माहितीचा विस्तार

रविवार, 29 ऑक्टोबर 2017

माहिती डिजिटल माध्यमांमध्ये येऊ लागली, तशी मोजताही यायला लागली. नेमकी किती माहिती रोज निर्माण होते इथपासून ते हाती लागलेली माहिती साठवणार कुठं इथपर्यंतच्या ‘माहिती’चा संक्षिप्त आढावा.

एक ग्रॅम वजनाची ‘डिस्क’. त्यामध्ये ४५५ एक्‍साबाइट (exabytes) इतकी माहिती साठवलेली. माहिती असू द्या, की एका एक्‍साबाइटमध्ये १ अब्ज गिगाबाइट असतात आणि एक हजार एक्‍साबाइटचा एक झिटाबाइट होतो. सहा वर्षांपूर्वी, २०११ मध्ये १.८८ झिटाबाइट इतकी माहिती डिजिटल फॉर्ममध्ये जगाच्या पाठीवर उपलब्ध होती. म्हणजे, अवघ्या चार ग्रॅम वजनाच्या ‘डिस्क’मध्ये आहे. सहा वर्षांपूर्वी जगात उपलब्ध असलेली सगळी माहिती साठविण्याची क्षमता. समजा, ही माहिती ‘डीव्हीडी’मध्ये भरायची ठरवली, तर त्यासाठी लागतील तब्बल १०० अब्ज ‘डीव्हीडी’. 

अशी ‘डिस्क’ खरंच जगात उपलब्ध आहे?
इतकी माहिती इतक्‍या छोट्या ‘जागेत’ भरता येते?
ही ‘डिस्क’ सहज उपलब्ध होऊ शकेल?

एक ना अनेक प्रश्‍न पडू शकतात. या प्रश्‍नांचं उत्तर आपल्या शरीरात आहे. माहितीचा महाप्रचंड ओघ इतक्‍या कमी जागेत साठवून ठेवायची क्षमता आतापर्यंत तरी फक्त मानवी ‘डीएनए’मध्ये असल्याचं वैज्ञानिकांना सहा वर्षांपूर्वी उमगलं आहे. हार्वर्ड विद्यापीठात २०११ मध्ये यासंदर्भात निव्वळ संशोधनच झालं नाही; तर उद्याच्या जगासाठीची माहिती साठविण्याची अक्षरशः अमर्याद व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं चाचपणीही झाली. आजघडीला सामान्य माणसापर्यंत एक-दोन टेराबाइट डेटा साठविण्याची क्षमता असलेल्या डिस्क, त्याही बऱ्यापैकी आकाराच्या, पोचल्या आहेत. त्यामुळं, ‘डीएनए’चा वापर ‘डिस्क’ म्हणून होऊ शकतो, ही कल्पना वाटण्याची शक्‍यता जास्त. येत्या दहा-पंधरा वर्षांमध्ये माहिती साठविण्यासाठीच्या साधनांमध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत. तथापि, जगभरात प्रत्येक क्षणाला माहितीची निर्मिती आणि आहे त्या माहितीचा फॉर्म बदलण्याची प्रक्रिया अचाट वेगाने सुरू आहे. 

माहिती निर्मितीचा वेग
गटेनबर्गच्या छपाई यंत्रानंतर सर्वप्रथम युरोपमध्ये माहिती मुद्रित माध्यमात आली. पहिल्या पन्नास वर्षांत, म्हणजे १४५४ ते १५०० या काळात आठ-दहा हजार पुस्तके छापली गेली आणि मौखिक माहितीचं रूपांतर मुद्रित माध्यमात झालं. १७५० ते १८०० या पन्नास वर्षांत छपाईचा युरोपातील वेग वाढला आणि साडेसहा लाख पुस्तकं छापली गेली. ‘गटेनबर्ग’ ही जशी माहितीच्या खजिन्याची किल्ली होती, तशी किल्ली ‘गुगल’ या नावानं एकविसाव्या शतकात लोकांच्या हाती आली. ‘गुगल’च्या २०१० च्या अंदाजानुसार, १२,९८,६४,८८० इतकी पुस्तकं जगभरात अस्तित्वात होती. हा अर्थातच अंदाज आहे; कारण एका पुस्तकाच्या नेमक्‍या किती प्रति छापल्या याबद्दल काही माहिती नाही किंवा ज्यांनी ‘आयएसबीएन’ नंबर घेतलेले नाहीत, अशा पुस्तकांची नोंदही यामध्ये नाही. मात्र २०१० मध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली, की खूप कमी माहिती इंटरनेटवर आहे किंवा ‘गुगल’सारख्या किल्लीकडचा खजिना मर्यादित आहे. त्यानंतरच्या काळात जगभरात इंटरनेट तंत्रज्ञानात झपाट्याने बदल झाले आणि या क्षणालाही होत आहेत. परिणामी, माहिती निर्मितीचा, विशेषतः डिजिटल फॉर्ममधील माहिती निर्मितीचा वेग विलक्षण वाढतो आहे. 

माहितीचा आवाका
जगभरात २०१२ मध्ये डिजिटल फॉर्ममध्ये माहिती निर्माण होण्याचा दर दिवसाचा वेग होता २.५ एक्‍साबाइट. सोप्या भाषेत सांगायचं, तर दोन टेराबाइट स्टोअरेज क्षमतेच्या पन्नास लाख लॅपटॉपमध्ये बसेल, इतकी माहिती तुम्ही-आम्ही रोजच्या रोज निर्माण करत होतो किंवा अन्य माध्यमांत असलेल्या माहितीचं रूपांतर डिजिटल फॉर्ममध्ये करत होतो. गेल्या पाच वर्षांतला इंटरनेटचा आणि मोबाईल फोनचा विस्तार पाहता, आजचा माहिती निर्मितीचा आणि फॉर्म बदलण्याचा प्रति दिवसाचा वेग किमान पाच पट जास्त, म्हणजे १० एक्‍साबाइट इतका असू शकतो. जगात उपलब्ध असलेली सगळीच माहिती अजूनही डिजिटल फॉर्ममध्ये उपलब्ध झालेली आहे, असं म्हणता येत नाही. त्याच वेळी, मुद्रित आणि दृश्‍य माध्यमांमधून नवी माहितीही जन्माला येते आहे, जी अद्याप डिजिटल माध्यमांमध्ये बदलली गेलेली नाही. याचाच अर्थ, येत्या काळात माहिती निर्मितीबरोबरच साठविण्याच्या तंत्रज्ञानातही वेगाने बदल होत जाणार आहेत. सुरवातीला म्हटल्याप्रमाणं, जगभरातील माहिती शरीराचाच एक अंश बनण्याचा काळ जवळ आला आहे. माहितीची देवाण-घेवाण इतक्‍या झपाट्याने होईल, असं दहा वर्षांपूर्वी आपण कल्पनाही करू शकत नव्हतो; तसं माहिती साठविण्याची क्षमता ‘बाहुबली’ होण्याची कल्पनाही आज करू शकत नाही. मात्र त्यादृष्टीनं संशोधकांची पावलं पडलेली आहेत आणि ‘माहिती’ कवेत घेण्याची मानवाची क्षमता विस्तारणार आहे. 

एम-टू-एम 
(मशिन-टू-मशिन)
१३.७ अब्ज उपकरणे स्वयंचलित आणि इंटरनेटद्वारे माहितीची देवाण-घेवाण २०२१ पर्यंत करतील.
१.३ कॉम्प्युटर्स २०२१ पर्यंत अस्तित्वात राहतील; त्यांची संख्या कमी होत जाईल.
३.२ अब्ज उपकरणे स्मार्ट टीव्ही, डिजिटल मीडिया ॲडाप्टर्स, ब्लू-रे डिस्क प्लेअर्स आणि गेमिंगची असतील.
७१ टक्के उपकरणे ग्राहककेंद्रित असतील; केवळ २९ टक्के उपकरणे उद्योगांसाठी वापरली जातील.
३० टक्के ‘एम-टू-एम’ उपकरणे केवळ आरोग्य या क्षेत्राशी संबंधित असतील. 
 २९ टक्के ‘एम-टू-एम’ उपकरणे शहरीकरण आणि मोटारींसाठीची असतील.

माहितीचे ‘वाहक’
५१ टक्के  - इंटरनेट आजघडीला कॉम्प्युटरवरून वापरले जात आहे. 
६३ टक्के  - इंटरनेट वापर २०२१ पर्यंत फक्त ‘वायरलेस’ उपकरणांद्वारे (मुख्यतः स्मार्ट फोन आणि स्वयंचलित उपकरणे) होईल. 
३७ टक्के  - इंटरनेट वापरासाठी कॉम्प्युटर, लॅपटॉपचा वापर होईल.
२७.१  - अब्ज उपकरणे इंटरनेटसाठी २०२१ पर्यंत वापरली जातील.
३.५  - प्रतिमाणशी असे इंटरनेटसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचे प्रमाण राहील.
२.३  - प्रतिमाणशी असे इंटरनेटसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचे २०१६ चे प्रमाण आहे.

(Source : internetlivestat.com, Cisco Visual Networking Index: Forecast and Methodology, २०१६-२०२१ अहवाल)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: samrat phadnis article social media Information Digital Media