सवयी बदलून टाकणारा ‘स्टार्टअप’ मंत्र

Startup
Startup

तंत्रज्ञानानं आणि त्याच्याशी संबंधित अनेक स्टार्टअप्सनी गेल्या काही वर्षांत ग्राहकांच्या सवयी आमूलाग्र बदलून टाकल्या आहेत. चित्रपटांसाठी तिकिटांचं बुकिंग करण्यापासून ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर चित्रपट किंवा मनोरंजनाचे इतर कार्यक्रम बघण्यापर्यंत अनेक सवयी या स्टार्टअप्सनी बदलल्या आहेत. अशाच काही उल्लेखनीय स्टार्टअप्सवर एक नजर. 

ओटीटी प्लॅटफॉर्म्स

  • भारतात २०१६मध्ये नेटफ्लिक्सचं आगमन  होण्यापूर्वी भारतातल्या सशुल्क ओटीटी सेवा या प्राथमिक स्तरावरच्या होत्या. तंत्रज्ञान विकसित झाल्यावर, स्मार्टफोन्स सहजपणे उपलब्ध झाल्यावर आणि खिशाला परवडतील असे डेटा प्लॅन्स यांमुळे भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म्स वाढू लागले. नेटफ्लिक्सचा या बाजारपेठेत प्रवेश होण्यापूर्वी व्हिडिओ बघण्याचं क्षेत्र बहुतांश युट्यूबनं व्यापून टाकलं होतं- ज्यात प्रेक्षक त्या त्या कंटेंट क्रिएटर्नसनी टाकलेला कंटेंट बघायचे आणि ही सेवा विनामूल्य होती. त्यामुळे भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी शुल्क घेणं ही गोष्ट तशी अवघड होती. मात्र, गेल्या काही वर्षांत प्रेक्षकांच्या सवयी बदलल्या आहेत आणि प्रेक्षक मनोरंजनाकडे कसे बघत आहेत याचेही आयाम बदलून गेले आहेत. 
  • ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर कन्व्हिनिअन्स असल्यानं डीटीएच प्लॅटफॉर्मकडून ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे वळणाऱ्यांची संख्या वाढत आहे. नव्या पिढीच्या प्रेक्षकांना कॉलेज किंवा ऑफिसातून आल्यावर त्या वेळी टीव्हीवर चालू असणाऱ्या कार्यक्रमांपेक्षा त्यांच्या पसंतीचे कार्यक्रम बघायचे असतात. तंत्रज्ञानसज्जतेमुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडीचे कार्यक्रम कुठूनही बघता येतात. पारंपरिक डीटीएच सेवांमध्ये मात्र त्या वेळी घरात असणं आवश्यक असतं. या ओटीटी सेवांचं मसिक शुल्क हे परवडणारं म्हणजे जवळजवळ एका चित्रपटाच्या तिकिटाच्या किंमतीएवढं असूनही ते त्यांच्या प्रेक्षकांसाठी विशेष कार्यक्रम सादर करतात. 
  • ओटीटीमुळे प्रेक्षकांकडून कशा प्रकारे मनोरंजनाचे कार्यक्रम बघितले जातात तेवढाच पॅटर्न बदलला आहे असं नाही, तर माध्यम क्षेत्रात अशा कार्यक्रमांची निर्मिती कशी केली जाते त्याचीही पद्धत बदलली आहे. पूर्वी चित्रपट बहुतांश आघाडीचे अभिनेते घेऊन केले जायचे आणि त्यांच्या कथानकांमध्ये फार प्रयोग केले जात नसत. आज मात्र ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी वैयक्तिक चित्रकर्मींना त्यांनी तयार केलेले चित्रपट त्यांच्या प्लॅटफॉर्मवर प्रकाशित करायचा आत्मविश्वास दिला आहे. पूर्वी याच्या किल्ल्या फक्त बड्या प्रॉडक्शन हाऊसेसच्याच हाती असायच्या. 
  • मध्यम बजेटचे चित्रपट यशस्वी झाल्यानं आणि तशा प्रकारचे चित्रपट बघितले जायला लागल्यानं चित्रकर्मींनासुद्धा त्यांच्या कंटेंटबाबत प्रयोगशील होण्यासाठी प्रोत्साहन मिळालं. अशा प्रकारच्या प्रयोगांचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे नेटफ्लिक्सवरचा, विक्रमादित्य मोटावने दिग्दर्शित ‘एके व्हर्सेस एके’ हा डार्क कॉमेडी थ्रिलर. यामध्ये अनुराग कश्यप आणि अनिल कपूर हे ‘अनुराग कश्‍यप’ आणि ‘अनिल कपूर’ यांच्याच व्यक्‍तिरेखा निभातात आणि कथा अर्थातच वेगळी आणि नाट्यमय आहे. अशा प्रकारच्या अतिशय वेगळ्या प्रयोगांमुळे प्रेक्षकांच्या दृष्टीनं चांगला कंटेंट मिळण्याच्या शक्यता वाढतात. ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी चित्रपट तयार करण्यातला मुख्य फायदा म्हणजे निर्मितीच्या स्थितीत असताना होणाऱ्या खर्चातली कपात. त्यामुळे त्यांचाही फायदा वाढतो. 
  • कोरोना साथीमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे ओटीटी प्लॅटफॉर्म्स हे चित्रपटगृहांना समर्थ पर्याय म्हणून पुढे आले. प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स किंवा इतर आघाडीच्या प्लॅटफॉर्म्सवर दर गुरुवारी आणि शुक्रवारी नवीन, विशेष कंटेंट सादर होत असल्यानं लोकांना त्यांच्या घरी बसून मनोरंजन करून घेण्यासाठी एक रास्त पद्धत सापडली आहे.

बुकिंग ॲप्स -
bookmyshow

  • बुकमायशोचा मनोरंजन क्षेत्रातील बुकिंग बाजारपेठेत प्रवेश होण्यापूर्वी चित्रपट आणि चित्रपटगृह या दोन्हीचे युजर एक्स्पिरिअन्स अतिशय वेगळे होते. प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये वेळा आणि शोज जाणून घेण्यासाठी अंदाज लावायला लागायचे किंवा चित्रपटगृहांमध्ये किंवा इतर ठिकाणी मित्रमंडळींशी संपर्क असणं गरजेचं असायचं. अचानक प्लॅन्स ठरले, तर अनेक वेळा चित्रपटांची तिकिटं न मिळाल्यानं आनंदावर विरजण पडायचं. चित्रपटांना जाण्याचं नियोजन प्रेक्षकांना एक दिवस आधी करायला लागायचं आणि प्रत्यक्ष चित्रपट सुरू होण्यापूर्वी आधी बरेच तास तिकिटं मिळवण्यासाठी रांगांमध्ये उभं राहायला लागायचं. या सगळ्या गोष्टीच खरं तर बुकमायशोच्या संस्थापकांसाठी एक संधी ठरली आणि त्यांनी प्रेक्षकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि बुकिंग जलदपणे आणि कोणत्याही अडथळ्यांविना पार पडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला. 
  • आता तर बुकमायशोच्या माध्यमातून मनोरंजनाशी संबंधित कोणत्याही गोष्टींची-म्हणजे चित्रपट, नाटकं, जत्रा, खेळ अशा कोणत्याही गोष्टींची तिकिटं विकली जातात. या ॲपमुळे त्या वेळी चित्रपटगृहामध्ये किती सीट्स उपलब्ध आहेत हेही आपल्याला कळतं. बुकमायशोचं रेव्हेन्यू मॉडेल अगदी सोपं आहे. त्यांचं साठ टक्के उत्पन्न हे तिकिटांच्या विक्रीसाठीच्या फीमधून येतं. बाकीचं उत्पन्न हे त्यांच्या प्लॅटफॉर्मवर चित्रपट, लघुपट किंवा इतर कोणत्याही कलाकृतींची जाहिरात करण्यातून मिळतं.

IRCTC

  • बुकमायशोसारखाच परिणाम आयआरसीटीसीनं रेल्वेच्या तिकिटांच्या बुकिंगच्या क्षेत्रात साधला. रेल्वेच्या तिकिटांची प्रक्रियाही पूर्वी अशीच खूप किचकट होती; पण आयआरसीटीसीचा प्रवेश झाला आणि त्यांनी ही प्रक्रिया सोपी बनवली. भारतीय रेल्वेनं रेल्वे तिकिटांची विक्री वेबसाइटच्या आणि मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करण्यासाठी नेमलेली आयआरसीटीसी ही एकमेव अधिकृत कंपनी आहे. 
  • रेल्वेतून ३१ ऑगस्ट २०१९पर्यंत रोज चौदा लाख प्रवासी प्रवास करत होते आणि त्यापैकी ७२.६० टक्के तिकिटं ही ऑनलाइन माध्यमातून विकली जात होती. याचाच अर्थ www.irctc.co.in आणि Rail Connect यांच्या माध्यमातून रोज ८.४ लाख तिकिटांची विक्री होत होती. ही कंपनी सध्या चार वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करते आहे. ही चार क्षेत्रं म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून तिकिटविक्री, ‘रेल नीर’च्या माध्यमातून पिण्यासाठीचं पॅकेज्ड पाणी, केटरिंग आणि पर्यटन. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com