Power Point : सोशल मीडियाच्या हाती आपला वेग नको

जे लोक ‘क्रिएटिव्ह’ किंवा ‘क्रिएशन फिल्ड’मध्ये आहेत, त्यांच्या आयुष्यात हमखास एक ‘रेंगाळलेली’ फेज येतेच येते. तशी ती प्रत्येकाच्याच आयुष्यात येते म्हणा
socila media
socila mediasakal media

जे लोक ‘क्रिएटिव्ह’ किंवा ‘क्रिएशन फिल्ड’मध्ये आहेत, त्यांच्या आयुष्यात हमखास एक ‘रेंगाळलेली’ फेज येतेच येते. तशी ती प्रत्येकाच्याच आयुष्यात येते म्हणा; पण ज्यांच्यावर वेळेचं बंधन लादलं नाहीये, ते रोजच २४ तास स्वत:ला सकारात्मक, सेल्फ मोटिव्हेटेड ठेवू शकतीलच असं नाही. काहीतरी सुचायला, काहीतरी निर्माण करायला, अगदी खोल खोल आतून विचार यावा लागतो. २-४ आठवडे खूपच कंटाळवाणे जातात. पहिल्या आठवड्यात वाटतं, की आता पुढच्या आठवड्यापासून पुन्हा कामाला लागू. काहीतरी सुचेल. काहीतरी वेगळं; पण ५-६ दिवस तसेच थंड गेले, की अजून अजून मलूल पडायला होतं.

आता अशा क्रिएटिव्ह फिल्डमध्ये कोण कोण येतात? तर कुठलेही कलाकार, जे स्वत:च्या कल्पनांवर काही निर्मिती करत असतात. कुठलाही व्यावसायिक, जो एकहाती काही गाठण्याच्या प्रयत्नात असतो. आणि हो गृहिणीदेखील! मला अशा अनेक मैत्रिणींचं खूप खूप कौतुक वाटतं, ज्या सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत दर तासाला, स्वतःसाठी एक ‘टास्क’ तयार करून तो मनापासून निभावत असतात. बाहेरून बघणाऱ्याला ते ‘काहीच करत नाही’ असं वाटेल; पण ‘काहीच करत नाही’ असं वाटणारी व्यक्ती मनात खोलवर सगळ्यात जास्त संघर्ष करत असते. बेडशीट्स बदलणं, पांघरुणाच्या घड्या घालणं या कामांत ‘एकही सुरकुती येऊन देत नाही मी’, हा ‘सेन्स ऑफ अचिव्हमेंट’ फक्त तिचा तिला माहिती. असं स्वत:ला रोज नवनवीन उद्दिष्टं देत गुंतवून घेणं, हा सगळ्यात अवघड भाग असतो. अशा मैत्रिणी स्वत:ला ‘चुणचुणीत’ ठेवण्यासाठी मनात दहा घोड्यांच्या पळण्याचा वेग आणत असतात, जे खरंचच अवघड; पण स्तुत्य आहे.

म्हणूनच या वेगात कधी स्पीडब्रेकर आला, तर त्यावर तुम्हीही रेंगाळायला शिका. स्वत:ला मानसिक इतकंही थकवू नका. आपण कुणापेक्षा मागे पडतोय का? किंवा आपला वेग कमी झालाय का? असं वाटण्यामागे सगळ्यात मोठं कारण सोशल मीडियाचं आहे. ‘आजचा घरचा मेन्यू’ म्हणून एखादी मैत्रीण भरल्या ताटाचा फोटो टाकते आणि आपल्या मनात चलबिचल सुरू होते, की, ‘अरे, मी काहीच करत नाहीये का? माझ्याकडून होत नाहीये का?’ हीच ती वेळ, जेव्हा स्वयंपाकघराकडे वळलेली पावलं बाहेर आणा आणि मोबाईल बंद करा.

कपल गोल्स, फ्रेंड्स गोल्स, लग्नाचे वाढदिवस, बारशी, डोहाळजेवणं, अनेक वर्षांनंतरच्या भेटी, असे कित्येक फोटो सोशल मीडियावर पाहून ते आपल्या जगण्याच्या वेगाशी जुळवू नका. कारण त्यानं प्रत्येक वेळेला प्रोत्साहन मिळतच असं नाही. तर आपल्या आयुष्यातल्या संपलेल्या, विरलेल्या, सुटलेल्या, नसलेल्या, नको म्हणून ठरवलेल्या, हजार गोष्टी उगाचच अधोरेखित होतात. त्यामुळे आपल्याला वाटतं आपण ‘रेंगाळलोय’, कारण आपण नकळत अशा एका तराजूत चढतो ज्यात दुसऱ्या बाजूला कुणाच्या करी ‘आभासी’ वेगवान जगण्याचं उदाहरण तुलनेसाठी उभं असतं.

ज्या क्षणी आपल्याला वाटेल त्या क्षणी आपण ‘बाऊन्स बॅक’ करू शकतो. थोडक्यात, ट्रेन पटरी पे आ सकती है! पण ती वेळ स्वत:च्या इच्छेनं ठरवूयात. सोशल मीडियावर तुलना करून नाही. स्वत:च्या कोशात जगा किंवा दहा लोकांच्या नजरा स्वत:वर खिळवून जगा. कुठल्या वेळी काय करावं ही वेळ फक्त आणि फक्त स्वत:चं स्वत: ठरवा. ‘मी काहीच करत नाहीये असं नाहीये, मला जमेल तितकं मी करतीये,’ हे समोरच्याला पटवून द्यायला तर मुळीच जाऊ नका. कारण ज्या क्षणी दुसऱ्याला जाणवून देण्यासाठी आपण काम करायला लागू, तेव्हा आपला नैसर्गिक वेग अडखळेल हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com