खेतीगाडीडॉटकॉम मुळे शेतकऱ्यांना ऑनलाइन ट्रॅक्‍टर उपलब्ध 

यशपाल सोनकांबळे
शनिवार, 14 जुलै 2018

पुणे : अल्पभूधारक किंवा जास्त जमीन असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला नांगरणी, पेरणीसाठी ट्रॅक्‍टर अत्यावश्‍यक असतो. त्यासाठी ज्या त्या शेतकऱ्यांच्या गरजेनुसार लाखो रुपयांची आर्थिक गुंतवणूक करून ट्रॅक्‍टर विकत घेणे किंवा भाड्याने घेण्यासाठी मोठे कष्ट पडतात. हीच गरज ओळखून कृषी पदवीधर असलेल्या प्रवीण शिंदे आणि त्याचा मित्र विष्णू धस या दोघांनी "खेतीगाडीडॉटकॉम' नावाचे स्टार्टअप सुरू केले. संकेतस्थळ आणि मोबाईल ऍपद्वारे ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एका क्‍लिकवर बाजारपेठांमधील विविध कंपन्यांच्या ट्रॅक्‍टर खरेदी, विक्रीसह भाड्याने मिळू लागली आहेत.

पुणे : अल्पभूधारक किंवा जास्त जमीन असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला नांगरणी, पेरणीसाठी ट्रॅक्‍टर अत्यावश्‍यक असतो. त्यासाठी ज्या त्या शेतकऱ्यांच्या गरजेनुसार लाखो रुपयांची आर्थिक गुंतवणूक करून ट्रॅक्‍टर विकत घेणे किंवा भाड्याने घेण्यासाठी मोठे कष्ट पडतात. हीच गरज ओळखून कृषी पदवीधर असलेल्या प्रवीण शिंदे आणि त्याचा मित्र विष्णू धस या दोघांनी "खेतीगाडीडॉटकॉम' नावाचे स्टार्टअप सुरू केले. संकेतस्थळ आणि मोबाईल ऍपद्वारे ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एका क्‍लिकवर बाजारपेठांमधील विविध कंपन्यांच्या ट्रॅक्‍टर खरेदी, विक्रीसह भाड्याने मिळू लागली आहेत. ट्रॅक्‍टर आणि कृषी अवजारे यांचे अचूक ज्ञान आणि तंत्रज्ञान देऊन त्या आधारे शेतकऱ्यांना कार्यक्षम व सक्षम बनवण्यासाठी प्रयत्नशील असणारा मंच म्हणून "खेतीगाडीडॉटकॉम'ला नवी ओळख मिळू लागली आहे. 

"खेतीगाडीडॉटकॉम'चे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण शिंदे म्हणाले,"सध्या देशातील कृषी क्षेत्रामध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने शेती करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. अमेरिका, इस्राईल आणि चीन देशांमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्रीवरील शेतीचे 70 ते 80 टक्के प्रमाण असेल तर त्या तुलनेत कृषिप्रधान भारतात केवळ 2 टक्के इतके आहे. नांगरणी, पेरणीसह अन्य कामांसाठी महत्त्वाचा ट्रॅक्‍टर हा खर्चिक परंतु अत्यावश्‍यक बनला आहे. त्यासाठी अल्पभूधारक असो की जास्त जमीनधारक त्यांना त्यांच्या क्षेत्रफळानुसार कोणता ट्रॅक्‍टर घ्यायचा याचे प्रबोधन नसल्यामुळे विनाकारण महागडा, जास्त क्षमतेचा ट्रॅक्‍टर विकत घेतल्यामुळे आर्थिक भुर्दंड बसतो. त्यासाठी गावागावात ट्रॅक्‍टर खरेदी-विक्री आणि भाड्याने देण्यासाठी एखादे संकेतस्थळ आणि मोबाईल ऍप सुरू करण्याची कल्पना "खेतीगाडीडॉटकॉम'स्टार्टअपच्या रूपात साकारली. 9 मे 2016 मध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतून संकेतस्थळ सुरू केले. त्यानंतर दहा प्रादेशिक भाषांमध्ये मोबाईल ऍप गुगल प्लेस्टोअरवर सुरू केले.'' 

तसेच "खेतीगाडीडॉटकॉम'चे संचालक तथा मुख्य कार्यान्वयन अधिकारी विष्णू धस म्हणाले,"खेतीगाडीडॉटकॉमच्या संकेतस्थळ व मोबाईल ऍप हा शेतकरी, ट्रॅक्‍टर आणि कृषी अवजारे उत्पादक, वितरक, कंत्राटदार व शेती व्यवसायाशी संलग्न समुदायाला एकत्रित आणणारा पहिला मंच आहे. यावर दैनंदिन सहा हजार शेतकऱ्यांकडून चौकशी केली जाते. देशी व परदेशी कंपन्यांच्या ट्रॅक्‍टरसह अन्य 350 शेती उपकरणे आणि यंत्रसामग्रीची माहिती तसेच कर्ज आणि विमाची (इन्शुरन्स) सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिली जाते. कोणत्याही सुविधेसाठी शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. परंतु, संबंधित उत्पादन कंपनी, वितरक आणि विक्रेत्यांना मात्र शुल्क आकारले जातात.'' 

"खेतीगाडीडॉटकॉम"ची वैशिष्ट्ये 
ट्रॅक्‍टर आणि कृषी अवजारे यांची खरेदी , विक्री , भाड्याने देणे-घेण्याची सुविधा असणारा जागतिक पहिला मंच. 

- नवीन ट्रॅक्‍टर आणि अवजारे : सखोल वैशिष्ट्यासह खरेदीची सुविधा . 
 -जुने ट्रॅक्‍टर : योग्य दरात खरेदी व विक्री. 
-भाडे तत्त्वावर : ट्रॅक्‍टर व अवजारांची भाड्याने देणे व घेण्याची सुविधा . 
- तुलना : ट्रॅक्‍टर व अवजारांची गरजेनुसार तुलना करून निवड करण्याची  सुविधा 
- सर्व ब्रॅंड, एचपीनिहाय क्षमतेचे ट्रॅक्‍टर्स व कृषी अवजारे उपलब्ध . 
- तीन भाषांमध्ये संकेतस्थळ उपलब्ध (हिंदी , मराठी , इंग्रजी ). 
- गुगल प्लेस्टोअरवर इंग्रजीसह दहा प्रादेशिक भाषांमध्ये मोबाइल ऍप   उपलब्ध. 
- 19 ब्रॅंडचे 350 पेक्षा जास्त ट्रॅक्‍टर मॉडेल उपलब्ध . 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online tractor available for farmers due to farming