esakal | टेक्नोहंट : ट्रू कॉलरला पर्याय ‘भारत कॉलर’चा!
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Caller

टेक्नोहंट : ट्रू कॉलरला पर्याय ‘भारत कॉलर’चा!

sakal_logo
By
ऋषिराज तायडे

भारतात कॉलर आयडीसाठी सर्वाधिक वापरले जाणारे अॅप म्हणजे ट्रु-कॉलर; मात्र ट्रुकॉलरच्या माध्यमातून डेटा लिक आणि डेटा चोरी आरोप वारंवार होत असल्याने या अॅपच्या विश्वासार्हतेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याने सुरू केलेल्या स्टार्टअपने ‘भारत कॉलर’ हे अस्सल देशी कॉलर आयडी अॅप विकसित केले आहे.

सध्या अनेकांना अनोळखी लोकांचे, जाहिरातदारांचे किंवा स्पॅम कॉल येतात. काही आंतरराष्ट्रीय स्पॅम कॉल तुम्ही रिसीव्ह केल्यास आर्थिक भुर्दंड पडतो. तसेच, खंडणी किंवा धमकीवजा कॉलही केले जातात. त्यामुळे तुम्हाला आलेला कॉल नेमका कुणाचा आहे, ते जाणून घेण्यासाठी अनेकजण कॉलर आयडी अॅपचा वापर करतात. त्यातही सर्वाधिक वापरले जाणारे कॉलर आयडी अॅप म्हणजे ट्रू कॉलर. या अॅपच्या माध्यमातून आपल्याला आलेला कॉल नेमका कुणाचा हे जाणून घेता येते.

मात्र, ट्रू कॉलर अॅपच्या विश्वासार्हतेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या अॅपच्या माध्यमातून युजर्सच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट नंबर व इतर महत्त्वाची माहिती हॅक केली जात असल्याचे उघड झाले. त्यामुळे ट्रू कॉलर अॅपला पर्याय म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा विद्यार्थी प्रज्वल सिन्हा आणि कुणाल पसरिचा यांच्या किकहेड सॉफ्टवेअर स्टार्टअप कंपनीने भारत देशी बनावटीचे कॉलर आयडी अॅप विकसित केले आहे. भारत कॉलरचा सर्व्हर देशातच असून, या सर्व्हरवर युजर्ससे कॉन्टॅक्ट आणि कॉल लॉग साठवले जाणार नाहीत. युजर्सच्या प्रायव्हसीमध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप केला जाणार नाही. त्याशिवाय कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे युजर्सच्या फोन नंबर्सबाबत कोणताही डेटाबेस नसतो. अशा डेटापर्यंत ते पोहोचूही शकत नाहीत, असा दावा करण्यात आला आहे. भारत कॉलर अॅप गुगल प्ले-स्टोअर व अॅप-स्टोअर वरून निःशुल्क डाऊनलोड करता येते. प्रज्वल सिन्हा आणि कुणाल पसरिचा यांच्या या संशोधनाबद्दल आणि कामगिरीबाबत गेल्यावर्षी राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डेटा इन्क्रिप्शनचा वापर

डेटा सिक्युरिटीसाठी भारत कॉलर अॅपचा संपूर्ण डेटा इन्क्रिप्टेड पद्धतीने साठवला जातो. त्यामुळे युजर्सच्या प्रायव्हसीची भारत कॉलरकडून विशेष काळजी घेण्यात येते. त्यांचा डेटा भारताबाहेर कोणीही वापरु शकत नाही. हे अ‍ॅप इंग्रजीसह हिंदी, मराठी, तमीळ, गुजराती भाषांमध्येही उपलब्ध आहे.

कॉलर आयडी अॅप म्हणजे काय?

कॉलर आयडी अॅपच्या माध्यमातून तुम्हाला कोणी अनोळखी व्यक्ती कॉल करतो आहे, याची माहिती मिळते. त्याद्वारे कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव ओळखता येते. तुमच्याकडे संबंधित व्यक्तीचा नंबर सेव्ह नसल्यास या अ‍ॅपद्वारे कॉल करणाऱ्या व्यक्तीचे संपूर्ण डिटेल्स मिळतील. स्पॅम नंबर असतील, तर त्याबाबतही पूर्वसूचना दिली जाते.

loading image
go to top