वो स्त्री है…! थार आणि स्कॉर्पिओच्या राऊडी डिझाईनमागे आहे यांचं डोकं; कोण आहेत रामकृपा अनंतन? | Ramkripa Ananthan the women behind designs of Mahindra Thar Scorpio and XUV700 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramkripa Ananthan

वो स्त्री है…! थार आणि स्कॉर्पिओच्या राऊडी डिझाईनमागे आहे यांचं डोकं; कोण आहेत रामकृपा अनंतन?

महिंद्राच्या स्कॉर्पिओ आणि थार या गाड्या सर्वांनीच पाहिल्या असतील. भारतात या गाड्यांचे कोट्यवधी चाहते आहेत. स्कॉर्पिओ पहिल्यापासूनच डिमांडमध्ये आहे, तर थारची मागणीही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अगदी मारूतीच्या जिम्नी गाडीलाही थारचं वादळ थांबवता आलेलं नाही.

महिंद्राच्या या गाड्यांच्या लोकप्रियतेमध्ये सगळ्यात मोठा वाटा, त्यांच्या डिझाईनचा आहे. या गाड्या केवळ लोकप्रियच नाहीत, तर आता एक स्टेटस सिम्बॉल म्हणून ओळखल्या जातात. मात्र अगदी थोड्या लोकांना माहिती आहे, की या गाड्यांचं डिझाईन एका स्त्रीने (Designer of Thar) केलं आहे.

कोण आहेत रामकृपा

रामकृपा अनंतन (Ramkripa Ananthan) यांनी IIT बॉम्बेमधून शिक्षण घेतलंय. याठिकाणी त्यांनी डिझाईनिंगचा कोर्स केला होता. यासोबतच, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी मॅकेनिकल इंजिनिअरिंग केलं आहे. 1997 साली त्यांना महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड कंपनीत नोकरी मिळाली. याठिकाणी इंटिरिअर डिझाईनर म्हणून त्यांनी काम सुरू केलं.

पुढे 2005 साली डिझाईन टीमच्या प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांनी महिंद्रा XUV 500 ही कार डिझाईन केली. दहा वर्ष टीम प्रमुख म्हणून काम केल्यानंतर चीफ डिझाईनर पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांनी थार (Mahindra Thar), XUV 700 आणि स्कॉर्पिओ (Mahindra Scorpio) अशा आयकॉनिक गाड्या डिझाईन केल्या.

विदेशातही डंका

अनंतन यांनी महिंद्रा XUV 300 Compact SUV आणि Marazzo MVP या गाड्या डिझाईन करून वैयक्तिक पोर्टफोलिओ तयार केला होता. Ssangyong आणि MANA अशा आंतरराष्ट्रीय टीम्ससोबत हे डिझाईन सादर करण्यात आले.

उभारला स्वतःचा स्टुडिओ

रामकृपा अनंतन यांनी दोन वर्षांपूर्वी महिंद्रा कंपनीतून राजीनामा दिला. यानंतर त्यांनी KRUX नावाने स्वतःचा स्टुडिओ उभारला आहे. या स्टुडिओने आतापर्यंत Two2 नावाची एक कॉन्सेप्ट बाईक सादर केली आहे. यासोबतच, त्या ओला इलेक्ट्रिक कंपनीत देखील डिझाईन प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. अर्थात, त्यांनी डिझाईन केलेलं एकही उत्पादन अद्याप ओलाने लाँच केलेलं नाही.