खगोलशास्त्रात भव्य प्रयोग

radio-durbin
radio-durbin

खगोलशास्त्रातील अमर्याद शक्यतांची दारे खुली करणारी जगातील आजवरची सर्वांत अत्याधुनिक रेडिओ दुर्बीण स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्व्हेटरी (एसकेएओ) अस्तित्वात येत आहे. ‘एसकेएओ’ची नोडल संस्था राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राचे (एनसीआरए) संचालक प्रा. यशवंत गुप्ता यांच्याशी साधलेला संवाद.

प्रश्न : खगोलशास्त्राच्या दृष्टीने ‘एसकेएओ’चे महत्त्व काय? 
प्रा. यशवंत गुप्ता -
 रेडिओ खगोलशास्त्राच्या दृष्टीने स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्व्हेटरी (एसकेएओ) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. जगभरातील शास्त्रज्ञांनी प्रथमच एकत्र येत खगोलशास्त्रात क्रांतिकारक बदल घडविणाऱ्या दुर्बिणीचा आविष्कार करण्याचे निश्चित केले आहे. विश्वाच्या निर्मितीपासून ते परग्रहवासीयांच्या अस्तित्वासंबंधीचे संशोधन या दुर्बिणीच्या माध्यमातून होईल. भारताच्या दृष्टीने हा प्रकल्प एक रोमांचकारी अनुभव असणार आहे. कारण १९६० पासून देशाला रेडिओ खगोलशास्त्राची समृद्ध परंपरा लाभली आहे. ‘एसकेएओ’च्या माध्यमातून आपण एक प्रकारे पुढचा भविष्यकालीन टप्पा गाठत आहोत. ‘एसकेएओ’च्या निमित्ताने नवीन संशोधन आणि खगोलशास्त्राच्या नव्या युगाला प्रारंभ होणार आहे.  

या महाकाय रेडिओदुर्बिणीचा देशातील खगोलशास्त्र आणि मूलभूत विज्ञानाला काय फायदा होईल?
सध्या अस्तित्वात असलेली जगातील सर्वांत अद्ययावत रेडिओ दुर्बीण, अर्थात खोडद येथील जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप(जीएमआरटी) आपल्याकडे आहे. या माध्यमातून आपण रेडिओ खगोलशास्त्रात अगदी सुरवातीपासूनच भरीव योगदान देत आहोत. भारतीय शास्त्रज्ञांसह जगभरातील शास्त्रज्ञ नवीनतम संशोधनासाठी या रेडिओ दुर्बिणीचा वापर करतात. आधीपासूनच भारतीय शास्त्रज्ञ जगभरातील रेडिओ खगोलशास्त्र संशोधन गटाचे नेतृत्व करताना दिसतात. ‘एसकेएओ’ दुर्बीण पूर्ण क्षमतेने कार्यरत करण्यात आणि त्या माध्यमातून नवीन संशोधन करण्यात भारतीय शास्त्रज्ञांची महत्त्वपूर्ण भूमिका असेल. ‘एसकेएओ’सारखी विशाल आणि गुंतागुंतीची दुर्बीण उभारताना लागणारे तंत्रज्ञान विकसित करणे निश्चितच आव्हानात्मक असले तरी त्यासाठी आवश्यक कौशल्ये भारतीय उद्योगांकडे आहेत.

‘एसकेएओ’साठी लागणारे ‘टेलिस्कोप मॅनेजमेंट सिस्टम’चे प्रारूप आपण उद्योगांच्या मदतीने सादर केले असून, त्याला ‘एसकेएओ’ची तत्त्वतः मान्यताही मिळाली आहे. दुर्बिणी उभारणीच्या कामात भारत इतर देशांचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे याचा फायदाही भारतीय उद्योग क्षेत्राला होणार आहे.

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियात उभारण्यात येणाऱ्या ‘एसकेएओ-लो’ या दुर्बिणीचे डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग हार्डवेअर आपण रामन रिसर्च इन्स्टिट्यूट आणि उद्योगांच्या सहकार्याने विकसित करणार आहोत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर डेटाचे विश्लेषण करण्यासाठी सुपर कॉम्प्युटर लागतील. पर्यायाने खगोलशास्त्राबरोबच इतर विज्ञानशाखा आणि तंत्रज्ञानाला या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. 

‘एसकेएओ’मध्ये राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राची भूमिका काय आहे? त्याचा संस्थेला कसा फायदा होईल?
भारताच्या दृष्टीने ‘एसकेएओ’मध्ये ‘एनसीआरए’ एक नोडल एजन्सी म्हणून काम पाहत आहे. देशाने निश्चित केलेल्या काही ‘मेगा प्रोजेक्ट्स’ पैकी हा एक प्रोजेक्ट आहे. केंद्र सरकारचा अणु ऊर्जा विभाग आणि विज्ञान तंत्रज्ञान विभाग ही दोन मंत्रालये यात सहभागी आहेत. देशातील रेडिओ खगोलशास्त्राच्या विकासामध्ये ‘एनसीआरए’ची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. उटी आणि खोडद येथील रेडिओ दुर्बिणीचे संचालन ‘एनसीआरए’ करते. त्यासाठी लागणारे स्वदेशी तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ विकसित करण्याचे कार्यही ‘एनसीआरए’ करते. देशात स्थापन झालेल्या ‘एसकेएओ’ इंडिया कन्सॉर्शनचे नेतृत्व आम्ही करतो. भविष्यात एसकेएओ दुर्बिणीने संकलित केलेल्या प्रचंड मोठ्या माहितीचे विश्लेषण करण्याचे क्लिष्ट आव्हान आपल्यासमोर असेल. दुर्बिणीतून मिळणाऱ्या माहितीच्या संकलनासाठी भारतात विभागीय माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. यामुळे भारतीय संशोधकांना अल्गॉरिदम विकसित करणे, तसेच कृत्रिम बुद्धीमत्ता आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवीन क्षितीजे निर्माण होणार आहेत. 

भारतातील रेडिओ खगोलशास्त्राचा या दशकातील प्रवास कसा असेल?
२०११-१२ मध्ये ‘एसकेएओ’ रेडिओ दुर्बिणीची संकल्पना मांडण्यात आली. मागील दशकात तिचे प्रारूप निश्चित होत गेले. या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावरील या प्रकल्पात भारत म्हणून आपण आपले स्थान निश्चित केले. एसकेएओ बोर्डाचे सदस्य झालो. या वर्षीच ही आंतरराष्ट्रीय संघटना प्रत्यक्ष रेडिओ दुर्बीण उभारणीचे कार्य सुरू करत आहे. आपणही त्यात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. रेडिओ खगोलशास्त्रात क्रांतिकारक बदल करणाऱ्या या दुर्बिणीच्या माध्यमातून या दशकाच्या शेवटी आपल्याला संशोधनरूपी फळे मिळणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत देशातील शास्त्रज्ञांसह, संशोधक विद्यार्थ्यांचाही महत्त्वपूर्ण सहभाग असणार आहे. भविष्यात जगाला खगोलशास्त्रातील संशोधनाचे फायदे अधिक परिणामकारकरीत्या मिळण्यामध्ये भारतीय शास्त्रज्ञांचे महत्त्वपूर्ण योगदान असेल.

काय?
जगातील सर्वात मोठी, आधुनिक आणि भविष्यकालीन तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रज्ञ रेडिओ दुर्बीण विकसित करत आहे. चौरस किलोमीटर आकारामध्ये रेडिओ लहरींचे संकलन करणाऱ्या दुर्बिणीचे ॲरे जोडून ही अतिसंवेदनशील दुर्बीण तयार होणार आहे.

कोठे?
पश्चिम ऑस्ट्रेलियातील मुर्शीसन वाळवंट आणि दक्षिण आफ्रिकेच्या कारू भागात 

केव्हा?
एसकेएओचा पहिला टप्पा या दशकात अस्तित्वात येईल. तर दुसऱ्या टप्प्याचे काम २०३५ मध्ये सुरू होईल.

कसे?
दक्षिण आफ्रिकेत १३० गोलाकार (डिश ॲन्टेना) दुर्बिणी बसविण्यात येतील. तर ऑस्ट्रेलियात एक लाख तीस हजार डायपोल आकाराच्या दुर्बिणी बसविण्यात येतील. या दुर्बिणीच्या माध्यमातून आकाशातील तारे, पल्सार, दीर्घिका आदी अवकाशीय घटकांतून उत्सर्जित होणाऱ्या रेडिओ लहरींची एकत्रित नोंद करता येईल. ५० मेगाहर्ट्झ ते २५ गिगाहर्ट्झ पर्यंतची वारंवारिता यामुळे कक्षेत येणार आहे. 

कोण?
१) कार्यकारिणीतील देश : द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इटली, नेदरलॅंड, पोर्तुगाल आणि ब्रिटन
२) सध्याचे निरीक्षक देश : भारत, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com