आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्व्हर पुरस्कार डॉ. प्रमोद चौधरी यांना जाहीर; ठरले पहिले भारतीय

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 19 September 2020

 प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांना प्रतिष्ठेचा जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर पुरस्काराने  सन्मानित केले  जाणार आहे.

पुणे :  प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांना प्रतिष्ठेचा जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर पुरस्काराने  सन्मानित केले  जाणार आहे. यासंबंधीची घोषणा अमेरिका स्थित बायोटेक्नॉलॉजी इनोव्हेशन ऑर्गनायझेशन (बीआयओ) ने केली.  हा जागतिक सन्मान प्राप्त करणारे  डॉ. चौधरी पहिले भारतीय तर दुसरे आशियाई असतील. जैव तंत्रज्ञान उद्योग समूहात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या "बायो इम्पेक्ट डिजिटल कॉन्फरन्स" दरम्यान २२ सप्टेंबर २०२०  रोजी हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

जगातील ३० देशांत कार्यरत असलेल्या, जैव तंत्रज्ञानाची सर्वात मोठी व्यापार संघटना असलेल्या बायो ने आयोवा बायोटेक्नॉलॉजी असोसिएशनच्या मदतीने २००८ पासून हा पुरस्कार  देण्यास सुरूवात केली. अमेरिकेतील  थोर कृषी शास्त्रज्ञ,  संशोधक आणि पर्यावरणतज्ज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या नावाने दिला जाणारा हा सर्वोच्च बहुमान जगभरातील जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो. 

“बायो इम्पॅक्ट पुरस्काराचे मानकरी हे बायोइकोनोमीला प्रगतीपथावर नेण्यासाठी नेतृत्व प्रदान करतात,” असे ‘बायो’ संस्थेच्या औद्योगिक व पर्यावरण विभागाच्या उपाध्यक्षा स्टेफनी बॅचलर यांनी नमूद केले. “वाढत्या आव्हानांचा – मग ती कोरोनामुळे उद्भवलेली अभूतपूर्व संकटे असोत, हवामानबदलाची समस्या असो किंवा शाश्वत विकासासाठी अर्थव्यवस्था प्रस्थापित करणे असो. समर्थपणे मुकाबला करण्याचे सामर्थ्य जैवतंत्रज्ञानामध्ये आहे, हेच डॉ. प्रमोद चौधरी यांच्या दूरगामी दृष्टीकोनाने अधोरेखित होते. त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान जाहीर झाल्याचे पाहून मला खूप अभिमान वाटत आहे.”

पुण्यात सत्ताधाऱ्यांची "कोंडी' 

डॉ. चौधरी यांना जैवउद्योगातील जागतिक ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून मान्यता देताना भारताच्या तंत्रज्ञानातील कौशल्याची व शक्तीची पुष्टी करणारा हा पुरस्कार ठरला आहे. 
या वेळी बोलताना डॉ चौधरी म्हणाले, "मला हा पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होत आहे आणि मला नम्रपणे नमूद करावेसे वाटते की औद्योगिक जैवविज्ञानातील माझे  काम जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या  कार्याला समर्पक आणि पुढे नेणारे आहे. हा सन्मान माझ्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या कामासाठी ३५ वर्षांच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नांची फलश्रुती आहे असे मला वाटते.  हरित पर्यावरण, समाजबांधव आणि त्यांची समृद्धी यांच्याबद्दलच्या ध्यासामुळे कृषी-प्रक्रियांचे खरे मूल्य ओळखून त्यावर आधारित शाश्वत उपाय  शोधून ग्रामीण अर्थव्यवस्थेस चालना देणारी जैव तंत्रज्ञानाधारित अर्थव्यवस्था निर्माण करण्याकामी मी प्राज परिवाराला प्रोत्साहित करू शकलो. मी हा पुरस्कार टीम प्राज आणि जगभरात उज्ज्वल भविष्यासाठी शाश्वत उपाय शोधण्याच्या प्रवासामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भाग घेतलेल्या सर्वांच्या प्रयत्नांना समर्पित करतो.

शंभर वर्षांपूर्वी ज्यांनी अक्षय्य कृषी कच्च्या मालापासून जैव-आधारित मूल्यवर्धित उत्पादने आणि जैवऊर्जा मिळविण्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाची सुरुवात केली होती त्या जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या दूरदृष्टीला अनुसरून काम करणाऱ्या मोजक्या द्रष्ट्यांसाठी दरवर्षी दिला जाणारा कार्व्हर पुरस्कार प्रेरणादायी ठरत आहे.  औद्योगिक जैवतंत्रज्ञान हे कार्व्हरच्या स्वप्नाचे आधुनिक काळातील स्वरूप आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International Carver Award Dr Announced to Pramod Chaudhary Became the first Indian