आरसाच बोलू लागला तर...!

आरसाच बोलू लागला तर...!

आरशात बघून चेहरा न्याहाळणे कोणाला आवडत नाही? काही मिनिटे ते अगदी काही तासदेखील आपण आरशामध्ये स्वतःला पाहात घालवू शकतो. पण म्हणतात ना, आपण जगाशी खोटं बोलू शकतो पण स्वतःशी नाही. त्यामुळे चेहऱ्यावर आनंद असो की दुःख, मेकअप असो किंवा डोळ्याखाली झालेली काळी वर्तुळे. आपण जे आहोत ते आपल्याला आरशात दिसते. पण हे सर्व नुसतेच दिसून काय उपयोग? आनंदात असल्यावर काय करावे, दुःखात असल्यावर काय करावे किंवा सुरकुत्या घालविण्यासाठी काय करावे लागेल, या सर्व गोष्टी कोणी त्याचवेळी सांगितल्या तर? पण एकांतात या गोष्टी कोण सांगणार? शक्‍य वाटत नाही ना? पण आता तुमच्या समोर असलेला आरसाच तुम्हाला या सर्व गोष्टी सांगणार आहे.

असाच एक भन्नाट प्रकारचा आरसा तयार करण्यात आला असून, या आरशाला एक कॅमेरा जोडलेला आहे. त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुमचा फोटो काढण्यात येतो आणि तुमच्या चेहऱ्याच्या प्रतिमेचे विश्‍लेषण करून बरीच माहिती गोळा केली जाते. आरशाच्या कडेला एलसीडी लाइट्‌स बसविण्यात आल्यामुळे तुम्हाला आवश्‍यक असलेल्या प्रकाशात तुम्ही फोटो काढून घेऊ शकता. चेहऱ्यावरील फोड, डोळ्यांखाली झालेले काळे, त्वचा कोरडी झाली आहे की नाही, अशी सगळी माहिती या प्रतिमेच्या विश्‍लेषणातून बाहेर येते. एवढेच नाही, तर अपुऱ्या झोपेमुळे काय झाले, याचीही माहिती तुम्हाला मिळू शकते. 

या आरशाला इंटरनेटही जोडण्याची सोय आहे. म्हणजेच प्रतिमेच्या विश्‍लेषणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला कोणती सौंदर्य प्रसाधने लागतील, त्यापैकी तुमच्याकडे कोणती उपलब्ध आहेत आणि त्याचा साठा किती शिल्लक राहिला आहे, याची सगळीच माहिती तुम्हाला दिली जाऊ शकते. या सर्व माहितीच्या आधारे तुम्ही या उत्पादनांची खरेदी एखाद्या ऑनलाइन पोर्टलद्वारेही करू शकणार आहात. सौंदर्य प्रसाधनांच्या खरेदीसाठी तुम्हाला ‘रिमाइंडर’ लावण्याची सोयसुद्धा आहे. फक्त कॅमरा आणि इंटरनेट नाही, तर या आरशाला ‘व्हॉइस- ॲसिस्टंट’ची सुविधाही देण्यात येत आहे, जेणेकरून तुमच्या मूडप्रमाणे तुम्ही अनेक गोष्टींची माहिती आरशाकडे मागू शकता. अगदी वेळ काय झाली आहे येथपासून ते बाहेरचे हवामान कसे आहे, अशी सगळी माहिती तुमच्या एका व्हॉइस कमांडवर मिळू शकते. 

फक्त चेहरा बघण्यापुरते आता आरशाचे काम मर्यादित राहणार नाही. त्यामुळे भविष्यात तुम्हाला आरशापासूनही काही गोष्टी लपविण्याची गरज भासू शकते, एवढे मात्र निश्‍चित!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com