नवी ‘ग्लॅन्झा’ कामगिरीत देखणी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heartec

नवी ‘ग्लॅन्झा’ कामगिरीत देखणी!

टोयोटा भारतीय बाजारात इन्होवा किंवा फॉर्च्युनर यासारख्या प्रीमियम कारसाठी ओळखली जाते; परंतु टोयोटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर सुझुकी मोटर कंपनीसोबत केलेल्या करारानुसार अर्बन क्रूझर आणि ग्लॅन्झा यासारख्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या कारही बाजारात आणल्या. मारुती-सुझुकीने ''बलेनो''चे फेसलिफ्ट व्हर्जन फेब्रुवारी २०२२मध्ये बाजारात आणले होते. याच्या काही दिवसांनंतरच टोयोटानेही ‘ग्लॅन्झा’ नव्या रूपात बाजारात दाखल केली. ग्लॅन्झा ‘ई’, ‘एस’, ‘जी’ आणि ‘व्ही’ अशा चार प्रकारात एकूण सात व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. तिच्या ‘ई’ या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत ६.५९ लाख, तर ‘व्ही’ (एमटी) टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत ९.९९ लाख रुपये आहे.

ग्लॅन्झाची रचना न्यू जनरेशन ‘हरटेक’ (Heartec) प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे, ज्यामुळे ती अधिक दणकट, एखादी टक्कर झाल्यानंतरही धक्के शोषून घेण्याबरोबरच प्रवाशांच्या जीविताचे संरक्षण करणार असल्याचा दावा केला गेला आहे. ग्लॅन्झाच्या बाह्यरचनेत केलेल्या बदलांमुळे ती आता अधिक स्पोर्टिव्ह आणि उठावदार दिसते. विशेषत: बम्परच्या खाली दिलेले स्लीमर ग्रील, आक्रमक वाटणारे बम्परचे डिझाईन, बदललेली हेडलाईट आदींचा यामध्ये समावेश आहे. शिवाय नव्याने डिझाईन केली आहे. १६ इंचीचे अलॉय व्हील, टेललाईटची डिझाइन आणि विंडोच्या खालील भागात क्रोमचा प्रभावी वापर ग्लॅन्झाचे बाह्य सौंदर्य अधिक खुलवते.

तांत्रिकदृष्ट्या ग्लॅन्झा पूर्वीपेक्षा अद्ययावत करण्यात आली आहे. तिच्या टॉप व्हेरिएंटमध्ये ९ इंचाचा टचस्क्रिन, हेड ऑफ डिस्प्लेसारखे फीचर्स दिले आहेत. एसी व्हेंट आणि तिच्या बटणांमध्येही बदल करण्यात आला आहे. पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशांसाठीही एसी व्हेंट्सप्रमाणे यूएसबी चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. एकूणच बाह्यरचनेप्रमाणेच ग्लँझाची आतील रचनाही तितकीच आकर्षित करण्याकडे टोयोटाने भर दिला आहे. रोजच्या प्रवासासाठी हाताळणीस सुलभ, चांगल्या मायलेजची अपेक्षा असणाऱ्यांना आणि टोयोटा या ब्रँडमुळे ग्लॅन्झा वेगळा पर्याय ठरू शकते.

इंजिन अधिक स्मूथ

ग्लॅन्झामध्ये ११९७ सीसी, ४ सिलिंडर, १.२ लिटर पेट्रोल इंजिन दिले असून, ते ८८.५० बीएच पॉवर, ११८ एनएम टॉर्क जनरेट करते. ड्युअल व्हीव्हीटी, ड्युअल जेट तंत्रज्ञानाने युक्त असलेले इंजिन पूर्वीपेक्षा आता अधिक स्मूथ झाले आहे. ५ स्पीड मॅन्युअलप्रमाणेच ५ स्पीड एएमटी गिअर बॉक्सचा पर्याय यामध्ये देण्यात आला असून, कारची राईड अधिक दमदार होते. सर्व प्रकारच्या रस्त्यांवर इंजिनची कामगिरी, मिळणार पिकअप राईडचा आनंद देतो. पूर्ण प्रवासी क्षमतेत ताशी ७० ते ८० च्या वेगातही एखादे अवघड वळण सहज पार होते.

सुरक्षेची खबरदारी

एमएमटीच्या तुलनेत मॅन्युअल गिअर बॉक्सला मिळणाऱ्या ताकदीमुळे कारच्या राईडचा अधिक आनंद घेता येतो. शिवाय स्टेअरिंगची हाताळणी, तत्काळ लागणारे ब्रेक, अद्ययावत केलेले सस्पेंशन्स यामुळे प्रवास अधिक सुखावह होतो. सुरक्षेच्या बाबतीतही पुरेशी खबरदारी घेण्यात आली आहे. ६ एअर बँग, स्टेबिलिटी कंट्रोल, हिल असिस्ट, इंजिन स्टार्ट-स्टॉप, एबीएस आणि ईबीडी यांसारखे फीचर्स कारमध्ये देण्यात आले आहेत. तसेच, टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टिअरिंग, क्रूझ कंट्रोल, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल, हेड्स अप डिस्प्ले, ३६० डिग्री व्ह्यू कँमेरा आदी फीचर्सही देण्यात आली आहेत.

अधिक मायलेज

टोयोटाने नवीन ग्लॅन्झाला २३ किलोमीटर/लिटर मायलेजचा केलेला दावा फोल ठरत नसल्याचा अनुभव आला. मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या ग्लॅन्झाने ठराविक वेगमर्यादेत (ताशी ७० ते ८०) चालवल्यानंतर शहरी रस्ते तसेच महामार्गावर सरासरी २२ किमी/लिटर मायलेज दिले. तर एएमटी गिअरबॉक्सने सारख्याच रस्त्यांवर सरासरी २० किमी/लिटरचे मायलेज दिले.

टोयोटा किर्लोस्कर मोटरने (टीकेएम) मारुती सुझुकी कंपनीसोबत ‘क्रॉस बॅजिंग’अंतर्गत २०१९मध्ये लाँच केलेली ‘ग्लॅन्झा’ ही हॅचबॅक श्रेणीतील कार २०२२मध्ये पुन्हा नव्य रूपात (फेसलिफ्ट) दाखल केली आहे. यापूर्वीही ग्लॅन्झाची राईड केली होती. आता तिच्या ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल गिअर बॉक्स अशा दोन्ही प्रकारची राईड केली. पहिल्यापेक्षा नवीन ग्लॅन्झा चालवण्याचा अनुभव अधिक चांगला वाटला. विशेषत: मायलेजच्या बाबतीत या दोन्ही कारने खूष केले. शिवाय ग्लॅन्झा आता वाढीव वैशिष्ट्यांसह लुकच्या बाबतीत अधिक उठावदार झाली आहे.