकेतू भौगोलिकदृष्ट्या सूर्यमालेतील सर्वाधिक सक्रिय वस्तू असल्याचे सिद्ध झाले आहे. ही घटना पृथ्वीवरील भूस्खलनासारखी नाही. हा धूमकेतू खूप लहान आहे आणि त्यावर गुरुत्वाकर्षण अगदीच नगण्य आहे. त्यामुळे 22 हजार घनमीटरचा डोंगराचा भाग कोसळला नाही, तर तो धुराळ्याप्रमाणे उडाला व धूळ आणि वायूचा ढग तयार झाला. भूस्खलनाची ही घटना व त्यातून धूमकेतूच्या आतील भागात बर्फ असल्याचा शोधही कॅमेऱ्याने टिपलेली घटना खूप महत्त्वाची आहे. त्यातून धूमकेतूच्या धडकेमुळेच पृथ्वीवर पाणी पोचले व त्यातून जीवसृष्टी निर्माण झाली या विधानाला पुष्टी मिळू शकते. धूमकेतूंच्या अंतरंगात अधिक खोल पाहता आल्यास ही प्रक्रिया अधिक स्पष्ट होईल,'' असेही पाजोला यांनी सांगितले. 

धूमकेतू "67पी'ची वैशिष्ट्ये 
संशोधकांनी दिलेले नाव : कॉन्टॅक्‍ट बायनरी 
सूर्याभोवती प्रदक्षिणेचा कालावधी : 6.45 वर्षे 
कक्षा : सूर्यापासून 18 कोटी ते 84 कोटी किलोमीटर 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Comet Landslide Caught in Action