
गुगल मॅप, हल्लीच्या डिजिटल युगातील सर्वांचाच मार्गदर्शक असलेल्या गुगल मॅपची आपल्या सर्वांनाच बरीच मदत होते.
टेक्नोहंट : गुगल ‘स्ट्रीट व्ह्यू’ आता भारतातही
गुगल मॅप, हल्लीच्या डिजिटल युगातील सर्वांचाच मार्गदर्शक असलेल्या गुगल मॅपची आपल्या सर्वांनाच बरीच मदत होते. केवळ एखाद्या ठिकाणी जाण्याचाच मार्ग नव्हे, तर इतर व्यावसायिक क्षेत्रातही गुगल मॅपचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. ई-कॉमर्स, ऑनलाइन फूड डिलिव्हरी, अॅप आधारित टॅक्सी सेवा आदी क्षेत्रात गुगल मॅप महत्त्वाची भूमिका बजावतो. बदलत्या काळानुसार गुगल मॅपचा वापर आणि त्याची उपयोगिताही वाढत गेली, गरजेनुसार त्यात बदलही होत गेले.
या २००५मध्ये सुरू झालेल्या सुविधेमध्ये आतापर्यंत काळानुरूप नवनवीन अपडेट्स, नवनवे फीचर्स आपल्या भेटीला आले. ट्रॅफिक मोड, सायकलिंग मोड, सॅटेलाईट व्ह्यू, आदी बेसिक पर्यायांपाठोपाठ काही वर्षांपूर्वीच गुगल मॅपने अमेरिकेत ऑग्मेन्टेड रिअॅलिटीचा वापर करण्यात सुरुवात केली. त्यानंतर ऑनलाइन मोडचाही पर्याय उपलब्ध करण्यात आला. कोरोना काळात कोविड केंद्र, लसीकरण केंद्र तुमच्या घराजवळ नेमके कुठे आहे, यासाठीही गुगल मॅपने पुढाकार घेतला होता.
भारतात स्ट्रीट व्ह्यू
आता गुगल मॅपवरील स्ट्रीट व्ह्यू हे खास फीचर भारतातही लॉन्च झाले आहे. २००७मध्ये अमेरिकेत पहिल्यांदा स्ट्रीट व्ह्यूचा पर्याय उपलब्ध झाला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर देशातही हे फीचर्स उपलब्ध झाले. खरेतर हे फीचर भारतात २०१६मध्ये येणार होते; मात्र केंद्रीय गृह आणि संरक्षण मंत्रालयाने सुरक्षेच्या कारणावरून स्ट्रीट व्ह्यूला देशात बंदी घातली होती. त्यानंतर २०१८मध्ये गुगलने नव्याने दाखल केलेला प्रस्तावही सरकारने फेटाळून लावला. त्यामुळे स्ट्रीट व्ह्यू भारतात कधी येणार, याबाबत अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती व ती अखेर संपुष्टात आली असून, सरकारच्या नियम व अटींच्या अधीन राहून नुकतेच बंगळूरमध्ये गुगल स्ट्रीट व्ह्यूचे फीचर सुरू झाले आहे. लवकरच प्रमुख दहा शहरांमध्ये स्ट्रीट व्ह्यूची सेवा उपलब्ध होईल आणि या वर्षाअखेरपर्यंत देशातील ५० शहरांमध्ये हे फीचर सादर करण्याचा गुगल मॅपचा मानस आहे.
काय आहे स्ट्रीट व्ह्यू?
एखाद्या रस्त्यावरून जाताना आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या सर्व गोष्टी उदा. वाहने, रस्त्याकडेला असलेल्या इमारती, दुकाने, झाडे आता स्ट्रीट व्ह्यूमध्ये अगदी ३६० अंशांमध्ये तुमच्या स्मार्टफोनमधील गुगल मॅपवर दिसणार आहे. त्यासाठी गुगलने एका वाहनावर बसवलेल्या खास कॅमेऱ्याद्वारे, तसेच नियुक्त करण्यात आलेल्या स्थानिक छायाचित्रकारांद्वारे चित्रीकरण करण्यात आले. अशाप्रकारे देशभरात आतापर्यंत दीड लाख किलोमीटर मार्गाचे स्ट्रीट व्ह्यूसाठी चित्रीकरण करण्यात आले आहे. या फीचरमुळे घरबसल्या कुठल्याही ठिकाणाचा अनुभव घेता येणार आहे. ‘जिनेसिस इंटरनॅशनल’ आणि ‘टेक महिंद्रा’च्या साह्याने गुगलने भारतात स्ट्रीट व्ह्यूचे फीचर उपलब्ध केले आहे.
कसे वापरणार?
तुमच्या स्मार्टफोनमधील गुगल मॅपचे अॅप ओपन केल्यानंतर विविध मोड असणाऱ्या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर खालील बाजूला पब्लिक ट्रान्स्पोर्ट, ट्रॅफिक मोडच्या खाली असलेल्या स्ट्रीट व्ह्यूचा पर्याय निवडावा.
सर्च बॉक्समध्ये प्रमुख शहरातील एखादा पत्ता सहजपणे शोधता येईल.
लवकरच दहा शहरांमध्ये सुविधा
मुंबई
पुणे
नाशिक
अहमदनगर
दिल्ली
अमृतसर
बडोदा
कोलकता
हैदराबाद
चेन्नई
Web Title: Rushiraj Tayade Writes Google Street View In India Digital
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..