सूर्याच्या दिशेने जगातील पहिल्या मोहिमेस 'नासा' सज्ज

पीटीआय
शुक्रवार, 9 जून 2017

'पार्कर सोलार प्रोब'चे पुढील वर्षी उड्डाण
 

वॉशिंग्टन : अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था 'नासा' जगातील पहिल्या सौरमोहिमेसाठी सज्ज असून या मोहिमेद्वारे सूर्याभोवतीचे वातावरणाचा अभ्यास केला जाणार आहे. पुढील वर्षी या मोहिमेला सुरवात होणार आहे.

साठ वर्षांपूर्वी सौर वाऱ्यांच्या अस्तित्वाचा अंदाज व्यक्त करणारे खगोलभौतिक शास्त्रज्ञ युजेन पार्कर यांच्या कार्याचा गौरव म्हणून सौरमोहिमेसाठी वापरल्या जाणाऱ्या अवकाशयानाला 'पार्कर सोलार प्रोब' (पार्कर सौरयान) असे नाव देण्यात आले आहे. 'नासा'ने प्रथमच एका यानाला जिवंत व्यक्तीचे नाव दिले आहे. हे अवकाशयान एखाद्या लहान मोटारगाडी इतक्‍या आकाराचे आहे. यानामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली उपकरणे बसविण्यात आली आहेत. या उपकरणांनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे सूर्याबाबत असलेल्या विविध अनुत्तरीत प्रश्‍नांची उत्तरे मिळण्याची शास्त्रज्ञांना आशा आहे. पार्कर सौरयान हे सूर्याच्या वातावरणात जाऊन निरीक्षण करणार आहे.

तापर्यंत कोणतेही यान गेले नाही, इतक्‍या जवळून हे यान जाणार असून यावेळी त्याला प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी 4.5 इंच जाडीच्या कार्बनपासून तयार केलेले एक आवरण अवकाशयानाभोवती असणार आहे. सूर्याची प्रभा मूळ पृष्ठभागापेक्षा अधिक उष्ण का असते?, अशासारख्या अनेक अनुत्तरीत प्रश्‍नांवर उत्तर शोधण्याचा यानाद्वारे प्रयत्न केला जाणार आहे. हे यान 31 जुलै 2018 मध्ये सूर्याकडे झेपावेल, असे 'नासा'च्या शास्त्रज्ञांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sci tech news solar mission nasa ready