
प्रवास आणि स्थित्यंतरे 'ट्वीटर'च्या लोगोची..
सोशल माध्यमांवरची टीवटीव म्हणजे 'ट्वीटर' या ट्वीटरवर जगभरातले करोडो युसर्स व्यक्त होत असतात. सध्या ट्वीटर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ते त्याच्या पराग आग्रवाल या सीईओला दूर करण्याच्या एलाॅन मस्क यांनी उचललेल्या पावलामुळे....या ट्वीटरचा लोगो आहे एका टीवटीव करणाऱ्या पक्ष्याचा...जगभरात प्रसिद्ध लोगोच्या जन्माची ही कहाणी..... (Journey of Twitter Logo)
ट्वीटरचा जन्म २१ मार्च २००६ चा. किंबहुना याच दिवशी जगातले पहिले ट्वीट प्रसिद्ध झाले. छोट्या गटांमध्ये एसएमएसद्वारे संवाद साधण्याच्या संकल्पनेतून ट्वीटरचा (Twitter) उदय झाला. ही कल्पना होती न्यूयाॅर्क विद्यापीठाचा पदवीही न मिळवू शकलेल्या जॅक डाॅर्सी या तरुणाची. पुढे ओडिओ (ODEO) या एका पाॅडकास्ट कंपनीने ही संकल्पना उचलून धरली आणि या कंपनीच्या संचालकांनी एक संपूर्ण दिवस डोकेफोड करुन अखेर या प्रणालीच्या वापराचा निर्णय घेतला. सुरुवातीचे या प्रणालीचे सांकेतिक नांव twttr असे होते.
हेही वाचा: ट्विटर वापरण्यासाठी लागणार पैसे, इलॉन मस्क यांची मोठी घोषणा
२१ मार्च २००६ रोजी "just setting up my twttr" असे लिहित आपला पहिला संदेश प्रसारित केला. twttr असे विचित्र नाव ठेवण्यामागेही एक कारण होते. त्यावेळी twitter.com हे डोमेन नांव आधीच वापरात होते. नंतर हे डोमेन ओडिओ कंपनीने विकत घेतले.
कंपनीची स्थापना झाल्यानंतर डाॅर्सी हा कंपनीचा पहिला सीईओ बनला. पुढच्या काळात ट्वीटरने अनेक उतार-चढाव पाहिले. बिल गेट्स, बराक ओबामा, एलाॅन मस्क यांच्यासारख्या मान्यवरांची ट्वीटर खाती हॅक करण्यासारखे प्रकारही घडले. नायजेरियासारख्या काही देशांनी ट्वीटरवर बंदी आणण्याचे प्रकारही घडले.
सुरुवातीच्या काळात केवळ १४० अक्षरांच्या संदेशापुरते मर्यादित असलेल्या ट्वीटरवरुन फोटो, चित्रे आणि व्हिडिओही पाहता यायला लागले. त्यामुळे ट्वीटरची लोकप्रिताही अनेक पटींनी वाढली. आजही राजकीय व्यक्ती एकमेकांवर टीका करण्यासाठी ट्वीटरचा वापर करताना आपणही पहातो.
सुरुवातीच्या काळात ट्वीटरचा सहसंस्थापक नोहा ग्लास यांनी एक लोगो तयार केला. तो अत्यंत ओबडधोबड असाच होता. हा लोगो 'युथफूल' असल्याचा ग्लास यांचा दावा होता. या लोगोमध्ये हिरव्या रंगाची लयलूट करण्यात आली होती.

ट्वीटरचा सुरुवातीचा लोगो
१५ जुलै २००६ रोजी ट्वीटरचे अधिकृत लाँचिंग करण्याचे ठरले. त्यावेळी कंपनीच्या संचालकांनी ग्राफिक डिझायनर लिंडा गाविन यांना लोगो तयार करण्यास सांगितले. त्यांना त्यासाठी फक्त एक दिवसाचा अवधी होता. त्यांनी निळ्या रंगाचा वापर करत एक लोगो बनवला, जो १४ सप्टेंबर, २०१० पर्यंत वापरात होता.

ट्वीटरचा दुसरा लोगो

ट्वीटरचा तिसरा लोगो
सप्टेंबर २०१० मध्ये ट्वीटरच्या लोगोमध्ये एक पक्षी दिसायला लागला. नॅशनल बास्केटबाॅल असोसिएशन (NBA) चा सदस्य आणि अमेरिकेचा माजी व्यावसायिक बास्केटबाॅलपटू लॅरी बर्डचे नाव या लोगोला देण्यात आले. या लोगोच्या अलीकडील अक्षरांचा निळा रंग बदलून काळा रंग करण्यात आला. हा नवा लोगो आणि त्यावरचा 'लॅरी द बर्ड' ट्वीटर फाॅलोअर्सनी उचलून धरला.

ट्वीटरचा सध्याचा लोकप्रिय लोगो
ट्वीटरचे तिसरे लोगो डिझाईन ५ जून २०१२ रोजी वापरात आले. यात लॅरी द बर्डच्या अगोदर असलेली अक्षरेही काढून टाकण्यात आली आणि उरला फक्त टिवटिव करणारा 'लॅरी द बर्ड'. जगभरातल्या ट्वीटर युझर्सना अखंड टिवटिव करण्यासाठी प्रोत्साहित करणारा!
Edited By - Amit Golwalkar
Web Title: Journey Of Twitter Logo
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..