केवळ तीस रुपयांत प्या शुद्ध पाणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

बेळगावच्या निरंजन करगी या २३ वर्षीय युवकाने दूषित पाण्याचा प्रश्‍न गांभीर्याने घेत त्यावर संशोधन सुरू केले. घरात बसविण्यात येणारी जलशुद्धीकरण यंत्रे महागडी असून ती सामान्यांना परवडत नाहीत. त्यामुळे, लोकांना दूषित पाणीच प्यावे लागते. पण, निरंजनने संशोधन करून कोणत्याही बाटलीला बसवता येईल, अशा प्रकारचे लहान आकाराचे जलशुद्घीकरण यंत्र बसविले आहे.

बेळगाव - असं म्हणतात की, गरज ही शोधाची जननी असते. सध्या दूषित पाण्याचा प्रश्‍न लोकांसमोर आ वासून उभा आहे. त्यासाठी घराघरांत जलशुद्धीकरण यंत्रे (वॉटर फिल्टर) बसविण्यात येत आहेत. पण, घराबाहेर पडले की दूषित पाणीच प्यावे लागते. त्यामुळे बेळगावच्या तरुणाने कल्पकतेने अवघ्या ३० रुपये उत्पादन खर्चात जलशुद्घीकरण यंत्र बनविले असून ते खिशातून कुठेही नेता येते. याबाबत त्याचा गौरवही करण्यात आला आहे.

बेळगावच्या निरंजन करगी या २३ वर्षीय युवकाने दूषित पाण्याचा प्रश्‍न गांभीर्याने घेत त्यावर संशोधन सुरू केले. घरात बसविण्यात येणारी जलशुद्धीकरण यंत्रे महागडी असून ती सामान्यांना परवडत नाहीत. त्यामुळे, लोकांना दूषित पाणीच प्यावे लागते. पण, निरंजनने संशोधन करून कोणत्याही बाटलीला बसवता येईल, अशा प्रकारचे लहान आकाराचे जलशुद्घीकरण यंत्र बसविले आहे. त्यासाठी त्याला केवळ ३० रुपयांचा खर्च आला आहे. या यंत्रामुळे अशुद्ध पाणी शुद्ध होत असून त्याच्या या शोधाची दखल १४ आणि १५ रोजी हुबळीत झालेल्या दोनदिवसीय राष्ट्रीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योजकता परिषदेत घेण्यात आली. त्याठिकाणी जलशुद्घीकरण यंत्राचे सादरीकरण झाले. या अनोख्या संशोधनाचे कौतुक झाले. परिषदेतील सादरीकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला आहे.

निरंजनने अंगडी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंटमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळविली आहे. त्याच्या जलशुद्घीकरण यंत्राला ‘नीरनल’ नाव दिले असून, त्याला विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. 

असे आहे नीरनल
एक नीरनल १०० लिटर पाणी शुद्ध करू शकते. कोळसा, कापड यांचा वापर केला असून, ९९ टक्‍के जलशुद्घीकरण होते, असा निरंजनचा दावा आहे. इको फ्रेंडली असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. नीरनल कुठेही नेता येऊ शकते, असे त्याचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Research of Belgaum youth on water filter