पॅकेजिंग : विज्ञान, तंत्रज्ञान आणि कला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पॅकेजिंग

पॅकेजिंग : विज्ञान, तंत्रज्ञान आणि कला

सदाशिव पेठेत चाळीसमोर आमचा किराणावाला होता ‘बाबू’. तो धान्य, रवा पुडी बांधून द्यायचा. त्या फाटायच्या आणि जिन्नस सांडल्याने घरी ओरडा मिळायचा. आता माझी नात जवळच्या कोणत्याही किराणा दुकानात जाते, रॅकवर ठेवलेल्या वेगवेगळ्या गोष्टी पाहते. त्यावर किंमत, उत्पादन तारीख, वैधता, घटक पदार्थ असे तपशील पाहते. खरेदी करून आणलेल्या पिशवीत कधी प्लास्टिक डबा, कधी टेट्रापॅक, कधी फॉईल, कधी रॅपर, नानाविध प्रकारची रंगीबेरंगी वेष्टण समोर उलगडते. पॅकेजिंगचा अत्याधुनिक अवतार, जो अगदी खेड्यापाड्यात पोचला आहे.

‘मेक इन इंडिया’ अंतर्गत ‘इको वेअर’ ही भारतातील पॅकेजिंग साहित्य तयार करणारी कंपनी. लंडनमधील फायझरमध्ये काम करणारी रिहा मुजुमदार २०१०मध्ये दिल्लीला आली. दिल्लीत प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण, त्याअनुषंगाने होणारी जनजागृती तसेच आरोग्य आणि पर्यावरण पूरक पॅकेजिंग बनवण्यासाठी चाललेले प्रयोग, रुजत चाललेली ऑरगॅनिक खाद्य-संस्कृती असे अनेक बदल तिने पहिले. खाद्यपदार्थांसाठी पर्यावरणपूरक पॅकेजिंग बनवताना उसाची चिपाटे, गव्हाची पेंड याचा वापर करून नवीन मटेरिअल तिने तयार केले.

अशा अनेक कंपन्या ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत कार्यरत आहेत. भारताने कोरोना काळात केलेली लॉजिस्टिकमधली प्रगती फार्मा, ॲग्री या सेक्टरमधले विक्रमी उत्पादन, निर्यात, याची धुरा पॅकेजिंग इंडस्ट्रिअलने पेलेली आहे. याकडे पाहण्याची नवीदृष्टी देताना पंतप्रधानांनी ज्यूट, बांबू यांचा वापर करून वेष्टण बनवण्याचे आवाहन केले आणि पॅकेजिंग क्षेत्रासाठी = पीपल + प्लॅनेट + प्रॉफिट'' हे महत्त्वाचे सूत्र सांगितले.

सध्या पॅकेजिंग हे भारताच्या अर्थव्यवस्थेतील पाचव्या क्रमांकाचे देशातील अत्यंत वेगाने बदलणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. पॅकेजिंग इंडस्ट्री असोसिएशन ऑफ इंडिया (PIAI) च्या मते, हे क्षेत्र दरवर्षी २२ ते २५ टक्के दराने वाढत आहे. पॅकेजिंग क्षेत्राचे दोन प्रमुख विभागांमध्ये त्याच्या प्रकारानुसार वर्गीकरण केले गेले आहे. कडक पृष्ठभाग असलेले आणि लवचिक पॅकेजिंग. पॅकेजिंग मटेरिअलच्या बाबतीत प्लॅस्टिकचे अजूनही वर्चस्व आहे. ५५ टक्के प्लास्टिक, कागद आणि पुठ्ठा २० टक्के, आणि काच १० टक्के असे मटेरिअलमध्ये वापरले जाते. कुठलाही कच्चामाल उदा. खनिज पदार्थ, लोखंडी सळया ते अगदी बॉल बेअरिंगपासून ते आपल्या घरात येणाऱ्या वस्तू, पॅकेजिंगचं वैविध्य दर्शवितात. हे क्षेत्र वेगाने सर्वसमावेशक बनत आहे. कोरोनानंतर ई-कॉमर्स आणि फार्मास्युटिकल ही दोन क्षेत्र पॅकेजिंग मधल्या संशोधनाला गती देत आहेत.

पॅकेजिंग हे विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे आणि कला आहे. त्याचे प्रमुख काम म्हणजे मालाचा साठवण, वितरण, विक्री आणि वापर हा प्रवास पूर्ण होई पर्यंत माल सुरक्षित ठेवणे. पॅकेजिंग हे पॅकेजची रचना, उत्पादन, वस्तूची ओळख, मूल्यमापन यासाठी, उत्पादनाचे वेगळेपण टिकवण्यासाठी आणि ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी महत्त्वाचे आहे.

ट्रॅक्टर ते हिऱ्याची अंगठी, ताजा सेंद्रिय भाजीपाला ते हवाबंद खाद्य पदार्थ अशा अनेक वस्तूंसाठी आता बाजारात स्पर्धा तयार झाली आहे. जितके तंत्रज्ञान विकसित होत आहे तितके अधिक उत्तम पर्याय समोर येत आहेत. अर्थात पर्यावरण पूरकता हा घटक याही क्षेत्रात निर्णायक ठरत आहे . या दिशेने चाललेले भारताचे प्रयत्न आणि धोरणात्मक बदल पुढील लेखात पाहू.