खेळाडूच्या शरीराचे ‘थ्रीडी’ परीक्षण करून आवश्‍यक मार्गदर्शन

भूषण पाटील
गुरुवार, 7 मार्च 2019

बायोमेकॅनिकल ॲनालिसिस ही संकल्पना गेल्या दोन वर्षांपासून देशामध्ये आली आहे. खेळासाठी आवश्‍यक शास्त्रशुद्ध व्यायामाची माहिती मिळत असल्याने त्याला पसंती मिळत आहे. सर्वच प्रकारच्या खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेचे मूल्यमापन यातून होते. भविष्यात अशा परीक्षणाचे महत्त्व अजून वाढणार आहे.
- डॉ. अजय चव्हाण

कोल्हापूर - खेळाच्या सरावासाठीचा आवश्‍यक व्यायाम खेळाडूच्या शरीररचनेला पूरक झाल्यास त्याच्या कामगिरीत सातत्य राहून त्याला यश मिळवता येऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारचा व्यायाम खेळाडूकडून करवून घेण्यासाठी बायोमेकॅनिकल ॲनालिसिस (जैव यांत्रिक विश्‍लेषण) तंत्राचा वापर होऊ लागला आहे. याद्वारे खेळाडूच्या शरीराचे ‘थ्रीडी’ परीक्षण करून आवश्‍यक मार्गदर्शन केले जाते. सर्वच क्रीडा प्रकारांतील खेळाडूंचा अशा प्रकारचे परीक्षण करण्याकडे कल वाढला आहे.

एखाद्या खेळाडूला त्याच्या खेळात यश मिळवायचे असेल किंवा कामगिरीत सातत्य राखायचे असल्यास त्याची शारीरिक क्षमता कायम राहणे गरजेचे असते. त्यासाठी व्यायामही तितकाच महत्वाचा आहे. बऱ्याचदा आवश्‍यक व्यायाम व सराव करूनही खेळाडूंच्या पदरी निराशा पडते. त्याच्या अपयशाचे कारण त्याच्या सरावातच लपलेले असते. कारण खेळाचा प्रकार जरी एकच असला तरी प्रत्येक खेळाडूची शारीरिक रचना वेगळी असते. या रचनेचा विचार करून व्यायाम केल्यास चांगल्या कामगिरीचे सातत्य राहू शकते.त्यामुळे खेळाडू आपल्या शारीरिक रचनेची माहिती घेण्यासाठी ‘बायोमेकॅनिकल ॲनालिसिस’चा वापर करु लागले आहेत. पुणे, मुंबई व बेंगलोर येथेच अशा प्रकारच्या परीक्षणाची व तज्ञाची सुविधा उपलब्ध आहे. 

असे होते परीक्षण 
या प्रकारच्या परीक्षणामध्ये खेळाडू सध्या करत असलेल्या सरावाचे ‘थ्री डी’ कॅमेराद्वारे रेकॉर्डिंग केले जाते. यातील बारकावे तपासून त्याची शारीरिक रचना व त्याच्या व्यायामातील चुकांचे परीक्षण होते. यानंतर संबधित खेळाडूला व्यायामातील बदल सुचवले जातात. दोन ते तीन महिने सुचवलेल्या बदलानुसार खेळाडूची कामगिरी सुधारू शकते. शिवाय त्याच्या वर्षानुवर्षाच्या दुखापती दूर केल्या जाऊ शकतात. या परीक्षणासाठी अत्याधुनिक लॅबदेखील विकसित होत आहेत. 

साहित्यही महत्वाचे 
खेळाडूच्या सरावासह तो वापरत असलेले साहित्यही त्याच्या कामगिरीवर परिणामकारक ठरते. त्याची साईज व वजन 
हे खेळाडूच्या शारीरिक रचनेला पूरक असावे लागते. बायोमेकॅनिकल परीक्षणातून या गोष्टी समोर आल्या आहेत. 

बायोमेकॅनिकल ॲनालिसिस ही संकल्पना गेल्या दोन वर्षांपासून देशामध्ये आली आहे. खेळासाठी आवश्‍यक शास्त्रशुद्ध व्यायामाची माहिती मिळत असल्याने त्याला पसंती मिळत आहे. सर्वच प्रकारच्या खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेचे मूल्यमापन यातून होते. भविष्यात अशा परीक्षणाचे महत्त्व अजून वाढणार आहे.
- डॉ. अजय चव्हाण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The necessary guidance by examining the player's body 3D