हिरण्यकेशी पात्रातील खडक कॉडझाईट असल्याचे तज्ज्ञाचे मत

हिरण्यकेशी पात्रातील खडक कॉडझाईट असल्याचे तज्ज्ञाचे मत

आजरा - रामतीर्थ परिसराला धार्मिक, आध्यात्मिक व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्याचबरोबर हा परिसर जैवविविधतेने परिपूर्ण असल्याने पर्यावरणीय महत्त्वदेखील वाढत आहे; पण येथे अभ्यासकांनी केलेल्या निरीक्षणामध्ये हिरण्यकेशी नदीच्या पात्रात आढळणारा "कॉडझाईट' हा रुपांतरित खडक निदर्शनास आला आहे. जो लाखो वर्षांपासून नदीच्या पात्रात अस्तित्वात आहे. त्यामुळे या परिसराला भौगोलिकदृष्ट्या वेगळे महत्त्व प्राप्त झाले असून "जिओ टुरिझमला' मोठा वाव आहे.

येथील मृदा, खडक, खडकांची थर रचना, नदी परिसंस्था याचा अभ्यास करण्यासाठी व पाहण्यासाठी अभ्यासक, विद्यार्थी व पर्यटकांना वेगळी संधी प्राप्त झाली आहे. 

भूगर्भशास्त्र अभ्यासक व विवेकानंद कॉलेजचे भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक अभिजित पाटील यांनी या परिसराची नुकतीच भौगोलिक रचनेची पाहणी केली व काही निरीक्षणे नोंदवली. त्यांच्या निरीक्षणातून "कॉडझाईट' या खडकाचे महत्त्व पुढे आले आहे.

ते म्हणाले, ""कॉडझाईट (quartzite) हा खडक रुपांतरित प्रकारचा आहे. तो "कलादगी सुपरग्रुप' या भूशास्त्रीय कालावधीतील आहे. याचे वयोमान 570 ते 1600 दसलक्ष वर्षे या कालावधीतील आहे. पृथ्वीचे वयोमान 4600 दशलक्ष वर्षे इतके पाहता "कॉडझाईट' खडक प्राचीन आहे. राज्यातील 85 टक्के भाग अग्निजन्य (basalt) खडकांनी व्यापला आहे. कॉडझाईट खडक हा 15 टक्के भागावर असून यामध्ये कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व विदर्भाचा काही भाग येतो. रामतीर्थसह चंदगड व आजरा येथेही काही ठिकाणी हे खडक आढळतात. रामतीर्थ येथे नदीच्या जोरदार प्रवाहामुळे खणन व विदारण झाल्याने कॉडझाईट हे खडक उघडे पडल्याचे नदीच्या पात्रात पाहावयास मिळतात. एकाच ठिकाणी दोन वेगळ्या वयाचे रॉक (खडक) येथे पाहायला व अभ्यासाला मिळतात. भूगोल, पर्यावरण व विज्ञानाच्या दृष्टीने हे ठिकाण महत्त्वाचे ठरणारे असून पर्यटनाच्या दृष्टीने अभ्यासकांना पर्वणीच आहे. 

खडक अभ्यासाचे केंद्र 
बेसॉल्ट (basalt) 62 ते 68 दशलक्ष वर्षापासून पृथ्वीतलावर अस्तित्वात आहेत. त्यांच्या आधी लाखो वर्षे कॉडझाईट या खडकाचे अस्तित्व आहे. त्याच्या वयोमानाचा फरक (अनकन्फर्मेटी गॅप) मोठा आहे. खडकांच्या दोन कालावधीच्या जुन्या जिऑलॉजिकल सीमारेषा पाहायला मिळतात. त्यामुळे खडक अभ्यासकांचे केंद्र बनणे गरजेचे असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com