जांभळा रंग हा शोधक, शांतताप्रिय, प्रयत्नवादी ; हा रंग असा ठरु शकतो फायदेशीर.....

शिल्पा देगावकर, कोल्हापूर
सोमवार, 6 जुलै 2020

जांभळा रंग शोधक वृत्तीचा, नवीन गोष्टी शिकण्यास प्रवृत्त करणारा. मानवतावादी, नि:स्वार्थी, शांतताप्रिय, समाधानी, प्रयत्नवादी, आध्यात्मिक, दूरदर्शीपणा जपणारा आहे. तसाच तो विद्वत्ता, सन्मान, स्वातंत्र्य, उत्कटता, परिपूर्णता, चैतन्य, ज्ञान याच्याशीही तो जोडलेला आहे.

वैयक्तिक असो अथवा व्यावसायिक कारण असो सध्या प्रत्यक्ष भेटणे टाळले जात आहे. जवळजवळ सर्वच गोष्टी online झालेल्या आहेत. virtual विश्‍वात वेबसाईट, official profiles, अँप्सद्वारा व्यवसाय हीच पद्धत विकसित होत आहे. या सगळ्यासाठी रंगाची निवड महत्त्वाची असणार की नाही? शरीरावर, मनावर इतकेच नव्हे तर व्यवसायावरही रंगाचा स्वतःचा असा प्रभाव असतो. आजूबाजूला असलेल्या, डोळ्यांसमोर दिसणाऱ्या रंगाचा म्हणजे प्रत्येक मिनिटाला आपल्या चेतन आणि अचेतन मनावर परिणाम होत आहे. त्याची पुरेशी जाणीव फक्त आपल्याला नाही.

Yahoo एक जागतिक ब्रॅंड, इंटरनेट Search Engine म्हणून Google नंतर दुसऱ्या स्थानावर असलेले Yahoo जांभळ्या रंगाद्वारे सहज ओळखला जातो जो सामर्थ्य, धैर्य आणि थोडे रहस्य व्यक्त करतो. यश, सक्षमता दर्शविण्यासाठी फिक्कट जांभळा वापरणारी multinational स्तरावर नोकरी मिळवून देणारी Monster ही अजून एक कंपनी. जांभळा आणि गोल्डन कलर याचे कॉम्बिनेशन हॉलमार्कच्या लोगोमध्ये दिसून येते. जांभळाच लोगो अन पॅकिंग पण त्याच रंगात अशी कॅडबरी त्याची गुणवत्ता, दर्जा, असामान्यता आणि लक्‍झरी तर महिला सौंदर्यप्रसाधनांच्या लोगो अथवा पॅकिंग डिझाईनमध्ये असणारा व्हायोलेट रंग प्रामाणिकपणा, भावनिकता स्पष्ट करतो. हस्तकला आणि प्राचीन वस्तू विकणाऱ्या व्यवसायांसाठी लव्हेंडर वापरला जातो. बौद्धिक विचार आणि कर्तृत्वाला प्रेरणा देणारी वाक्‍ये बहुतेकदा जांभळ्या किंवा व्हॉयलेटच्या रंगात असतात.

निसर्गात व्हायलेट/ जांभळा रंग खूप कमी प्रमाणात आढळतो. जसे की लव्हेंडर, ऑर्किड अतिशय नाजूक, सुंदर, दुर्मीळ फुले त्यामुळे आपोआप मौल्यवान. अतिउष्ण (लाल) सर्वांत जास्त शीत (निळा) रंगाच्या मिश्रणाने तयार झालेल्या जांभळ्या रंगात निळ्याची स्थिरता आणि लाल रंगाची ऊर्जा दिसून येते. या रंगाचा शरीर, मन बुद्धी आणि आत्मा या साऱ्यांवर खोल प्रभाव पडतो. प्रामुख्याने आध्यात्मिक प्रगती, कल्पनाशक्तीला चालना, संवेदनशीलता, सामर्थ्य, कुलीनता, विपुलता, समृद्धी आणि लक्‍झरी यांचे प्रतीक आहे. विद्वत्ता, सन्मान, स्वातंत्र्य, उत्कटता, परिपूर्णता, चैतन्य, ज्ञान, रहस्य आणि जादूशी संबंधित आहे. जांभळा रंग आवडणारे लोक शोधक वृत्तीचे, नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्साही. मानवतावादी, नि:स्वार्थी, शांतताप्रिय, समाधानी, प्रयत्नवादी, आध्यत्मिक, दूरदर्शी असतात. लाल रंग हा सर्वात जास्त लक्षवेधी त्याच्या खालोखाल येतो तो जांभळा. लहान मुले, किशोर वयाची मुले लाल रंगानंतर जांभळ्या रंगाकडेच आकर्षिली जातात. व्हायलेट हा रंग गुलाबी रंगाप्रमाणे महिलांना जास्त आवडतो. जांभळ्या रंगाच्या अतिवापरामुळे चिडचिडेपणा, अधीरपणा आणि अहंकार, गर्व आणि हा रंग वापरलाच नाही (अभाव असेल) तर अपरिपक्वता, शक्तिहीनता, नकारात्मकता आणि औदासीनता उत्पन्न होते.

जांभळा रंगाचा वापर मज्जातंतू विकार, निद्रानाश, औदासीन्य, मायग्रेन, तणाव, डोकेदुखी, फीट येणे अशा आजारात औषधाबरोबर करावा. भरकटल्यासारखे वाटणे, आयुष्यातले ध्येयच हरवले आहे किंवा ध्येयाप्रती हवे तेवढे कष्ट देता न येणे अशा मनस्थितीत जांभळा रंग प्रेरणा देतो, प्रोत्साहित नक्कीच करतो.

कोणता रंग सगळ्यात उत्तम? कोणता रंग सर्वात वाईट? या प्रश्नांना उत्तर नाही, पण गरजेनुसार परिस्थितीमध्ये बदल घडवण्याचे सामर्थ्य ज्या रंगात आहे, त्या रंगाची तेथे निवड केली जाते. रंगात आहे काय इतकं? विचार का करायचा रंगाचा इतका? तुझे तू बघ बाबा, रंग सिलेक्‍ट कर, पण design छान दिसलं पाहिजे हं ! काय आमचा graphics designer, कसले भडक रंग वापरतो, कधी सुधारणार हे लोक? लाल पिवळ्यातून बाहेर कधी येणार? असे काही सहज बोलून जाण्यापूर्वी आपल्या फायद्यासाठी थोडासा का होईना रंगाचा विचार स्वतः करणे आवश्‍यक आहे, असे वाटते का? लेखमालेद्वारा केलेला तसाच हा प्रयत्न! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Purple color is an inventive peaceful effortless kolhapur