पांढरा रंग असा आहे खास ! वाचा या रंगाचे गुण...

 feature of white color kolhapur
feature of white color kolhapur

पांढरा रंग म्हटलं, की आधी डोळ्यांसमोर येतात ते आकाशातील ढग, बर्फाच्छादित डोंगर, डॉक्‍टरांचा एप्रन, शाळेतील खडू अन्‌ सरस्वतीची प्रसन्न मूर्ती. सात विभिन्न रंगांच्या मिश्रणाने सूर्याचा सफेद प्रकाश बनला आहे. तरीही पांढऱ्यात रंग कोणताच दिसत नाही आणि म्हणूनच रंग नसलेल्या रंगाने बनलेला रंगीत सर्वांत हलका रंग पांढरा.

शुद्धता आणि स्वच्छता, पवित्रता आणि सरळपणा, चांगुलपणा, निरागसपणा म्हणजेच पांढरा. निर्दोषपणा आणि कौमार्य यांच्याशी संबंधित पुन्हा पांढराच रंग आहे. परिपूर्णतेचा पांढरा रंग एक यशस्वी सुरवात दर्शवितो. बहुतेकदा पांढरा रंग कमी वजन, कमी चरबीयुक्त अन्न आणि दुग्धजन्य उत्पादनांशी संबंधित असतो. शुद्ध, स्वच्छ आणि निष्पाप अर्थाने white as snow, शरण जाणे आणि त्याग करणे या अर्थाचा white flag, दुर्मिळ किंवा सांभाळायला अवघड वस्तूंसाठी white elephant, पांढऱ्या दातांना pearly white, झाकून घेणे, लपविणे किंवा गुप्तता सुचविणारा white wash, चांगल्या किंवा निवडक पक्‍क्‍या गोष्टींची यादी म्हणजे white list असे पांढऱ्या रंगाच्या संदर्भात आणखी काही शब्दप्रयोग सापडतील.

यासाठी पांढरा रंग लोकप्रिय

रुग्णालये, डॉक्‍टरांशी संबंधित पांढराच, वैद्यकीय उत्पादनांना प्रोत्साहन देताना, सुरक्षिततेचा सल्ला देण्यासाठी पांढरा रंग वापरू शकतो. सुरक्षितता, संघटना, साधेपणा आणि स्वच्छतेच्या संदर्भांमुळे, तंत्रज्ञानाची उत्पादने, उपकरणे, वैद्यकीय उत्पादने किंवा कार्यालये तसेच आरोग्याशी संबंधित इतर वस्तूंसाठी पांढरा रंग लोकप्रिय आहे. धर्मादाय संस्थांसाठी पांढरा योग्य रंग आहे. ऑफिस किंवा रूम आकाराने लहान आहे, अशा वेळेस पांढरा रंग/ पांढऱ्या रंगाचा वॉलपेपर खोलीला लावल्यास ती आहे त्यापेक्षा थोडी प्रशस्त वाटते. पण, बाकीच्या रंगीत वस्तूंची निवड करून खोलीतील उर्जेचे संतुलन करून घ्यावे लागते.

पांढऱ्या रंगाच्या अतिवापराने डोकेदुखी, आचारात-विचारात थंडपणा, शीतलता, वंध्यत्व किंवा एकटेपणाची/ रिक्तपणाची भावना निर्माण होऊ शकते. अतिप्रखर पांढऱ्या लाईटमध्ये काम करीत राहिल्यास डोळ्यांनाही इजा होऊ शकते. जरी पांढऱ्या रंगात सातही रंगांच्या सकारात्मक गोष्टी एकत्रित झालेल्या असल्या तरी नकारात्मक भावना दूर करण्यासाठी पांढरा रंग वापरता येत नाही.

प्रामुख्याने  इथं आढळतो पांढरा रंग

हाय-टेक उत्पादनांमध्ये साधेपणा सूचित करण्यासाठी पांढरा रंग वापरता येतो. लोगो डिझाइनमध्ये फक्त पांढरा रंग वापरणे तसे अवघडच. पांढऱ्या लोगोला नेहमीच रंगीत पार्श्वभूमीची आवश्‍यकता असते. क्‍लासिक काळा आणि पांढरा लोगोचा सध्या ट्रेंड आहे. (Apple, Adidas, Nike, Puma) लोगो फॅशनेबल, आकर्षक समजले जातात. इंटेल, एचपी, फोक्‍सवॅगन लोगोतही पांढरा रंग प्रामुख्याने आढळतो. लोगोमध्ये पांढरा रंग वापरून चांगुलपणा, स्वच्छता, पारदर्शकता, निरागसपणा, आशावाद, समानता, ऊर्जा आणि आदर्शवाद इत्यादी कंपनीची तत्त्वे, उद्दिष्टे दर्शविली जातात. जसे व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व असते तसे संस्थेचे, कंपनीचेही व्यक्तिमत्त्व असते. ज्या कंपन्या त्यांच्या ब्रॅंडसाठी पांढऱ्या रंगाची निवड करतात, त्या कंपनीचे आदर्श व्यक्तिमत्त्व आणि उदात्त विचारसरणी आहे, असे आपण समजू शकतो. हे ब्रॅंड उत्कृष्टतेच्या शोधात आहेत, असा त्याचा अर्थ असतो.

स्वच्छताप्रिय, नियमांचे पालन...

लहानपणापासूनच आवडता रंग पांढरा आहे अशा खूप कमी व्यक्‍ती आढळतात. आयुष्यातील एखाद्या टप्प्यावर पांढरा रंग आपल्या आवडीचा होऊ शकतो. हा रंग ज्यांना प्रिय असतो, ते लोक शांत सरळ आणि स्पष्टमतवादी असतात. स्वतःच्या विचार-आचारांवर ते नियंत्रण ठेवू शकतात. नाटकीपणा त्यांना बिलकुल जमत नाही. पांढऱ्या रंगावर ज्यांचे प्रेम आहे, अशा व्यक्तींना घर, कार्यालय, आजूबाजूचा परिसर, स्वतःची गाडीही एकदम टापटीप हवी असते. ते आखीव-रेखीव पद्धतीत जगणारे, नियमांचे तंतोतंत पालन करणारे, पैशांच्या बाबतीत आणि एकूणच सर्व बाबतीत सावधगिरी बाळगणारे असतात. स्वतः स्वच्छताप्रिय असल्याने सर्वांनी स्वच्छता आणि नियमाचे पालन केले पाहिजे, अशी अपेक्षा असते. ही झाली पांढऱ्या रंगाची वैशिष्ट्ये. पण, पांढऱ्या रंगाचा नुसता बुरखा घेऊन फिरणाऱ्यांचा आतला रंग कोणता अन्‌ तो ओळखायचा कसा?

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com