नासा'ची बग्गी शोधणार मंगळावर जीवसृष्टी 

मंगळवार, 4 जुलै 2017

मनुष्य मंगळ ग्रहावर असलेल्या संभाव्य जीवसृष्टीच्या शोधासाठी जंगजंग पछाडतो आहे आणि त्याचा भाग म्हणून मंगळावर अनेक मोहिमा आखल्या जात आहेत. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था "नासा'ने 2020मध्ये अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आखली असून, तिचा उद्देशही अर्थात मंगळावर मानवी अस्तित्वाचा शोध आणि तेथे वस्ती करण्यासंदर्भातील चाचपणी हाच आहे. 

मनुष्य मंगळ ग्रहावर असलेल्या संभाव्य जीवसृष्टीच्या शोधासाठी जंगजंग पछाडतो आहे आणि त्याचा भाग म्हणून मंगळावर अनेक मोहिमा आखल्या जात आहेत. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था "नासा'ने 2020मध्ये अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आखली असून, तिचा उद्देशही अर्थात मंगळावर मानवी अस्तित्वाचा शोध आणि तेथे वस्ती करण्यासंदर्भातील चाचपणी हाच आहे. 

"नासा'ची "द मार्स रोव्हर 2020' या नावाची बग्गी (रोव्हर) तयार केली असून, ती 2020मध्ये मंगळावर जाणार आहे. ही बग्गी 2012मध्ये मंगळावर पाठविलेल्या क्‍युरिऑसिटी या बग्गीप्रमाणेच आहे. क्‍युरिऑसिटीने आतपर्यंत मंगळाच्या पृष्ठभागावर 10 मैल अंतराची सफर पूर्ण असून, सध्या ही बग्गी ग्रहावरील 5.5 किलोमीटर उंचीचा एक डोंगर चढण्याच्या प्रयत्नात आहे. ""आमची "मार्स रोव्हर 2020' आकाराने महाकाय असून, त्याचे कोळ्यासारखे पाय, किरणोत्सारी शेपूट, लटकलेली मान व एकच डोळा हे रूप तसे बेढबच आहे. ही बग्गी एखाद्या पिक-अप ट्रकप्रमाणे सर्व कामे करते. या बग्गीची चाके "क्‍युरिऑसिटी'च्या तुलनेत अधिक मजबूत आहेत, तिची नेव्हिगेशन प्रणाली व लॅंडिंग सुविधा सुधारित असून, अनेक महत्त्वाची उपकरणे तिच्यावर बसविली आहेत. या बग्गीचे वैशिष्ट्य तिच्यावर बसविलेले अत्यंत शक्तिशाली ड्रिलिंग मशिन असून, त्याच्या मदतीने मंगळाच्या पृष्ठभागावर खडूच्या जाडीचे छिद्र घेतले जातील. या छिद्रातील मातीचे नमुने एका ट्यूबमध्ये भरले जातील व रोबोटिक हाताच्या मदतीने बग्गीवर आणून हवाबंद करून ठेवले जातील. गोळा केलेले हे नमुने मंगळावरील पुढील मोहिमेच्या वेळी पृथ्वीवर आणले जातील,'' अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख संशोधक केन फार्ले यांनी दिली. 

हे नमुने साठवून ठेवणे आणि ते पृथ्वीवर सुखरूपपणे आणणे हा प्रकल्पातील सर्वांत आव्हानात्मक भाग आहे. ""मंगळावरील जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी आपण सध्या वाहून नेत असलेली उपकरणे फारच तोकडी आहेत. मंगळावर पृथ्वीप्रमाणेच अद्ययावत प्रयोगशाळा उभारल्यास हे काम अधिक सोपे होईल. मोहीम पूर्ण होईपर्यंत ही बग्गी 35 ठिकाणांवरून नमुने गोळा करेल व त्यांचा उपयोग जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी निश्‍चितच होईल. मात्र त्यांना सुखरूप परत आणणे हे आव्हान आहेच. अंतराळवीर मंगळावर उतरून हे नमुने पृथ्वीवर आणतील, असे सोपे उत्तर यासाठी दिले जाते. मात्र ही सर्वांत कठीण गोष्ट आहे. पहिल्या मोहिमेद्वारे नमुने गोळा करणे, दुसऱ्या मोहिमेत लॅंडर मंगळावर उतरवून हे नमुने एका रॉकेटमध्ये ठेवणे व रॉकेट मंगळाच्या कक्षेत फिरत ठेवणे व तिसऱ्या मोहिमेत हे नमुने पृथ्वीवर आणणे हा चांगला पर्याय होऊ शकतो. मात्र मंगळावर सातत्याने यान पाठविणे किंवा मनुष्याला पाठविण्याची योजना आखणे सोपे नाही. हॉलिवूडच्या "मार्शियन' चित्रपटात दाखविल्याप्रमाणे सर्व सोपे नसते,'' असे फार्ले सांगतात. "नासा'ने 2030पर्यंत मानवाला मंगळावर पाठविण्याचे ध्येय ठेवले असून, ही बग्गी मानवाचे या ग्रहावरील वास्तव्य अधिक सुकर होण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, यात शंका नाही... 

ऑक्‍सिजन जनरेटरची सोय 
"मार्स 2020'मध्ये ऑक्‍सिजन जनरेटरही बसविण्यात आला आहे. त्याचा उद्देश मंगळाच्या वातावरणातील कार्बन डायऑक्‍साइडमधून ऑक्‍सिजन शोषून घेणे हा आहे. त्याचा उपयोग भविष्यात मंगळावर वास्तव्याची स्वप्ने पाहणाऱ्या मानवासाठी उपयोग पडणार आहे. 

Web Title: NASA's buggy to find life on Mars