द डायबेटिक शॉप : मधुमेहींना दिलासा!

सलील उरुणकर
शनिवार, 22 एप्रिल 2017

देशातील 30 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकांना मधुमेहासारख्या जीवनशैलीशी निगडित आजारांनी ग्रासले आहे. आरोग्यविषयक स्टार्ट अप्सची स्थापना आणि त्यांना मिळणाऱ्या व्यावसायिक यशामध्ये त्याचेच प्रतिबिंब दिसत आहे. 'द डायबेटिक शॉप' या सिंगापूरच्या स्टार्ट अपने मधुमेहींना दिलासा देण्यासाठी सहा वर्षांपूर्वी सुरू केलेली ऑनलाइन सेवा आता भारतामध्येही सुरू केली आहे. 

'मला शुगर आहे,' असे सांगणारे आणि शुगर-फ्री उत्पादनांचे सेवन करणारे अनेक जण आपल्याला आजूबाजूला दिसतात. मधुमेहाच्या विळख्यात भारतीय तरुणाई अडकत चालली आहे, अशा बातम्याही अनेकदा वाचायला मिळतात. आरोग्य क्षेत्राशी संबंधित स्टार्ट अप्सच्या दृष्टीनेही ही खूप मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळेच 'प्रीव्हेन्टिव्ह हेल्थकेअर'बरोबरच ऑनलाइन सेवा आणि उत्पादनांची सुविधा देणाऱ्या स्टार्ट अप्स यशस्वी होत आहेत. मधुमेहींसाठी ऑनलाइन सेवा देण्याचा व्यवसाय सहा वर्षांपूर्वी सिंगापूरमध्ये सुरू करणाऱ्या 'द डायबेटिक शॉप'ने आता भारतातही अशीच सेवा सुरू केली आहे. 

आयटी कंपनीमध्ये काम करणारी जीन टॅन ही तरुणी वडिलांना झालेल्या 'टाइप-2' प्रकारच्या मधुमेहामुळे व्यथित होती. नोकरीनिमित्त जगभरामध्ये फिरून आल्यावर ती वडिलांसाठी साखरविरहित उत्पादने आणि अन्नपदार्थ घेऊन येत असे. अशी उत्पादने ऑनलाइन आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याची संकल्पना तिच्या मनात आली आणि तिने नोकरी सोडून देत व्यवसाय सुरू केला. सध्याच्या काळात 'ब्रिक अँड मॉर्टर' पद्धतीने, म्हणजे दुकानांद्वारे सुरू असणारे व्यवसाय ऑनलाइन होत असताना 'द डायबेटिक शॉप'चा प्रवास मात्र उलट्या दिशेने झाला. मुळात ऑनलाइन स्वरूपात सुरू केलेल्या व्यवसायाचे रूपांतर दुकानामध्येही झाले. 

बासमती तांदळामध्ये ग्लायकॅमिक इंडेक्‍स (जीआय) कमी असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी भारत, पाकिस्तान व बांगलादेशातून या तांदळाच्या पाच प्रकारांचे नमुने मागवून घेतले. त्याची चाचणी केल्यावर फक्त एका प्रकारामध्ये जीआय कमी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याचे पोषणमूल्यही तपासून घेतले. अंशत: शिजवलेल्या (पारबॉइल्ड) बासमती तांदळाचे हे उत्पादन अत्यंत लोकप्रिय ठरले.

मधुमेही व्यक्तींसाठी उपयुक्त असलेली अशी 150हून अधिक उत्पादने आज 'द डायबेटिक शॉप'मध्ये उपलब्ध आहेत. हीच सेवा पुण्यातून सुरू करणारे विक्रम सोनवणे म्हणाले, ''ऑनलाइन सेवेमध्ये आता लवकरच तज्ज्ञ डॉक्‍टरांचा ऑनलाइन सल्ला घेण्याची सुविधा आम्ही सुरू करीत आहोत. आहारतज्ज्ञ, डायलेक्‍टोलॉजिस्ट यांच्याशीही रुग्णांना ऑनलाइन संवाद साधता येणार आहे.'' 

  • जागतिक बॅंकेच्या 2012च्या अहवालानुसार, भारतामध्ये 1700 नागरिकांमागे एक डॉक्‍टर. 
  • भारतात फक्त दीड लाख तज्ज्ञ डॉक्‍टर आहेत व त्यापैकी 80 टक्के डॉक्‍टर हे शहरी भागात स्थायिक आहेत. 
  • भारतातील सहा कोटी नागरिक मधुमेहाने ग्रस्त. 
  • 30 वर्षे किंवा अधिक वय असलेल्या भारतीयांपैकी एक तृतीयांश नागरिकांना जीवनशैलीशी निगडित मधुमेहासह अनेक आजार.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salil Urunkar writes about The Diabetic shop