भारतात सर्वाधिक काळ विकल्या गेलेल्या कार.! जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतात सर्वाधिक काळ विकल्या गेलेल्या कार.! जाणून घ्या

भारतात विवध गाड्या येऊन गेल्या ज्या भरपूर कालावधीसाठी ग्राहकांसाठी उपलब्ध होत्या आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या. आजही त्यामधील काही गाड्यांना माेठ्या संख्येने मागणी आहे परंतु नियमानूसार त्या आता नागरिकांना मिळत नाहीत. 

भारतात सर्वाधिक काळ विकल्या गेलेल्या कार.! जाणून घ्या

भारतात सध्या अनेक नवनवीन कार आणि बाईक्स प्रत्येक महिन्यात लाँच हाेत असतात. अनेक वाहननिर्मिती करणाऱ्या कंपनी देखील भारतात येऊ पाहत आहेत. भारत हा जगभरात वाहनांसाठी एक मोठी बाजारपेठ म्हणून समोर आला असून त्या दृष्टीने वेगाने प्रगती करत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा ग्राहकांना इतके पर्याय उपलब्ध नव्हते. आजच्या काळात ६-८ वर्षाहून अधिक एकच गाडी वापरली असे शक्यतो होत नाही. थोड्या थोड्या वर्षांनी गाडी बदलणे ही आजकालची गरज बनली आहे. अशातच भारतात अशा देखील गाड्या येऊन गेल्या ज्या भरपूर कालावधीसाठी ग्राहकांसाठी उपलब्ध होत्या आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या. नजर टाकुयात अशाच काही भारतात सर्वाधिक काळ विकल्या गेलेल्या काही कार्सवर. 

हिंदुस्थान अम्बॅसॅडर 

कालावधी : १९५७ ते २०१४ 
एकूण महिने : ६८४ महिने 

अम्बॅसॅडर हे नाव भारतातील सर्व लोकांना परिचयाचे आहे. आजही अनेक सरकारी अधिकारी याच गाडीस पसंती देतात आणि त्याचा वापर होतो हे आपल्याला पाहण्यास मिळत आहे. त्या काळात अम्बॅसॅडर ही श्रीमंतांची , राजकारण्यांची आणि उद्योजकांची गाडी मानली जात असत. भारतीय कारच्या इतिहासातील हा एक महत्वाचा अध्याय आहे. अनेक वर्ष अम्बॅसॅडरने ग्राहकांच्या मनावर अधिराज्य केले. भारतात सर्वाधिक काळ विकल्या गेलेल्या गाडीचा बहुमान अम्बॅसॅडरच्या नावावर आहे. टॅक्सी चालकांना विकत घेता यावी म्हणून कंपनीने अम्बॅसॅडर मध्ये डिझेल इंजिनचा पर्याय उपलब्ध करून दिला. आजही अनेक अम्बॅसॅडर या टॅक्सी म्हणून आपल्याला मुंबई आणि कोलकाता सारख्या शहरांमध्ये पाहायला मिळतात. २००० मध्ये त्यामध्ये कॉन्टेसा या गाडीतील १८०० सीसी चे इंजिन बसवण्यात आले आणि त्यामुळे अम्बॅसॅडर त्याकाळच्या गाड्यांमधील सर्वात वेगवान गाडी बनली होती. २०१४ मध्ये अखेर हिंदुस्थान मोटर्सने अम्बॅसॅडरची निर्मिती थांबवली आणि या दिग्गज गाडीला अलविदा करावे लागले. 

प्रीमियर पद्मिनी  

कालावधी : १९६४ ते २००० 
एकूण महिने : ४३२ महिने 

अम्बॅसॅडरची जबरदस्त प्रतिस्पर्धी मानली जाणारी कार म्हणजे प्रीमियर पद्मिनी. या गाडीचे मूळ नाव होते ' फियाट ११०० डिलाइट '. १९६४ मध्ये ही गाडी भारतात लाँच करण्यात आली होती. ८ वर्षांनंतर प्रीमियर ऑटोमोबाईल लिमिटेडला कॉन्ट्रॅक्ट मधून मुक्त करण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी ही गाडी स्वतंत्रपणे पद्मिनी नावाने बनविण्यास सुरुवात केली. मारुती बाजारात दाखल होण्याआधी ' प्रीमियर पद्मिनी ' विकत घेण्यासाठी ८ ते १० वर्षांचे वेटिंग होते. या गाडीमध्ये शेवटपर्यंत फार काही बदल करण्यात आले नव्हते. इंजिन मध्ये छोटे मोठे बदल करण्यात आले होते त्याव्यतिरिक्त फार काही बदलले नव्हते. मारुती आल्यानंतर मात्र पद्मिनीला फार काळ टिकाव धरता आला नाही आणि ग्राहक मारुतीकडे वळले. आज देखील पद्मिनी मुंबई मध्ये टॅक्सी स्वरूपात मोठ्या संख्येने पाहायला मिळते. २००० मध्ये अखेर दोन दशकांचा पद्मिनीचा प्रवास थांबला. 

मारुती ओम्नी   

कालावधी : १९८४ ते २०१९ 
एकूण महिने : ४२० महिने   

मारुती ओम्नी ही देशात सर्वांनाच सुपरिचित आहे. या गाडीला देशात प्रचंड लोकप्रियता मिळाली. या कारला लोक मारुती व्हॅन असेही ओळखतात. मारुती ८०० बाजारात आल्यानंतर बरोबर एक वर्षाने ही गाडी भारतात लाँच करण्यात आली. तीन दशकांच्या प्रवासामध्ये खूप मोठे बदल या गाडीत करण्यात आले नाहीत पण ही गाडी इतकी लोकप्रिय झाली की २०१९ मध्ये याची निर्मिती बंद झाली तेव्हाही या गाडीला जबरदस्त मागणी होती. या गाडीची लोकप्रियता अशी होती की काही परिवारांनी पुन्हा पुन्हा याच गाडीला पसंती दिली. सुरुवातीला ' मारुती व्हॅन ' हे नाव बदलून ' ओम्नी ' असे करण्यात आले. नवीन क्रॅश प्रोटेक्शनची नियमावली अंमलात आल्याने या गाडीची निर्मिती बंद करावी लागली.  

मारुती जीप्सी 

कालावधी : १९८५ ते २०१९ 
एकूण महिने : ४०८ महिने 

मारुती जीप्सी ही भारतातील असंख्य लोकांची लाडकी आणि स्वप्नातली गाडी होती आणि आजही आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. कुठल्या डोंगर दर्यात, खडकाळ रस्त्यांमध्ये सहज जाऊ शकणारी ही गाडी अतिशय लोकप्रिय आहे. फोर बाय फोर प्रणाली या गाडीत देण्यात आली. भारतीय सैन्य देखील गेली अनेक वर्ष ही गाडी वापरली जात. नवीन क्रॅश प्रोटेक्शनची नियमावली अंमलात आल्याने २०१९ मध्ये या गाडीची निर्मिती बंद करावी लागली. तरीही ही गाडी भारतीय सैन्यासाठी अजूनही बनवली जाते पण सामान्य माणूस ही गाडी आता विकत घेऊ शकत नाही. 

मारुती ८०० एसबी ३०८

कालावधी : १९८६ ते २०१४ 
एकूण महिने : ३३६ महिने 

माेठ्या संख्येत विकल्या गेलेल्या गाड्यांमध्ये मारुती ८०० हे नाव आपल्याला आवर्जून घ्यावेच लागेल. अनेक दशके या गाडीने ग्राहकांच्या मनावर आदिराज्य गाजवले आणि मोठ्या संख्येने ग्राहकांची पसंती मिळाली. संपूर्ण कालावधीमध्ये २९ लाख ग्राहक या गाडीला मिळाले. या संपूर्ण कालावधीमध्ये थोडे थोडे छोटे बदल या गाडीत करण्यात आले पण काही दशकांनी या गाडीची जागा मारुती अल्टोने घेतली आणि २०१४ मध्ये अखेर या गाडीची निर्मिती थांबवण्यात आली. अतिशय जबरदस्त आणि यशस्वी प्रवास या गाडीने पार केला. आजही अनेक ग्राहकांच्या घरात ही गाडी आहे आणि ती वापरली देखील जाते. 

अशा आणखीन काही गाड्या देखील भारतीय बाजारात आहेत ज्यांचा प्रवास मोठा आणि यशस्वी होता. टाटा सुमो (१९९४-२०१९), टाटा सफारी (१९९८ - २०१९) या गाड्यांचे देखील नाव घ्यावे लागेल. या सर्व गाड्यांनी अनेक दशके ग्राहकांच्या मनावर राज्य केले आणि भरपूर संख्येत विकल्या देखील गेल्या. यादीतील सर्व गाड्यांना कार विश्वातील दिग्गज असेच म्हणावे लागेल कारण याच गाड्यांमुळे भारतात एक क्रांती सुरु झाली असे म्हणता येईल आणि भारताला एक मोठी बाजारपेठ म्हणून स्थापित करण्यात देखील या सर्व गाड्यांचा सिंहाचा वाटा आहे. 

सकाळची डिजिटल भरारी, क्विन्टटाईप टेक्नॉलॉजि इंडियासोबत केला महत्त्वाचा करार
 

मुख्यंमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिकवले राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना  सेल्फी कशी काढतात?
 

इंग्रजांनीही जाणली होती मराठ्यांची ताकद ; छत्रपतींच्या राज्यातही गाजवले कर्तृत्व

शरद पवारांच्या आदेशानेच सातारा-जावळीत हस्तक्षेप; शशिकांत शिंदेंचे शिवेंद्रसिंहराजेंना चोख प्रत्युत्तर

Edited By : Siddharth Latkar

Web Title: Largest Cars Sold India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiaBikes