मेंदूच्या इशाऱ्यांवर चालणार मोटारी 

सोमवार, 8 जानेवारी 2018

स्वयंचलित किंवा ऑटोनॉमस मोटारी रस्त्यावर येणार अशा बातम्या काही दिवसांपासून येत आहेत. अशा मोटारींची चाचणीही परदेशात सुरू आहे. चालकविरहित अशा या मोटारी कितपत व्यवहार्य ठरतील, अपघात टाळणे शक्‍य होईल का, अशा अनेक प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे अद्यापही कोणी देऊ शकत नाही. परंतु पूर्णपणे चालकविरहित मोटारींऐवजी चालकाच्या मेंदूच्या इशाऱ्यांवर चालणारी मोटार आली, तर ती अधिक सुरक्षित असेल का, या प्रश्‍नाचे उत्तरही लवकरच मिळणार आहे. 

मोटारनिर्मिती करणाऱ्या काही कंपन्या आता हे नवे तंत्रज्ञान विकसित करत आहेत. या तंत्रज्ञानाचे नाव "ब्रेन टू व्हेइकल' (बीटूव्ही) असे आहे. वैद्यकीय क्षेत्रात "इलेक्‍ट्रोएन्सेफॅलोग्राफी' किंवा "ईईजी' काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणाच्या धर्तीवर मोटारनिर्मिती कंपन्यांकडून एक प्रणाली तयार करण्यात आली आहे. मोटार सुरू करण्यापासून बंद करेपर्यंत, ब्रेक लावताना, स्पीड वाढविताना किंवा स्टेअरिंग फिरविताना मानवी मेंदू कशाप्रकारे काम करतो, कोणत्या अडथळ्यांचा विचार करतो अशा विविध गोष्टींचा अभ्यास केला जात आहे. मेंदूतून मिळणाऱ्या या सिग्नल्सचा वापर नंतर मोटारीमध्ये करण्यात येणार आहे. यामुळे चालकाच्या प्रतिसादासाठी लागणारा कालावधी म्हणजे "रिऍक्‍शन टाइम'सुद्धा कमी करण्यासाठी मदत होणार आहे. 

या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग अपघात टाळण्यासाठीही होऊ शकतो. दीर्घकाळ वाहन चालविल्यानंतर येणारा शीण आणि ताणतणावातून चालकाची सुटका करण्यासाठी तसेच चालकाला प्रसन्न व चांगला अनुभव देण्यासाठी या नव्या प्रणालीचा उपयोग होऊ शकणार आहे. रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी करण्यासाठी आणि मोटारचालक म्हणून काम करणाऱ्यांचे रोजगारही कायम राहण्यासाठी हे नवे तंत्रज्ञान वरदान ठरण्याची शक्‍यता आहे. येत्या काही दिवसांत लास वेगास येथे होणाऱ्या "दि इंटरनॅशनल कन्झ्युमर इलेक्‍ट्रॉनिक्‍स शो'मध्ये "ड्रायव्हिंग सिम्युलेटर'द्वारे या तंत्रज्ञानाचे सादरीकरण होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sci-tech brain