esakal | फेसबुकच्या जाहिराती नको? मग हे करा 
sakal

बोलून बातमी शोधा

फेसबुकच्या जाहिराती नको? मग हे करा 

फेसबुकच्या जाहिराती नको? मग हे करा 

sakal_logo
By
सलील उरुणकर

आपण इंटरनेटवर कोणत्याही प्रकारची माहिती जेव्हा घेतो तेव्हा आपल्या आवडी-निवडींची नोंद कुठे तरी केली जात असते. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या वस्तूंविषयी गुगल किंवा अन्य संकेतस्थळांवर सर्च केल्यानंतर जर तुम्ही फेसबुकवर लॉगिन केले तर त्या वस्तूची जाहिरात तुम्हाला कोपऱ्यात कोठेतरी दिसते. हा निव्वळ योगायोग नसतो, तर तुमच्या वैयक्तिक माहितीचा जाहिरातदारांनी केलेला वापर किंवा गैरवापर असतो. फेसबुकसारखी कंपनी तुमची माहिती थेट कोणालाही विकत नाही. पण, तुमच्या माहितीची मांडणी निनावी; परंतु विशिष्ट पद्धतीने जाहिरात करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना विकली जाते हेही तितकेच खरे. पण आपल्याला जर अशा जाहिराती बघायच्या नसतील तर तसा पर्याय आपल्यासमोर आहे का? याबद्दल अनेकांना माहिती नसते; पण फेसबुकच्या सेटिंग्जमध्ये हा पर्याय असतो. 

फेसबूकमधून लॉगआउट करताना ड्रॉप डाऊन मेन्यूमध्ये लॉगआउट पर्यायाच्या वर तुम्हाला "सेटिंग्ज' दिसेल. त्या सेटिंग्जमध्ये गेल्यावर तुम्हाला डाव्या बाजूला खाली "ऍड्‌स' नावाचा पर्याय दिसेल. त्या "ऍड्‌स'वर क्‍लिक केल्यानंतर तुम्हाला "युवर ऍड प्रेफरेन्सेस' म्हणून संपूर्ण पान दिसेल. त्यामध्ये पहिला पर्याय "युवर इंटरेस्ट' या मथळ्यावर क्‍लिक केल्यानंतर तुम्ही लाइक केलेल्या ऍप्स, गेम्स किंवा अन्य मजकुराची माहिती तुमच्यासमोर झळकेल. "युवर इंटरेस्ट'च्या खालोखाल तुम्हाला दुसरा पर्याय "ऍडव्हर्टायझर्स यू हॅव इंटरऍक्‍टेड विथ' हा दिसेल. या पर्यायामध्ये तुमचा संपर्क क्रमांक माहिती असलेले जाहिरातदार, तुम्ही वापरलेल्या जाहिरातदारांच्या ऍप किंवा संकेतस्थळाची माहिती किंवा ज्या जाहिरातींवर तुम्ही क्‍लिक केले आहे याचा सर्व तपशील तुमच्यासमोर येईल. 

ऍड सेटिंग्जमधील तिसरा पर्याय सर्वांत महत्त्वाचा आहे तो म्हणजे "युवर इन्फर्मेशन'मध्ये तुमची कोणत्या प्रकारची वैयक्तिक आणि संवेदनशील माहिती जाहिरातदारांबरोबर "शेअर' केली जाणार आहे याची यादी. तुम्ही काम करत असलेली कंपनी, कामाचे स्वरूप, पद, शिक्षण, वैवाहिक माहिती अशी सर्व माहिती जाहिरातदारांना द्यायची किंवा नाही, याबाबत तुम्ही निर्णय घेऊ शकता. चौथा महत्त्वाचा पर्याय म्हणजे प्रत्यक्षातील ऍड सेटिंग्ज. आपण कोणते संकेतस्थळ किंवा ऍप वापरतो त्यावर आधारित मोबाईल, संगणक, कनेक्‍टेड टीव्ही अशा विविध उपकरणांवर जाहिराती दिसाव्यात का? असे अनेक पर्याय तुम्ही निवडू शकता. 

loading image