टेक्नोहंट : सुवर्णमहोत्सव पहिल्या मोबाईल कॉलचा!

जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात अवघ्या एका क्षणात संपर्क साधण्याची किमया करणाऱ्या मोबाईलवरील पहिल्या कॉलला नुकतेच ५० वर्षे पूर्ण झाले.
first mobile call
first mobile callsakal
Summary

जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात अवघ्या एका क्षणात संपर्क साधण्याची किमया करणाऱ्या मोबाईलवरील पहिल्या कॉलला नुकतेच ५० वर्षे पूर्ण झाले.

जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात अवघ्या एका क्षणात संपर्क साधण्याची किमया करणाऱ्या मोबाईलवरील पहिल्या कॉलला नुकतेच ५० वर्षे पूर्ण झाले. मोटोरोला कंपनीतील अभियंता मार्टिन कूपर यांनी ३ एप्रिल १९७३ रोजी स्वत: विकसित केलेल्या मोबाईल फोनवरून जगातील पहिला मोबाईल कॉल करण्यात आला. त्यानिमित्त...

प्रसिद्ध संशोधक ग्रॅहम बेल यांनी इसवीसन १८७६ मध्ये दूरध्वनीचा शोध लावला आणि जगभरात दूरसंचार क्रांती घडली; परंतु जगभरात दूरध्वनीचे जाळे विणण्यासाठी बराच कालावधी गेला. टप्प्याटप्प्याने जगातील विविध देशांमध्ये दूरसंचार क्षेत्रात प्रगती करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात येऊ लागले; मात्र ५०-६० च्या दशकात कोणताही व्यक्ती कुठूनही संपर्क साधू शकेल, अशी यंत्रणा तयार करण्याबाबत संशोधकांचे प्रयत्न सुरू होते.

अनेक कंपन्या त्यावर काम करू लागल्या. त्यावेळी नामांकित असलेल्या मोटोरोला कंपनीनेही संभाषणासाठी वायरलेस उपकरणाची निर्मिती करण्यासाठी तयारी सुरू केली. त्यासाठी कंपनीने अभियंता मार्टिन कूपर यांच्या नेतृत्वात संशोधन सुरू केले आणि बघता बघता ३ एप्रिल १९७३ रोजी मोटोरोला कंपनीने विकसित केलेल्या मोबाईल फोनवरून जगातील पहिला कॉल लावण्यात आला. हा कॉल स्वतः कूपर यांनी न्यूयॉर्कमधीलच प्रतिस्पर्धी कंपनीतील (बेल लॅबोरेटरीज आता एटी अँड टी) अभियंता जोएल एंगल यांना लावला होता. कूपर यांनी न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन परिसरातील रस्त्यावरून लोकांच्या समक्ष या मोबाईल फोनचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी पहिला कॉल केला होता. ही घटना विज्ञान क्षेत्रासाठीच नव्हे, तर सर्वांसाठी मोठी होती.

कसा होता पहिला मोबाईल?

मार्टिन कूपर यांनी संवाद साधलेल्या मोबाईलचे नाव होते DYNATAC ८००X. ३ एप्रिल १९७३ ला पहिला कॉल या मोबाईलवरून लावल्यावर जवळपास ११ वर्षांनी म्हणजे सन १९८४ मध्ये बाजारात दाखल झाला. त्यावेळी त्याची किंमत ही ११ हजार ७०० डॉलर (आता ९ लाख ६० हजार रुपये) इतकी होती. तेव्हा या फोनवरून नंबर डायल करून केवळ फोन करण्याची सुविधा होती. त्यावरून ना मेसेज पाठवता येत, ना अन्य काही काम करता येई. गंमतीचा भाग म्हणजे हा फोन चार्ज करण्यासाठी तब्बल दहा तास लागत असे आणि चार्जिंग झाल्यावर त्यावरून केवळ अर्धातास बोलता येत असे आणि स्टॅण्ड बायवर जवळपास १२ तास सुरू राहत असे. हा मोबाईल फोन ७९० ग्रॅम इतक्या वजनाचा होता. म्हणजे सध्याच्या स्मार्टफोनच्या तुलनेत जवळपास चौपट.

भारतात १९९५ मध्ये प्रथम वापर

भारतात मोबाईल फोनचा पहिल्यांदा वापर ३१ जुलै १९९५ रोजी झाला. पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू आणि तत्कालीन दूरसंचारमंत्री सुखराम यांच्यात पहिल्यांदा संवाद झाला होता. हा कॉल पश्चिम बंगालच्या राइटर्स बिल्डिंगमधून दिल्लीच्या संचार भवनमध्ये झाला.

विस्मयकारी प्रवास

१९७३ मध्ये पहिला मोबाईल कॉल लावल्यानंतर आजपर्यंत मोबाईल क्षेत्रात झालेल्या विस्मयकारी बदलांचे आपण साक्षीदार आहोत. किलोभर वजन, केवळ कॉलिंगची सुविधा, चार्जिंगसाठी लागणारे कित्येक तास आदींपासून ते आजच्या अँण्ड्रॉईड-आयफोनच्या काळात जणू मिनी कॉम्प्युटरच स्मार्टफोनच्या माध्यमातून हातात आला आहे. बदल हा काळाचा नियम आहे. त्यानुसार भविष्यात मोबाईल क्षेत्रात आणखी काय नवी क्रांती घडेल, याची उत्सुकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com