Vikram-S : खासगी प्रक्षेपक ‘विक्रम-एस’ उड्डा़णास सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vikram-S

Vikram-S : खासगी प्रक्षेपक ‘विक्रम-एस’ उड्डा़णास सज्ज

नवी दिल्ली : भारतातील खासगी क्षेत्राच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या पहिल्या प्रक्षेपकाचे, अग्निबाण ‘विक्रम - एस’चे ता. १२ ते १६च्या दरम्यान प्रक्षेपण करण्यात येणार आहे. हैदराबाद येथील स्टार्टअप कंपनी ‘स्कायरूट एरोस्पेस’हा प्रक्षेपक अग्निबाण विकसित केला आहे. ‘प्रारंभ’ असे ‘स्कायरूट’च्या या पहिल्याच मोहिमेचे नामकरण करण्यात आले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपण तळावरून हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. हवामानाची स्थितीपाहून प्रक्षेपणाची अंतिम तारीख ठरविण्यात येईल, अशी माहिती ‘स्कायरूट एरोस्पेस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक पवनकुमार चंदना यांनी आज दिली.

या प्रकल्पाद्वारे अवकाश प्रक्षेपणाच्या क्षेत्रातील भारतातील पहिली खासगी कंपनी होण्याचा मान ‘स्कायरूट एरोस्पेस’ला मिळणार आहे. त्याद्वारे एका नव्या युगाची सुरुवात होणार आहे. भारतातील अवकाश संशोधनाचे क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले करण्याचा निर्णय भारताने २०२०मध्ये घेतला होता. भारताच्या अवकाश संशोधन कार्यक्रमाचे पितामह विक्रम साराभाई यांच्या नावावरून या प्रक्षेपकाचे नाव ‘विक्रम’ ठेवण्यात आले आहे.

कंपनीने यावर्षी मे महिन्यातच ‘विक्रम-१’ प्रक्षेपकासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजिनाची यशस्वी चाचणी केली होती. तसेच गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये स्कायरूटने थ्रीडी प्रिंटेड क्रायोजेनिक इंजिनाचीही यशस्वी चाचणी घेतली होती. कमी वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी या इंजिनांचा वापर करण्यात येणार आहे.

असा आहे ‘विक्रम-एस’

  • ‘सब-ऑर्बिटल’ प्रक्षेपक (ध्वनीच्या दुप्पट ते सहापट वेगाने प्रवासाची क्षमता)

  • इंधन ज्वलनाचे टप्पे - एक

  • तीन ‘पे लोड’ नेण्याची क्षमता