इंटरनेटवर भारतीय भाषांचा दबदबा 

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

इंटरनेटवरील भारतीय भाषकांची संख्या 
भाषा युजर्स टक्केवारी 
हिंदी 20.1 38 
मराठी 5.1 9 
बंगाली 4.2 8 
तमिळ 3.2 6 
तेलगू 3.1 6 
(युजर्सची संख्या कोटींमध्ये)

नवी दिल्ली - डिजिटल विश्‍वात भारतीय इंटरनेट युजर्सनी परकी युजर्सना मागे टाकत आपला दबदबा निर्माण केला आहे. विशेष म्हणजे भारतीय भाषकांमध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचेही या निरीक्षणात समोर आले आहे. केपीएमजी आणि सर्च इंजिन गुगलने नुकत्याच केलेल्या सर्व्हेमध्ये ही बाब समोर आली आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेचाही इंटरनेटवर परिणाम झाल्याचे पहायला मिळत आहे. 

2011 ते 2016 या कालावधीमध्ये भारतीय भाषा बोलणाऱ्यांच्या इंटरनेट युजर्सची संख्या 41 टक्‍क्‍यांनी वाढून 23.4 कोटी झालेली आहे. तर इंग्रजी वापरकर्त्यांची संख्या मात्र 17.5 कोटी राहिली आहे. त्यामुळे भारतीय भाषांतील नेट युजर्सनी इंग्रजी भाषिक नेट युजर्सना मागे टाकल्याचे चित्र आहे. या अहवालात 2021 सालापर्यंत भारतीय भाषिक इंटरनेट युजर्सची संख्या 53 कोटींच्या घरात जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. 

इंटरनेटच्या युजर्समध्ये हिंदी भाषिक नेट युजर्सचा दबदबा असल्याचेही समोर आले आहे. याचसोबत भारतीय भाषिक असणारे नव्वद टक्के इंटरनेट युजर्स हे मोबाईलवर नेट वापरत असल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे भारतातील ग्रामीण भागामधील युजर्स इंटरनेटवर सर्वाधिक वेळ घालवित आहेत. ग्रामीण भारतातील प्रत्येक युजर्स प्रत्येक आठवड्याला 487 मिनिटे म्हणजेच आठ तासांहून अधिक काळ इंटरनेटवर व्यस्त असतात. 

डिजिटल बातम्यांचे प्रमाण वाढले 
डिजिटल माध्यमांच्या साहाय्याने प्रत्येक क्षणाला अपडेट राहण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. थोडक्‍यात डिजिटल मीडियाचा आवाका सध्या वाढताना दिसत आहे. सध्या डिजिटल बातम्या पाहणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. अहवालातील माहितीनुसार 2016 मधील इंटरनेटवर बातम्या पाहणारे युजर्स 10.6 कोटी असून, 2021 मध्ये युजर्सची संख्या 28.4 कोटी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आलेली आहे. 

इंटरनेटवरील भारतीय भाषकांची संख्या 
भाषा युजर्स टक्केवारी 
हिंदी 20.1 38 
मराठी 5.1 9 
बंगाली 4.2 8 
तमिळ 3.2 6 
तेलगू 3.1 6 
(युजर्सची संख्या कोटींमध्ये) 

इंटरनेटवरील भारतीय भाषिक युजर्स 
वर्ष भारतीय भाषिक इंग्रजी भाषिक 
2011 4.2 6.8 
2016 23.4 17.5 
(युजर्सची संख्या कोटींमध्ये) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google Translate for 9 Indian languages, 11 more get keyboard support