टेक्नोहंट : डिजिटल इंडियासाठी... | Digital India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Google for India
टेक्नोहंट : डिजिटल इंडियासाठी...

टेक्नोहंट : डिजिटल इंडियासाठी...

sakal_logo
By
ऋषिराज तायडे

कोविडमुळे भारतासह जगभरात इंटरनेटचा वापर अभूतपूर्व वाढला आहे. ऑनलाईन एज्युकेशन, वर्क फ्रॉम होमसोबत भारतातील अनेक व्यवहार डिजिटल होत आहे. त्यानिमित्त गुगलने आता भारतीयांना नवनवीन सुविधा देण्याचा संकल्प केला आहे. नुकत्याच झालेल्या गुगलच्या ''गुगल फॉर इंडिया'' या सातव्या वार्षिक परिषदेत त्याबाबतची घोषणा करण्यात आली. गुगल सर्च, गुगल पे, गुगल क्लासरूम्स आता नव्या फीचर्स आणि नव्या संकल्पनासह भारतीयांना अनुभवता येणार आहे.

1) गुगल सर्च आता प्रादेशिक भाषेत

गुगलवर शोधली जाणारी प्रत्येक माहिती भारतीयांना आता प्रादेशिक भाषेत उपलब्ध होणार आहे. यासाठी गुगल सर्चची यंत्रणा अपडेट करण्यात आली आहे. त्यानुसार प्रादेशिक भाषेत माहिती शोधण्यासोबतच त्याचे रिझल्ट म्हणून दिसणारी वेबपेजही तुम्हाला त्याच भाषेत उपलब्ध होतील. संबंधित वेबपेज मूळ कुठल्या भाषेत आहेत, हे देखील आता बघता येणार आहे. हे नवं फीचर सध्या हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत उपलब्ध झालं असून लवकरच अन्य भारतीय भाषेतही उपलब्ध होणार आहे. त्यासोबतच व्हॉईस कमांडवरही गुगल सर्च वापरता येणार असून, हिंग्लिश आणि पाच प्रादेशिक भाषांमध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे.

2) आर्थिक व्यवहार अधिक सुलभ

आर्थिक व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘गुगल पे’वर आता व्हॉईस कमांडची सुविधा - ‘स्पीच टू टेक्स्ट’ उपलब्ध होणार आहे. युजर्सना ‘गुगल पे’मध्ये खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक व्हॉईस कमांडनेही प्रविष्ट करता येईल. तसेच, लवकरच ‘गुगल पे’मध्येही हिंग्लीश भाषेत व्यवहार करता येणार आहे. यासोबतच ‘गुगल पे’मध्ये काही खास फीचर्स येणार आहेत, त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘बिल स्प्लिट’. तुमच्या जमा-खर्चाचा योग्य पद्धतीने ताळमेळ लावण्यासाठी गुगल पेचं हे फीचर खास असेल. तुमच्या प्रत्येक व्यवहारावर लक्ष ठेऊन तुमचा दिवसभरातील खर्च कुठल्या आणि कोणत्या गोष्टींवर झाला, ते बिल स्प्लिटच्या माध्यमातून ट्रॅक करता येईल. व्यावसायिकांसाठीही ‘गुगल पे’वर ‘माय शॉप’ हे फीचर उपलब्ध होणार आहे. त्यानुसार व्यावसायिकाला त्याच्याकडील उत्पादनांचे फोटो, माहिती तसेच किमती वगैरे त्यावर दाखवून ते थेट ग्राहकांनाही शेअर करता येईल. येत्या महिन्याभरात हे नवे फीचर्स भारतात उपलब्ध होईल, अशी माहिती गुगलने दिली.

3) एन्ड-टू-एन्ड लसीकरण नोंदणी

काही दिवसांपूर्वी गुगल सर्च, गुगल असिस्टंट आणि गुगल मॅपच्या साह्याने कोविड लसीकरण केंद्र शोधण्याची सुविधा गुगलने उपलब्ध केली होती. त्यापाठोपाठ आता गुगलने कोविन पोर्टलसोबत सहकार्य करत गुगल असिस्टंटच्या माध्यमातून एन्ड-टू-एन्ड म्हणजे लसीकरण केंद्र शोधण्यापासून ते अगदी नोंदणी करण्यापर्यंतची सोय उपलब्ध केली आहे.

4) प्रदूषण आणि हवामानाची माहिती

बदलते हवामान आणि घडामोडींबाबत गुगलने तीन नव्या फीचर्सची घोषणा केली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत भागीदारी करत गुगल आता युजर्सना त्यांच्या स्थानिक पातळीवरील प्रदुषणाची परिस्थिती दर्शवणारा हवा गुणवत्ता निर्देशांक अर्थातच एअर क्वालिटी इंडेक्स दाखवणार आहे. त्यासोबतच एखाद्यावेळी हवामानाची आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास गुगल भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या सहकार्याने तातडीने अलर्ट पोहोचवणार आहे. “Weather near me.” सर्च केल्यास स्थानिक पातळीवर हवामानविषयक माहिती तुम्हाला उपलब्ध होईल.

5) शिक्षण आणि रोजगारासाठी पुढाकार

कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. त्यानुसार गुगलनेही पुढाकार घेत भारतीय विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने चांगले आणि दर्जेदार शिक्षण देण्याची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत गुगल क्लासरूम हा गुगलद्वारे विकसित केलेला लर्निंग प्लॅटफॉर्म आता ऑफलाईनही पद्धतीनेही उपलब्ध होणार आहे. त्यानुसार गुगल क्लासरूममधील कोणत्याही प्रकारची माहिती विद्यार्थी डाऊनलोड करू शकतील आणि हव्या त्यावेळी ते वापरता येईल. देशातील ऑनलाईन एज्युकेशन देणाऱ्या कंपन्यांच्या साह्याने विद्यार्थ्यांना गुगल सर्चवरच विविध विषयांतील ‘प्रॅक्टिस प्रॉब्लेम फीचर’ अॅक्सेस करता येईल.

loading image
go to top