कोट्यवधी युझर्सचा फेसबुक डेटा पुन्हा लीक

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 एप्रिल 2019

नवी दिल्ली : डेटा लीकमुळे फेसबुकच्या अडचणी सतत वाढत आहेत. आता फेसबुकच्या कोट्यवधी यूजरचा डेटा ऍमेझॉनच्या क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हरवर लीक झाला असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. 

नवी दिल्ली : डेटा लीकमुळे फेसबुकच्या अडचणी सतत वाढत आहेत. आता फेसबुकच्या कोट्यवधी यूजरचा डेटा ऍमेझॉनच्या क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हरवर लीक झाला असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. 

सायबर स्पेस कंपनी अपगार्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकसाठी काम करणाऱ्या अन्य दोन कंपन्यांनी (थर्ड पार्टी) यूजरचा डेटा ऍमेझॉनच्या सर्व्हरवर स्टोर केला आहे. तो डेटा सहजपणे इतरांना डाउनलोड करता येऊ शकतो. त्यातील एका कंपनीने 146 गीगाबाइट डेटा गोळा केला आहे. त्यात 54 कोटी यूजरच्या लाइक्स, कॉमेंट आणि अकाउंटच्या नावांचा समावेश आहे. नक्की किती यूजरचा डेटा त्यात आहे, याची नेमकी आकडेवारी अद्याप समजू शकलेली नाही. तर दुसऱ्या एका कंपनीने 22 हजार फेसबुक यूजरचे 'अनप्रोटेक्टेड' पासवर्ड स्टोर केले आहेत. 

अपगार्डच्या सायबर रिस्क रिसर्चचे डायरेक्टर ख्रिस विकरी यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व डेटा फेसबुक इंटिग्रेशनद्वारे गोळा करण्यात आला आहे. फेसबुक कंपनी इतर कंपन्यांना (थर्ड पार्टी) एखादे अॅप किंवा वेबसाइटवर आपल्या माध्यमातून साइन इन करण्याची परवानगी देते. त्यामुळे यूजरना डेटा सुरक्षित ठेवण्याची हमी देण्याचा कोणताही पर्याय फेसबुककडे शिल्लक राहत नाही. 'यूजरचा डेटा सार्वजनिक डेटाबेसवर स्टोर करणे फेसबुकच्या धोरणांविरोधात आहे. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर तात्काळ ऍमेझॉनशी संपर्क साधून डेटा हटवण्यात आला. यूजरचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,' असे फेसबुकच्या प्रवक्त्यांनी सांगितले. 

दरम्यान, ऍमेझॉनने मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundreds of millions of Facebook records exposed on Amazon cloud servers