आरोग्याचा कानमंत्र- आरोग्य सेतू 

अशोक गव्हाणे 
शनिवार, 18 एप्रिल 2020

सध्या मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सध्याच्या काळात आपल्या मोबाईलमध्ये "आरोग्य सेतू' हे ऍप डाउनलोड करून घेतल्यास आणि व्यवस्थित माहिती दिल्यास ते सर्वांच्याच फायद्याचे आहे. 

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. देशातील अनेक लोक "कोरोना'बाधित होत असून, त्यांच्यावर उपचार चालू आहेत. खबरदारी म्हणून अनेकांना क्वारंटाईनही करण्यात येत आहे. अशावेळी काहीजण सर्दी, खोकला झाल्यामुळे अस्वस्थ होत आहेत. साहजिकच अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. "कोरोना' हा आजार संसर्गजन्य असल्याने सरकार अनेक पातळ्यांवर दक्षता घेत आहे. तेव्हा आपणही काटेकोरपणे काळजी घेणे आवश्‍यक असून, देशाचा जबाबदार नागरिक म्हणून आपली अचूक माहिती सरकारदरबारी असणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या मोबाईल फोनमध्ये सरकारचे "आरोग्य सेतू' हे ऍप असणे आवश्‍यक आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, बहुतेकांकडे ऍन्ड्रॉईड मोबाईल पाहायला मिळतो. सध्याच्या काळात आपल्या मोबाईलमध्ये "आरोग्य सेतू' हे ऍप डाउनलोड करून घेतल्यास आणि व्यवस्थित माहिती दिल्यास ते सर्वांच्याच फायद्याचे आहे. कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आपण आल्यास हे ऍप ट्रॅक करण्यास आपल्याला मदत करते. म्हणजेच, हे एक प्रकारचे ट्रॅकिंग ऍप आहे. या ऍपद्वारे आपल्याला "कोरोना'विषयी सावध केले जाईल. "कोरोना'संबंधी ताजी माहिती मिळावी, हा या ऍपमागचा उद्देश आहे. या ऍपच्या मदतीने आपण आपत्कालीन ई-पासही घेऊ शकतो. ऍप डाउनलोड केल्यानंतर हव्या त्या प्रादेशिक भाषेची निवड करता येते. हे ऍप इंग्रजीसह भारतातील एकूण 19 भाषांमध्ये उपलब्ध आहे. डाऊनलोड केल्यानंतर ऍप आपला मोबाईल नंबर विचारते. मोबाईल नंबर दिल्यानंतर "ओटीपी' देऊनच ऍप पुढील कार्यासाठी सक्रिय होते. "कोरोना'पासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, याविषयीही ऍपद्वारे सविस्तर माहिती दिली जाते. "ऍप अलर्ट'द्वारे विलगीकरणाविषयी सूचना आणि लक्षणे आढळून येत असल्यास काय करावे, याविषयी मदत केली जाईल आणि योग्य ती माहितीही दिली जाईल. 

डाउनलोड केल्यानंतर हे ऍप आपल्याला माहिती स्वरुपातील काही प्रश्न विचारते. ती माहिती देणे आवश्‍यक आहे. या माहितीच्या आधारे हे ऍप आपल्याला अधिक चांगली मदत करू शकते. हे ऍप प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून एक प्रकारची चाचणी घेते. या चाचणीमध्ये आपल्याला काही पर्याय देऊन प्रश्न विचारले जातात. उदा. कोणत्या प्रकारची लक्षणे आहेत? आपल्याला कोणती अडचण आहे काय? तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब, फुफ्फुसांचा आजार अशापैकी कुठला आजार आहे काय? गेल्या चौदा दिवसांत आपण आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे काय? अशा प्रकारचे हे प्रश्न असतात. 

"आरोग्य सेतू 'ऍप वापरून आपण आपल्या कुटुंबाचे, मित्रांचे आणि स्वतःचे "कोरोना'पासून संरक्षण करू शकता आणि "कोरोना"विरोधातील लढ्यात आपली माहिती सरकरदरबारी देऊन देशाला मदत करू शकता. हे ऍप डाउनलोड केल्यानंतर आपले लोकेशन सेट करावे. तसेच, आपले ब्लूटूथ नेहमी चालू ठेवावे. त्यामुळे ब्लुटूथ किंवा लोकशनच्या आधारे जवळपासचे डिव्हाईस ट्रेस होऊ शकेल. या ऍपमध्ये दिलेला डेटा हा फक्त सरकारशी संलग्न असणार आहे. ऍप आपले नाव किंवा नंबर कोणत्याही परिस्थितीत जाहीर करत नाही. 

"कोरोना'पासून बचाव करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती या ऍपमध्ये आहे. उदा. सामाजिक अंतर कसे टिकवायचे, सुरक्षित कसे राहायचे, याबाबतच्या सर्व उपाययोजना या ऍपमध्ये दिलेल्या आहेत. हे ऍप आपण "गुगल प्ले स्टोअर'वरून किंवा आरोग्य विभागाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकतो. 

ऍप वापराच्या क्रमवार पायऱ्या 

1) हे ऍप डाऊनलोड करा. 
2) ब्लूटूथ आणि लोकेशन मोड चालू करा. 
3) आपले लोकेशन सेट करा. 
4) ऍपमध्ये माहितीसाठी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित द्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health Mantra - aarogya setu app