
Nagpur News: दारुगोळा, शस्त्रांचे होणार ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगही
Nagpur News - वाहतूक करताना गहाळ होणारा दारूगोळा व स्फोटके देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करू शकतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागपूरधील दोन युवकांनी ‘ट्रॅकिंग’ आणि ‘ट्रेसिंग’चे उपकरण विकसित केले असून या माध्यमातून गहाळ होणाऱ्या स्फोटकांची लगेच माहिती मिळणार आहे. सध्या या उपकरणाचा वापर देशातील दोन संरक्षण कंपन्यांमध्ये केला जात आहे.
हर्षद वसुले आणि रोहित शेंडे असे या तरुणांची नावे आहेत. दीड वर्षांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘एंटेलिया’ या घरासमोर जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या होत्या.
त्या नेमक्या कुठून आल्या याचा अद्यापही सुगावा लागलेला नाही. त्यामुळे कंपनीतून तयार होणारे प्रत्येक स्फोटक पदार्थ त्याच्या डेस्टीनेशनपर्यंत पोहचण्यापर्यंत त्याचे ट्रॅकींग करणे आवश्यक असल्याची गरज ओळखून हर्षद आणि रोहित यांनी ‘एक्सप्लो एसडी प्रिंट ॲण्ड स्कॅन पॅकींग मशिन’ची निर्मिती केली. या मशिनच्या माध्यमातून प्रत्येक उत्पादनाचे पॅकींग करताना प्रिंट आणि स्कॅन करण्यात येते.
त्यासाठी ‘क्युआर’कोडही टाकण्यात येतो. हा डेटा संगणकात जमा करण्यात येतो. त्यातून एस्प्लोसिव्ह कुठून कुठे जात आहे, ते कुणी, केव्हा, कशी, कोणत्या पातळीवर उघडले याची माहिती सहज मिळविता येणे शक्य होते.
ती गहाळ झाल्यास नेमकी कुठे गहाळ झालीत याची इत्यंभूत माहिती कंपनीकडे उपलब्ध राहते. सध्या हे मशिन उत्तरप्रदेशातील ललितपूर येथील ‘भारत एस्प्लोसिव्ह’ मध्ये वापरण्यात येत आहे. याशिवाय कर्नाटक येथील ‘उडुपी’ गावामध्ये एका कंपनीमध्ये ते लवकरच बसविण्यात येणार आहे.
‘इन्क्युबेशन सेंटर’मध्ये निर्मिती
हर्षद आणि रोहित यांनी या मशिनची निर्मिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘इन्क्युबेशन सेंटर’मध्ये केली. यांत्रिकी अभियंता असलेले रोहित आणि हर्षदने यापूर्वीही विविध उत्पादने येथून तयार केली आहेत. देशाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात त्यांनी तयार केलेले हे उत्पादन अतिशय महत्त्वपूर्ण ठरले आहे.