'मॉड्यूल इनोव्हेशन'ला मिळाले आंतरराष्ट्रीय व्यासपीठ

सोमवार, 27 नोव्हेंबर 2017

सचिन दुबे आणि उस्मान खान यांच्या 'मॉड्यूल इनोव्हेशन' या विज्ञानाधारित स्टार्टअपने मूत्रमार्गातील संसर्गामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणारे आणि या संसर्गाला कारणीभूत असलेल्या जिवाणूंचा शोध फक्त एका तासात घेणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. लंडनच्या प्रतिष्ठेच्या विज्ञान संग्रहालयामध्ये 'टुमॉरोज वर्ल्ड गॅलरी' येथे उत्पादन प्रदर्शित करण्याची संधी त्यांना नुकतीच मिळाली. 
 

मूत्रमार्गातील संसर्गामुळे (युरिनरी ट्रॅक्‍ट इन्फेक्‍शन - यूटीआय) आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणाऱ्या आणि या संसर्गाला कारणीभूत असलेल्या जिवाणूंचा शोध फक्त एका तासात घेणारे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या 'मॉड्यूल इनोव्हेशन' या विज्ञानाधारित स्टार्टअपने लंडनच्या प्रतिष्ठेच्या विज्ञान संग्रहालयामध्ये 'टुमॉरोज वर्ल्ड गॅलरी' येथे उत्पादन प्रदर्शित केले आहे. 

विज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक कंपन्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन या संग्रहालयात करण्यात येते. अनेकांचा जीव वाचविण्याची क्षमता असलेल्या मॉड्यूलच्या उत्पादनाची निवड संग्रहालयाकडून करण्यात आली. मॉड्यूलचे संस्थापक सचिन दुबे आणि उस्मान खान म्हणाले, ''न्यूटन आणि ऍलेक्‍झॅंडर फ्लेमिंग यांच्याशेजारी आपले उत्पादन प्रदर्शित करण्याचा बहुमान मिळणे ही भावनाच खूप प्रेरणादायी आहे.'' 

काय आहे 'यू-सेन्स'? 
जगामध्ये दरवर्षी 'यूटीआय'च्या 15 कोटी प्रकरणांची नोंद होते. सुमारे 50 टक्के महिलांना त्यांच्या आयुष्यात एकदा तरी 'यूटीआय'चा त्रास होतोच, असे म्हटले जाते. त्यामुळे या आजाराचा सर्वाधिक फटका महिलांनाच बसतो. सध्याच्या प्रचलित चाचण्यांद्वारे आजाराचे निदान करण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. 'यूटीआय'वर उपचार न केल्यास सेप्सिस तसेच मूत्रपिंडाला नुकसान झाल्यामुळे जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.

या पार्श्‍वभूमीवर, 'यूटीआय'चे निदान फक्त 60 मिनिटांत करण्याचे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान 'मॉड्यूल इनोव्हेशन'ने विकसित केले आहे. 'मॉड्यूल'ने तयार केलेले 'यू-सेन्स' हे तंत्रज्ञान म्हणजे क्रेडिट कार्डच्या आकारातील एक स्ट्रीप आहे. 'यूटीआय'ला कारणीभूत असलेल्या चार विशिष्ट जिवाणूंचा शोध घेण्यासाठी ही स्ट्रीप उपयुक्त ठरते. विजेशिवाय आणि घरामध्ये वापरता येत असल्यामुळे हे तंत्रज्ञान महिलांच्या दृष्टीने वरदान ठरणार आहे. 

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या 'व्हेन्चर सेंटर'मधील या स्टार्टअपने नुकताच 'डिस्कव्हरी ऍवॉर्ड ग्रांट' हा 25 हजार पाउंड मूल्याचा पुरस्कार मिळविला होता. 'डिस्कव्हरी ऍवॉर्ड'चा पुरस्कार निधी जगात 13 व भारतात फक्त दोन स्टार्टअप्सना मिळाला असून, मॉड्यूल इनोव्हेशन त्यापैकी एक आहे. 

व्हेन्चर सेंटरचे संचालक डॉ. प्रेमनाथ म्हणाले, ''सेंटरकडून विज्ञानाधारित स्टार्टअप्सना सर्व प्रकारची मदत केली जात आहे. अशा स्टार्टअप्सना आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेच्या व्यासपीठावर सादरीकरण करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठीही अभिमानाची गोष्ट आहे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites Pune News Pune start up Module Innovation