रंगमिश्रीत पाणी शुद्धीकरणाची नवी पद्धत विकसित 

New Method Of Purified Water Purification Developed In Shivaji University Kolhapur
New Method Of Purified Water Purification Developed In Shivaji University Kolhapur

कोल्हापूर - अनेक औद्योगिक कारखान्यांतून रसायनमिश्रित, रंगमिश्रीत पाणी सोडण्यात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः वस्त्रोद्योग क्षेत्रातील कारखान्यातून रंगमिश्रित पाणी सोडले जाते. त्याचा धोका मोठा आहे. हे अशुद्ध पाणी नाल्याद्वारे नदीत मिसळत असल्याने नदीतील शुद्ध पाणीही अशुद्ध होते. त्यासाठी नदीत पाणी सोडण्यापूर्वी या अशुद्ध पाण्याचे शुद्धीकरण करणे नितांत गरजेचे आहे. अन्यथा रोगराईचा धोका होऊ शकतो.

पाणी शुद्धीकरणासाठी अनेक पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेत. मुख्यतः फिल्ट्ररेशन पद्धत चारकोल किंवा कार्बन पद्धत या पद्धती खर्चिक तर आहेतच; पण त्याबरोबरच वेळखाऊही आहेत. हे विचारात घेऊन शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. कल्याणराव गरडकर यांनी त्यावर संशोधन करण्याचा विचार केला. शिवाजी विद्यापीठ आणि साऊथ कोरियातील विद्यापीठाच्या मदतीने हे संशोधन त्यांनी केले. प्रा. सॅंग-वा ली, प्रा. नाना गावडे, प्रा. अभिजित कदम, प्रा. संतोष बाबर, प्रा. अण्णा गोफने या संशोधकासह प्रा. गरडकर यांनी केलेले या संदर्भातील संशोधन सिरॅमिक्‍स इंटरनॅशनल या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. 

शुद्धीकरणाची फोटोकॅटलिजिस ही पद्धत या संशोधकांनी शोधली आहे. सोन्याचे अतिसूक्ष्म कण (गोल्ड नॅनोपार्टिकल्स) याचा वापर यात केला आहे. हे कण सूर्यप्रकाश शोषून घेतात. याला "सरफेस प्लाझमोन' असे म्हणतात. या गुणधर्मामुळे हे कण अनेक प्रक्रियांमध्ये वापरले जातात. उदाहरणार्थ- औषधाचे शरीरात वहन जलद गतीने व्हावे, यासाठी या नॅनोपार्टिकल्सचा वापर केला जातो. घातक पदार्थांचा शोध घेण्यासाठीही गोल्ड नॅनोपार्टिकल्स वापरले जातात. कर्करोग, हृदयरोग आणि इतर आजारांचे निदान करण्यासाठीही याचा वापर होतो. 

अशी आहे शुद्धीकरणाची पद्धत 

झींक ऑक्‍साईड नॅनोरॉडवर (झेडओ) सोन्याच्या नॅनोपार्टिकल्सचा मुलामा देण्यात येतो. हा पदार्थ पाण्यातील रंगद्रव्यांचे सूर्यप्रकाशात विघटन करतो. संशोधकांनी अवघ्या अर्धा तासात सूर्यप्रकाशात 20 पीपीएम रंग द्रव्याचे विघटन होत असल्याचे सिद्ध केले. विशेष म्हणजे हे संशोधन पर्यावरणाच्या दृष्टीने फायदेशीर आहे. यात रासायनिक घटकांचा वापर न करता जैविक घटकांचा वापर केला गेला आहे. सोन्याचे कण हे बोराच्या पानापासून तयार केले आहेत; तर झिंक ऑक्‍साईड नॅनोड्‌स हे स्वस्तात मिळणाऱ्या झिंक ऍसिटेटच्या क्षारापासून कमी तापमानात तयार केले आहेत. 

पाणी शुद्ध झाल्याचीही तपासणी 

रंगमिश्रीत पाण्याच्या शुद्धीकरणानंतर हे पाणी शुद्ध झाले आहे की नाही, याची तपासणीही या संशोधनात करण्यात आली. माशांच्या खवल्यावर या पाण्याचा काय परिणाम होतो, याचा अभ्यास यात करण्यात आला. माशांचा "डीएनए'वर कोणताच परिणाम होत नसल्याचेही यात आढळले. हे शुद्धीकरण केलेले पाणी बागेतील फुलझाडे किंवा शेतीसाठी वापरले जाऊ शकते, असेही या प्रयोगातून सिद्ध झाले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com