आता येणार 'नोकिया'चे अँड्रॉईड फोन! 

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016

स्मार्टफोनच्या शर्यतीत मागे पडल्यानंतर 'नोकिया'ने विंडोज प्रणालीवर आधारित स्मार्टफोन बाजारात आणला होता. पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या पार्श्‍वभूमीवर 'मायक्रोसॉफ्ट'ने आता दोन अँड्रॉईड मोबाईल फोनची तयारी सुरू केली आहे.

न्यूयॉर्क: एकेकाळी मोबाईल विश्‍वातील 'अनभिषिक्त सम्राट' असलेली 'नोकिया' कंपनी स्मार्टफोनच्या लाटेत मुख्य प्रवाहातून बाहेर फेकली गेली. 'मायक्रोसॉफ्ट'ने 'नोकिया' विकत घेतल्यानंतरही या कंपनीचा घसरता आलेख सावरलेला नाही. आता यातून तोडगा काढण्याच्या प्रयत्नांतील एक भाग म्हणून 'नोकिया' या ब्रॅंडचा वापर करत 'मायक्रोसॉफ्ट'ने अँड्रॉईड फोन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. 2017 च्या मध्यात 'नोकिया'चा अँड्रॉईड फोन बाजारपेठेत उपलब्ध होऊ शकेल. 

स्मार्टफोनच्या शर्यतीत मागे पडल्यानंतर 'नोकिया'ने विंडोज प्रणालीवर आधारित स्मार्टफोन बाजारात आणला होता. पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या पार्श्‍वभूमीवर 'मायक्रोसॉफ्ट'ने आता दोन अँड्रॉईड मोबाईल फोनची तयारी सुरू केली आहे. अर्थात, अँड्रॉईडमधील हा 'नोकिया'चा पहिलाच प्रयत्न नाही. यापूर्वी 'नोकिया'ने 'एन1' हा अँड्रॉईड टॅब्लेट तयार केला आहे. 

'नोकिया' या ब्रॅंडचा वापर करून मोबाईल फोन तयार करण्याचे कंत्राट 'एचएमडी ग्लोबल' या फिनिश कंपनीला देण्यात आले आहे. ही कंपनी 2016 च्या अखेरीस आणि 2017 च्या सुरवातीच्या टप्प्यात एकूण चार नवी उत्पादने बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. जागतिक पातळीवर प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 'मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस' या पुढील वर्षी होणाऱ्या परिषदेत सहभागी होणार असल्याचे 'नोकिया'ने स्पष्ट केले आहे. मात्र, या परिषदेमध्ये 'नोकिया'द्वारे नवा मोबाईल जाहीर केले जाण्याची शक्‍यता कमी आहे. ही परिषद पुढील वर्षी 27 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nokia to launch two android phones, confirms Microsoft