'हँडसॉनिक'वर उमटले भारतीय पारंपारिक वाद्यांचे सूर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

नाशिकच्या धुमाळ कुटुंबियांच्या संशोधनास यश
युट्यूबसह अन्य विविध माध्यमांतून शोधाशोध केली. या दरम्यान वडील गोरखनाथ धुमाळ, काका धनंजय धुमाळ यांची मदत घेत संशोधन कार्य सुरू ठेवले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून विविध प्रकारचे पारंपारीक वाद्ये आता हँडसॉनिक यंत्रावर उपलब्ध झालेले आहे.

नाशिक : अन्य क्षेत्राप्रमाणे संगीत क्षेत्रात तंत्रज्ञानाचे महत्वपूर्ण बदल झाले आहेत. रोलँड कंपनीच्या हँडसॉनिक हे यंत्र याचाच एक भाग. मात्र या यंत्रावर आतापर्यंत केवळ पाश्‍चिमात्य वाद्य उपलब्ध करून दिलेले होते. मात्र नाशिकमधील स्वरांजय धुमाळ व कुटुंबियांनी संशोधन आणि प्रोग्रॅमिंगमध्ये बदल करत तबला, पखवाजपासून संभळ, दिमडी या दुर्मिळ वाद्यांपासून दाक्षिणात्य, पंजाबी, बंगाली वाद्य वाजवून दाखविले आहे. भारतातील हा पहिलाच प्रयोग असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विविध स्केलचा तबला याचप्रमाणे अन्य वाद्य घेऊन जावे लागतात. यामुळे कलावंतांची चांगलीच दमछाक होत असते. यावर काय तोडगा काढता येईल, या विचाराने साधारणत: दोन वर्षांपूर्वी स्वरांजय धुमाळ या युवा संगीतकाराने संशोधनाला सुरवात केली. हँडसॉनिक या यंत्रावर पाश्‍चिमात्य वाद्ये उपलब्ध करून दिलेली होती. या धर्तीवर आपल्याला भारतीय वाद्ये समाविष्ट करून घेता येतील काय, यावर संशोधन सुरु केले. युट्यूबसह अन्य विविध माध्यमांतून शोधाशोध केली. या दरम्यान वडील गोरखनाथ धुमाळ, काका धनंजय धुमाळ यांची मदत घेत संशोधन कार्य सुरू ठेवले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून विविध प्रकारचे पारंपारीक वाद्ये आता हँडसॉनिक यंत्रावर उपलब्ध झालेले आहे.

खऱ्या-खुऱ्या वाद्यांप्रमाणे अनुभूती
या दरम्यान विविध वाद्यांचे वादन करून त्याचे प्रोग्रामींग स्वरांजय धुमाळ याने केले. प्रक्रियामध्ये उपकरणात येणाऱ्या तांत्रिक अडीअडचणींबाबत थेट कंपनीशी संपर्क करत सुधारणा करून घेतल्या. यशस्वी प्रोग्रामींगनंतर विविध वाद्ये यशस्वीरित्या वाजविता येऊ लागले आहेत. एखाद्या खऱ्या वाद्याच्या आवाजाप्रमाणेच या उपकरणातील वादनाने अनुभूती येत असल्याचे स्वरांजयचे म्हणणे आहे.

या वाद्यांचा केलाय समावेश
पारंपारीक वाद्य असलेल्या तबला, पखवाज, ढोलकी, ढोलक, ढोल-ताशा यांसह संभळ, दिमडी तसेच दाक्षिणात्य वाद्यांतील मृदुंगम, थविल, इडिक्‍का, घट्टम, पंजाबी वाद्यांतील कच्ची ढोल, बंगाली वाद्य असलेलेला खोळ यांसह मंजरा, डफ या वाद्यांचा प्रोग्रामींगद्वारे समावेश करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian music on handsonic