भारत बांधतोय जगातला सर्वांत मोठा 'न्युक्‍लिअर रिऍक्‍टर' 

सम्राट कदम @namastesamrat 
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

- जगातल्या सर्वांत मोठा 'प्लाझ्मा' (पदार्थाची चौथी अवस्था) ''फ्युजन न्युक्‍लिअर रिऍक्‍टर' मधील महत्वाचा भाग एक भारतीय कंपनी बांधत आहे. दक्षिण फ्रान्समधील 'इंटरनॅशनल थर्मोन्युक्‍लीअर एक्‍सपिरीमेंटल रिऍक्‍टर'तर्फे (आयटीईआर) नुकतीच या संबंधीची माहिती देण्यात आली. - तब्बल तीन हजार 850 टनाचा क्रायोस्टॅट (तापमान नियंत्रित ठेवणारा) 'एल अॅण्ड टी.' ही भारतीय कंपनी बांधत आहे. सुमारे 42 हेक्‍टरवर ही सुविधा पुरविण्यात येणार आहे. 

पुणे : जगातल्या सर्वांत मोठा 'प्लाझ्मा' (पदार्थाची चौथी अवस्था) "फ्युजन न्युक्‍लिअर रिऍक्‍टर' मधील महत्वाचा भाग एक भारतीय कंपनी बांधत आहे. या संबंधीची माहिती दक्षिण फ्रान्समधील 'इंटरनॅशनल थर्मोन्युक्‍लीअर एक्‍सपिरीमेंटल रिऍक्‍टर'तर्फे (आयटीईआर) नुकतीच देण्यात आली. तब्बल तीन हजार 850 टनाचा क्रायोस्टॅट (तापमान नियंत्रित ठेवणारा) 'एल ऍण्ड टी.' ही भारतीय कंपनी बांधत आहे. सुमारे 42 हेक्‍टरवर ही सुविधा पुरविण्यात येणार आहे. 

'आयटीईआर'द्वारे विद्युत चुंबकीय अथवा चुंबकीय बलाशी निगडित विविध वैज्ञानिक प्रयोग, स्वच्छ ऊर्जा निर्मिती असे उद्दीष्ट्ये ठेवून या रिऍक्‍टरची निर्मिती करण्यात येत आहे. आंतररराष्ट्रीय स्तरावर काही देशांनी एकत्र येऊन सुरू केलेला हा प्रकल्प पुढील साडे सहा वर्षात कार्यान्वित होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. "भारताने तयार केलेला क्रायोस्टॅटचे आकारमान हे 16 हजार घन मीटर आहे. यांची उंची आणि रुंदी दोनीही 30 मीटर आहे. त्याच्या अवाढव्य वजनामुळे त्याला चार भागांमध्ये तयार करण्यात आले आहे.'', अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 35 देशांनी या प्रकल्पामध्ये सहभाग नोंदवला आहे. 

'प्लाझ्मा फ्युजन न्युक्‍लिअर रिऍक्‍टर' 
- वातावरण बदलाला आणि जागतिक तापमान वाढीसाठी स्वच्छ इंधनाचा पर्याय 
- अजूनही प्रयोग चालू, फ्युजन ऊर्जेमुळे पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांची गरज संपुष्टात 
- घातक किरणोत्सर्गाचा धोका नाही 
- जगातील आत्तापर्यंतची सर्वांत गुंतागुंतीची अभियांत्रिकी रचना 
- आत्तापर्यंत 65 टक्के काम पूर्ण 
- सूर्यापेक्षा दहा पटीने जास्त असणार तापमान (150 दशलक्ष डिग्री सेल्सिअस) 
- युरोपसह जपान आणि चीनचा महत्त्वपूर्ण सहभाग 

"आयटीईआर'च्या प्रवक्‍त्या सबिना ग्रिफित्स म्हणाल्या,"जगातला पहिला फ्युजन न्युक्‍लिअर रिऍक्‍टर कार्यान्वित होत आहे. डिसेंबर 2025 मध्ये आपण पूर्ण क्षमतेने विद्युत निर्मिती करू शकतो. त्यापुढील दहा वर्षांनी हा रिऍक्‍टर पूर्ण क्षमतेने ड्युटेरीअम ट्रीटेरीअ प्रक्रिया करेल.'' 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India is building the world's largest 'nuclear reactor'