

कोरोनाविरोधातील युद्धात सर्वांत सोपे आणि महत्त्वाचे शस्त्र म्हणजे कोविड प्रतिबंधक लस. १६ जानेवारी २०२१पासून देशात सुरू झालेली लसीकरण मोहिमेला अनेक अडचणी, आव्हानांना सामोरे जावे लागले. भारतात लसीकरणाची मोहीम अधिक सोपी व्हावी, लोकांना लसीकरण केंद्राची माहिती सहजपणे मिळावी, म्हणून गुगलनेही पुढाकार घेतला आहे. परिणामी गुगलच्या या ‘बूस्टर डोस’मुळे लसीकरणाचा वेग वाढण्यास निश्चितच फायदा होणार आहे.
गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाशी दोन हात करत आहे. जगभरातील संशोधक, वैद्यकीय तज्ज्ञ, डॉक्टर्स यांच्यासह सर्वांसाठीच हा आजार नवा होता. त्यामुळे कोरोनावर निश्चित अशी कुठलीच उपचार पद्धती नव्हती. रुग्णांच्या लक्षणांनुसार आणि उपलब्ध होत गेलेल्या माहितीच्या आधारे उपचार करण्यात आले. संपूर्ण जगातील शास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर गेल्यावर्षी कोविड प्रतिबंधक लशीचा शोध लागला. त्यानंतर केंद्र सरकारच्या परवानग्या आणि मान्यतेनंतर लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. लसीबद्दलचे गैरसमज दूर होत लसीकरणाला प्रतिसाद वाढू लागला, परंतु मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने देशभरात लसीकरण मोहीमेची रखडपट्टी झाली.
लसीकरणासाठी नावनोंदणी करतानाही कोविन पोर्टलवर देखील सुरूवातीला अनेकांना अडथळे आले. आदिवासी, पर्वतीय तसेच दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी आरोग्य विभाला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यामुळे भारतासारख्या मोठ्या देशात लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि त्याचबरोबर लसीकरणाबाबतची इत्थंभूत माहिती नागरिकांना मिळावी यासाठी गुगलने हातभार लावला. कोविन पोर्टलवरील रिअल टाइम डेटाच्या मदतीने गुगल देशभरातील लोकांपर्यंत लसीकरणाची माहिती पोहोचवत आहे.
त्यानुसार सप्टेंबर महिन्यापासून गुगलने भारतभरातील १३,००० हून अधिक ठिकाणी लोकांना लशीच्या उपलब्धतेविषयी आणि अपॉइंटमेंट्सविषयी माहिती उपलब्ध करून देण्यास सुरूवात केली. यामध्ये प्रत्येक लसीकरण केंद्रावरील लशीची उपलब्धता, कोणत्या डोससाठी लसीकरण सुरू आहे, लसीकरण निःशुल्क की सशुल्क, तसेच अपॉइंटमेंट घेण्यासाठी कोविन पोर्टलची लिंक गुगलद्वारे त्यांच्या विविध प्लॅटफॉर्मवरून उपलब्ध केली. त्यानुसार गुगल सर्च, गुगल मॅप आणि गुगल असिस्टंटच्या मदतीने नागरिकांना इंग्रजी, हिंदी, मराठी, बंगाली, तेलुगू, तमीळ, मल्याळम, कन्नड आणि गुजराती या आठ भारतीय भाषांमध्ये लसीकरणाबाबत माहिती घेता येणार आहे.
अशी करा नावनोंदणी...
गुगल सर्च, गुगल असिस्टंट किंवा गुगल मॅप ओपन करा
सर्च बॉक्समध्ये ‘कोविड व्हॅक्सिनेशन निअर मी’ टाइप करा
तुम्हाला जवळचे लसीकरण केंद्र दिसतील.
संबंधित केंद्राच्या नावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ‘बुक अपॉइंटमेन्ट’ हा पर्याय दिसेल.
त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला थेट कोविन पोर्टलच्या माध्यमातून लशीसाठी नावनोंदणी करता येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.