टेक्नोहंट : विकृत मानसिकतेमुळे ‘मेटाव्हर्स’वर प्रश्नचिन्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Metaverse
टेक्नोहंट : विकृत मानसिकतेमुळे ‘मेटाव्हर्स’वर प्रश्नचिन्ह

टेक्नोहंट : विकृत मानसिकतेमुळे ‘मेटाव्हर्स’वर प्रश्नचिन्ह

विज्ञान, तंत्रज्ञान तसेच नवसंशोधनामुळे आपल्या सर्वांचंच आयुष्य सुकर झाले आहे. मात्र, तुमच्या-आमच्या फायद्यासाठी, सकारात्मक कामासाठी निर्मिलेल्या तंत्रज्ञानाचा वापर वाईट गोष्टींसाठी होत असल्याने एकूणच संशोधकांच्या हेतूलाच डाग लागत आहे.

पुढील काही वर्षात आपले आयुष्य हे नवतंत्रज्ञानाभोवती गुंफलेले असेल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तंत्रज्ञान क्षेत्रात दररोजच नवनव्या संकल्पना उदयास येत आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, व्हर्च्युअल रिॲलिटी, ऑगमेंटेड रिॲलिटी, इंटरनेट ऑफ थिंग्स यासारख्या ‘आयुधांचा’ वापर करत नवनवे आविष्कार घडत आहेत. त्यालाच पुढे नेत सर्वाधिक चर्चा आहे ती मेटाव्हर्सची. मागील वर्षी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी मेटाव्हर्सबाबत घोषणा केली होती. वास्तविक परिस्थिती, व्हर्चुअल रिॲलिटी आणि इंटरनेट यांचा तिहेरी संगम म्हणजे ‘मेटाव्हर्स’. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘मेटाव्हर्स’ ही अशी आभासी दुनिया, की जिथे तुम्हाला तुमच्या खास अवताराच्या माध्यमातून हव्या त्या काल्पनिक विश्वात जगण्याचा अनुभव घेता येणार आहे. तुम्हाला घरबसल्या जगातील कुठल्याही देशात, अंतराळात, समुद्राखाली एवढेच नव्हे, तर कल्पनेपलिकडील जगाचीही सैर करता येणार आहे. तसेच, मनात येईल असे कोणत्याही प्रकारचे कामही करू शकणार आहे.

परंतु, मेटाव्हर्सच्या याच कोणत्याही प्रकारच्या काम करता येण्याच्या सुविधेमुळे या नवतंत्रज्ञानाचा गैरवापर झाल्याच्या काही घटना अलीकडच्या काळात घडल्या. मार्क झुकरबर्ग यांच्या मेटा कंपनीने डिसेंबर २०२१मध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये सुरू केलेल्या हॉरिझॉन या आभासी विश्वात मेटाच्याच संशोधक नीना जेन पटेल यांच्या अवतारावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना नुकतीच समोर आली. ४३ वर्षीय पटेल यांनी यााबाबत सविस्तर ब्लॉग लिहून आपली आपबिती कथन केली.

तसेच, ज्या प्रामाणिक हेतूने मानवाच्या फायद्यासाठी मेटाव्हर्सची दुनिया निर्माण त्याच हेतूला अशाप्रकारच्या विकृतीमुळे धक्का पोहोचत असल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली. पटेल म्हणाल्या, ‘‘होरिऑनमध्ये लॉगिन केल्यानंतर अवघ्या एका मिनिटानंतर तीन ते चार पुरुष अवतारांनी माझ्या अवताराला शिव्या देण्यास सुरुवात केली. अंगावर धावून येत सामूहिक बलात्कार केला आणि एवढेच नव्हे, तर बलात्कारानंतर माझ्या अवताराचे फोटोही काढले. हा सर्व प्रकार एवढ्या कमी वेळेत घडला, की माझ्या अवताराला सेफ्टी बॅरिअरचा वापर करण्यास वेळच मिळाला नाही.’’

मानसिकता वास्तविकच

मेटाव्हर्सच्या आभासी विश्वात गैरप्रकार झाल्याची ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अनेकदा मेटाव्हर्समध्ये महिलांच्या अवतारावर अत्याचार झाल्याचे प्रकार समोर आले आहे. हे सर्व गैरप्रकार आभासी विश्वात घडत असले, तरी तो गैरप्रकार करण्याची मानसिकता मात्र वास्तविक आहे. मेटामधील महिला अवतारांवर बलात्कार किंवा विनयभंगासारखे प्रकार संबंधित अवतार स्वतःहून करत नाही. ती करण्याची मानसिकता प्रत्यक्षात संबंधित अवताराचा मूळ पालक असलेल्या संबंधित व्यक्तीचीच असते. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, हे ठरवण्याची जबाबदारी आपलीच.

‘मेटा’कडून सुधारणांचे आश्वासन

मेटाव्हर्समध्ये घडलेल्या या घटनांची दखल मेटानेही घेतली आहे. ‘मुळात मेटाव्हर्सची संकल्पना ही सकारात्मक वापर होण्यासाठीच करण्यात आली होती; मात्र समाजातील काही नकारात्मक घटकांकडून त्याचा गैरवापर केल्या जातो. अशा घटना घडू नये म्हणून मेटाच्या ‘होरिझॉन’मध्ये सेफ्टी टूल पुरवण्यात आले आहे, तरीही आम्ही आमच्या युजर इंटरफेसमध्ये सुधारणा केल्या जातील. तसेच, अलर्ट सिस्टिम अधिक सक्षम केले जातील. यूजर्सला चांगला अनुभव मिळावा हा आमचा प्रयत्न आहे,’ असे मेटाकडून सांगण्यात आले.

Web Title: Rushiraj Tayade Writes Perverted Mindset Metaverse

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mindset
go to top